नामर्द - भाग १

स्मृती वारंवार अभयच्या चेहर्‍याकडे वळून पाहत होती. रिक्षा मधेच गचके खात होती, पण अभयची लागलेली तंद्री भंग होत नव्हती. स्मृतीला अभयची खूप काळजी वाटत होती. त्याला काय वाटत असेल? त्यानं किती मनाला लावून घेतलं असेल? ह्याचा अदमास घ्यायचा ती प्रयत्न करत होती. डॉक्टरांकडून निघाल्या क्षणापासून अभय तिच्याशी एक शब्द बोलला नव्हता. तो गप्पच होता अजून. घरी गेल्यावर बोलू ह्या विचारानं स्मृती सारखी स्वतःला समजावत होती.

"अभय अरे बोल ना रे काहीतरी!" स्मृतीला शांतता सहन होत नव्हती. पण अभय घरी आल्यापासून सोफ्यावर एकटक कुठेतरी नजर लावून बसला होता.

"अभय..." तिनं त्याचा खांदा हलवला.
"हं.." अभय भानावर आला, "काय झालं गं?"
"अरे मला काय विचारतोयस? असा गप्प नकोस रे बसू!" तिच्या नजरेत काळजी होती.
"हं.." अभयनं एक सुस्कारा सोडला.
"अरे डॉक्टर म्हणालेत ना आपण इन व्हिट्रो करू किंवा दुसरा काहीतरी इलाज होईलच ना रे! वंध्यत्वावर हल्ली खूप उपाय आहेत."
"हं..ते ही आहेच म्हणा!" अभय थोडासा सावरत म्हणाला. "पण थोडंसं वाईट वाटलं गं!" तिनं त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्यानं तिचा हात हातात घेतला आणि एकदम त्याच्या चेहर्‍यावर त्याचं नेहमीचं स्मित आलं.
"काय झालं रे?" तिनं आनंदून विचारलं.
"आपण मारे तीन वर्षं फॅमिली प्लॅनिंग करत होतो. आणि मॅच आधीपासूनच फिक्स्ड होती!" तो तिला डोळा मारत म्हणाला. मग दोघेही खळखळून हसले. तिच्या मनावरचं एक ओझं कमी झालं.
"आपण लवकरात लवकर पुढचा इलाज सुरू करू." ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणाली.
"आणि नाहीच जमलं तर मूल दत्तक घेऊ, चालेल तुला?" त्याच्या ह्या उद्गारांनी एकदम चकित होऊन तिनं त्याच्याकडे पाहिलं.
"ऐसे ना मुझे तुम देखो...सीने से लगा लूंगा"
"धत्, उठा आता जेवायला चला!"
**********

"हो आई येऊ ना आम्ही नक्की! अच्छा!" स्मृतीनं फोन ठेवला.
"काय गं? बिनधास्त आपलं येऊ की आम्ही. सुट्टी कोण देणार आहे मला?"
"दोन दिवसही नाही देणार का रे तुला सुट्टी! आई एव्हढ्या आग्रहानं बोलावताहेत. गुरूवारी निघू आणि रविवारी परत येऊ."
"आवरा. तुझं प्लॅनिंग पूर्ण झाल्यावर तू मला सांगतेयस! अगं विचारत जा ना आधी. बिनधास्त कमिट करून टाकते."
"हे बरं आहे. आई तुझी, आग्रह तिचा आणि बोल तू मला लावतोयस."
"बरं बरं. लगेच ट्रॅक नको बदलूस."
"मी ट्रॅक बदलला नाहीये. तूच मला उगाच बोलतोयस."
"तू ट्रॅक बदलला नाहीस? नातेवाईकांवर पोचली नाहीस?"
"माफ कर रे बाबा मला. मला नाही तुझ्याशी भांडता येत." ती त्रासून म्हणाली.
"आणि मला तुझ्याशी भांडावंसं वाटत नाही." तो मिश्किल हसत म्हणाला. "काहीतरी झोलझाल करून सुट्टी मिळवेन मी!"
**********

अभय डोळे चोळत उठला. एकदम अंधार पडला होता.

