सौदागर - भाग २

आता कसं वाटतंय?
गाऽऽर... गाऽऽर!!
आता काय बोलणार?
माझा वासलेला ’आ’ तसाच राहिला.

“सांगितलं ना, घाबरू नकोस!” ती म्हणाली. “तू आता हाच विचार करत असशील ना, की मला हे सर्व कसं समजलं?”

..संपलंच की सगळं! मि. गॅंगस्टर, तुमची शेवटची इच्छा काय? कारण आता तुम्ही फासावर चढणार ना?...

“क्‍... काय? काय समजलं?” मी चढ्या आवाजात विचारलं.

“कारण म्हणजे असं बघ.” ती माझ्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करत म्हणाली. “मला भेटायला कोण येणार? कारण, मी एकटीच रहाते. बाहेरून पोलिसांचा सायरन आणि गोळीबार ऐकू येतोय. म्हणजे नक्कीच ते गुन्हेगाराच्या पाठलागावर आहे. माझी झोपडी गल्लीत अगदी पहिलीच आहे. त्यामुळे तू जेव्हा दार ठोठावलंस तेव्हाच माझ्या लक्षात आलं की तू कोण आहेस.” तिने स्पष्ट केलं.

ही बया नक्कीच ’शेरलॉक होम्स’ वाचत असावी. ते काहीही असो, आपण आता तुरूंगात आणि नंतर फासावर.

“पण मी तुला पोलिसांच्या हवाली करणार नाही.” तिनं दुसरा बॉम्ब टाकला.

“का?” मी आश्चर्याने विचारलं.

“कारण माझं प्रेम बसलंय़ तुझ्यावर.”

मी चांगलाच दचकलो. त्याहिपेक्षा दहावेळा तरी स्वत:ला चिमटा काढून बघितला. आमच्यासारख्या गॅंगस्टर्सच्या आयुष्यात मुलींची कमतरता नसते. पण त्यात काही अर्थ नसतो कारण तो असतो नुसता आभास. प्रेम, आपलेपण नाही. त्याबाबतीत नेहमी आम्ही हाऊसफुल्लचा बोर्डच पहाणार. तिकीट काढायला गेलं की, आमची पाळी आली की तिकीटं संपली. आम्हाला तिकीट मिळावं आणि मग ते पिक्चर हाऊसफुल्ल व्हावं असं कधी झालेलं नाही.

“काय?” मी ओरडलोच.

“हो. तू विश्वास ठेव अगर ठेवू नकोस पण हे खरं आहे.” ती खाली मान घालत उद्गारली. त्यावेळी तिच्या चेहेर्‍यावरचे विभ्रम इतके मोहक होते की वाटत होतं की... की... इथेच... पण जाऊ दे, सध्यातरी ते शक्य नाही.

तेव्हापासूनचे दिवस म्हणजे अक्षरश: स्वर्गसुख होते. मी जेव्हा मिशनवर नसायचो तेव्हा तिच्याकडेच तर असायचो. आम्ही एकत्रच रहात होतो. लग्न न करता. पण आमचे लवकरात लवकर लग्न करायचे प्लॆन्स मात्र होते. आज मात्र असं वाटतंय की ती भेटली नसती तरच बरं झालं असतं. निदान ही भीषण परिस्थिती तरी उद्भवली नसती. अर्थात, हे मी आता सांगू शकतोय. पण जर एखादी गोष्ट घडणारच असेल, तर पात्र आणि प्रसंग बदलल्याने ती बदलते का? कुणास ठाऊक. पण आमचं आयुष्य सुखात चाललं होतं. तिला मी गॅंगस्टर असल्याने काही फरक पडत नव्हता. ती लग्न करायला तयार होती. पण...

त्यादिवशी नेहमीप्रमाणेच मिशन होतं. हे मिशन जरा धोक्याचं होतं आणि संपूर्ण ’सौदागर’ मधे हे मिशन हॅन्डल करू शकेल, असा एकमेव माणूस मीच होतो. म्हणून बॉसने मला एकट्याला पाठवलं. मी एकटाच कार ड्राइव्ह करत भरधाव निघालो होतो. तेवढ्यात मला जाणवलं की, माझा पाठलाग होतोय. कार खरोखरच माझा पाठलाग करत होती. ती माझ्या कारपेक्षा फारच फास्ट होती. क्षणार्धात ती माझ्या कारसमोर आली आणि कारला रोखण्यासाठी मध्येच थांबली.

मी खाली उतरलो. काही कळायच्या आतच तेही उतरले आणि त्यांनी गोळीबार सुरू केला. ते दुसर्‍या गॅंगचे लोक होते. दोनच दिवसांपूर्वी आमच्या बॉसने त्यांच्या एका महत्त्वाच्या माणसाला उडवलं होतं. त्याचा सूड ते माझ्यावर उगवत होते.

मी त्यांच्यापेक्षा कुठेच कमी नव्हतो पण ते संख्येने फारच जास्त होते तरिही त्यातल्या बहुतेकांना मी ठार केलंच. त्या अंदाधुंदीत मी जबरदस्त जखमी झालो. मी मेलो असं समजून बाकीचे निघून गेले. नंतर मला कुणीतरी हॉस्पिटलमधे ‌ऎडमीट केलं. बॉसने रिवाजाप्रमाणे त्या कामाचे दुप्पट पैसे आणि हॉस्पिटलचा सर्व खर्च दिला. नंतर मला हॉस्पिटलमधून डिसचार्ज मिळाला आणि विश्रांतीसाठी तिच्याकडे रहायला लागलो. काही दिवसांतच मी खडखडीत बरा झालो.

पण एक दिवस एक वेगळाच प्रश्न समोर आला. एक दिवस ती मला अचानक म्हणाली, “मला वाटतं, तू हे काम सोडावसं.”

“छे, छे! अजिबात नाही.” मी म्हणालो.

“मग तू मला विसरून जा.” ती म्हणाली.

“का पण? काहितरी काय?” माझा चेहेरा केविलवाणा झाला.

“काहितरी नाही. त्या दिवसापासून मी हाच विचार करते आहे. त्या दिवशी तू सुदैवाने वाचलास. पण प्रत्येकवेळी तुझं नशीब एवढं चांगलं असेलच कशावरून? पुन्हा जर असं झालं आणि त्यात तुझं काही बरं वाईट झालं तर पुढे काय? आपल्याला जर मुलं झाली, तर त्यांच्या भविष्याची जबाबदारी कोण घेणार?”

--
कुलस्य जोशी
kulasya@gmail.com

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.

मोगरा फुलला दीपावली अंकाबद्दलचा आपला अभिप्रायही अवश्य नोंदवा.

काही सूचना किंवा सल्ले द्यायचे असतील तर इथे क्लिक करा.

वरील साहित्यावरही आपली प्रतिक्रिया अवश्य द्या.

धन्यवाद.


Creative Commons License
मोगरा फुलला ई-दीपावली अंकामधील कोणत्याही प्रकारचे साहित्य हे Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 3.0 Unported License च्या अंतर्गत सुरक्षित आहे. अंकातील साहित्याच्या पुन:प्रकाशनाचे व्यापक अधिकार हे अंकातील साहित्य कोणत्या प्रकारचे आहे, यावर अवलंबून आहेत.


© 2011 Mogaraa Fulalaa. मोगरा फुलला ई-दीपावली अंक हा ’मोगरा फुलला’चाच एक भाग आहे. मोगरा फुलला ई-दीपावली अंकात प्रकाशित झालेल्या साहित्याचे सर्व हक्क हे त्या साहित्याच्या मूळ निर्मात्यांकडेच सुरक्षित आहेत. मोगरा फुलला दीपावली अंकाच्या प्रकाशित होणा-या आवृत्तीमधील कुठल्याही साहित्याच्या पुन:प्रकाशनासाठी संबंधित साहित्याच्या मूळ निर्मात्यांशी संपर्क साधावा अथवा मोगरा फुलला ई-दीपावली अंकाच्या संपादकांशी mogaraafulalaa@gmail.com या आयडीवर संपर्क साधावा.