'च्यायला दुपारी तासभरासाठी म्हणून झोपलो, तर आता संध्याकाळ होत आलीय.' तो आळस देत स्वतःशीच बोलत होता. "ह्या गावच्या मस्त हवेल झोपही मस्त लागते. पण हिनं उठवायचं नाही का मला!'
"स्मृती.." तिला हाक मारतच तो खोलीबाहेर आला. "स्मृती???"
"अरे ती आईसोबत कुठेतरी गेलीय बाहेर!" त्याची वहिनी म्हणाली.
"बरं बरं..पण इतक्या संध्याकाळी म्हणजे कमालच झाली!"
अभ्यास करत बसलेल्या पुतणीच्या टपलीत मारून तो बाहेर व्हरांड्यात जाऊन बसला.
"नाष्टा बनवून ठेवलाय रे. ये खायला, चहा टाकते मी. हे पण येतील एव्हढ्यातच." वहिनी म्हणाली.
"नको वहिनी, ही आली की मग जेवेनच सरळ."
"काय रे जोरू का गुलाम!"
एव्हढ्यात त्याला आई आणि स्मृती येताना दिसल्या. स्मृती एकदम थकून गेल्यासारखी वाटत होती.
"काय गं आई? कुठे घेऊन गेली होतीस हिला?" तो तिचा हात पकडत म्हणाला. तिचं अंग तापलं होतं.
"अरे कुठे नाही... देवळात" आई म्हणाली. पण त्या दोघींची झालेली नजरानजर त्याच्या नजरेतून सुटली नाही.
"तुला ताप भरलाय स्मृती!" चल आत आधी आणि तो तिला घेऊन आत गेला.
"परवा परत जायचंय आपल्याला आणि ताप कसला गं घेऊन आलीस?" तिच्या डोक्यावर तो पट्ट्या ठेवत होता.
"असंच रे..दमणूक झाली." ती त्याच्या नजरेला नजर न देता म्हणाली. त्याला काहीतरी विचित्र वाटलं.
**********

--
विद्याधर भिसे
vnb2005@gmail.com


4 comments:

pranay २ नोव्हेंबर, २०१० रोजी २:३९ PM  

विद्याधरजी जो लेख तुम्ही लिहिला आहेतो खरच एक मार्गदर्शक आहे की अंधश्रद्धा ही कुठल्या स्तराला जाउन पोहचते हे ह्या लेखावरून कळते पण आपण शहराकडे रहणारी मंडळी खरच याला जबाबदार आहोत असे वाटते आपण शिक्षण घेऊन प्रकाश्मय तर होतो पण गावातला अंधकार दूर करणे विसरून जातो

THEPROPHET २९ नोव्हेंबर, २०१० रोजी १२:४१ AM  

प्रणय,
खरंच मला असं वाटतं, की आपणच आपल्या लोकांची आयुष्य उजळण्यासाठी काहीच करत नाही...दुहेरी आयुष्य जगत राहतो..
खूप आभार!!

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर ५ डिसेंबर, २०१० रोजी ७:३१ PM  

वा. आवडली कथा. डोळ्यात अंजन घालणारी. तरी लोक काही सुधारायचे नाहीत.

सुधीर कांदळकर

THEPROPHET १३ डिसेंबर, २०१० रोजी ४:१६ PM  

कांदळकर काका,
खूप खूप धन्यवाद! :)

टिप्पणी पोस्ट करा

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.

मोगरा फुलला दीपावली अंकाबद्दलचा आपला अभिप्रायही अवश्य नोंदवा.

काही सूचना किंवा सल्ले द्यायचे असतील तर इथे क्लिक करा.

वरील साहित्यावरही आपली प्रतिक्रिया अवश्य द्या.

धन्यवाद.


Creative Commons License
मोगरा फुलला ई-दीपावली अंकामधील कोणत्याही प्रकारचे साहित्य हे Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 3.0 Unported License च्या अंतर्गत सुरक्षित आहे. अंकातील साहित्याच्या पुन:प्रकाशनाचे व्यापक अधिकार हे अंकातील साहित्य कोणत्या प्रकारचे आहे, यावर अवलंबून आहेत.


© 2011 Mogaraa Fulalaa. मोगरा फुलला ई-दीपावली अंक हा ’मोगरा फुलला’चाच एक भाग आहे. मोगरा फुलला ई-दीपावली अंकात प्रकाशित झालेल्या साहित्याचे सर्व हक्क हे त्या साहित्याच्या मूळ निर्मात्यांकडेच सुरक्षित आहेत. मोगरा फुलला दीपावली अंकाच्या प्रकाशित होणा-या आवृत्तीमधील कुठल्याही साहित्याच्या पुन:प्रकाशनासाठी संबंधित साहित्याच्या मूळ निर्मात्यांशी संपर्क साधावा अथवा मोगरा फुलला ई-दीपावली अंकाच्या संपादकांशी mogaraafulalaa@gmail.com या आयडीवर संपर्क साधावा.