नामर्द - भाग २

दोन महिने उलटले होते अभय आणि स्मृतीला गावाहून येऊन. अभयचा इलाज चालू होता. पण कदाचित इन व्हिट्रो - आयसीएसआय करावं लागणार होतं. अजून महिन्याभरात काही ना काहीतरी मार्ग निघेलच असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. स्मृती खुष होती कारण अभयनं सगळंच खूप सहज स्वीकारलं होतं.
आणि एक दिवस स्मृती अभयला परत म्हणाली.

"अभय, आईंनी बोलावलंय रे!"
त्यानं तिरक्या नजरेनं तिच्याकडे पाहिलं. "गेल्या वेळेस काय केलं होतंस तिथे लक्षात आहे ना? इथे परत आल्यावरही आठवडाभर आजारी होतीस. अशक्तपणा जाईस्तो महिना उलटला आणि आता पुन्हा?"
"अरे एकदा आजारी पडले म्हणजे काय नेहमीच पडणार आहे का? आणि ह्यापूर्वीही कित्येकदा गेलोय ना आपण गावाला?"
"बरं माफ कर. मला नाही तुझ्याशी भांडता येत."
"आणि मला तुझ्याशी भांडावंसं वाटत नाही." तिनं हसून टीव्ही चालू केला.
**********

"स्मृती, तू नक्की आमच्याबरोबर येत नाहीयेस? असं शेवटच्या क्षणी काय गं!" अभयचा स्वर दुखावलेला होता.
"नाही रे. मला आईंबरोबर खूप सार्‍या गप्पा मारायच्यात. तू, भाऊजी, वहिनी आणि अबोली जाऊन या ना!"
"पण मग उद्या जाऊ ना आम्ही!"
"असं कसं रे, एव्हढी तयारी करताहेत वहिनी कालपासून."
"मग मी कशाला जाऊ, त्यांना जाऊ देत ना! तिकडे स्पेशली तुझ्यासाठी जायचं होतं. ते ठिकाण काय मी लहानपणापासून हजारदा पाहिलंय."
"असं कसं रे. त्यांना किती वाईट वाटेल. आपण जाऊ ना पुन्हा!"
"अगं पण उशीर होईल गं बये यायला!"
"अरे आहेत ना आई माझ्यासोबत!"
तो चेहरा पाडून गेला, तेव्हा स्मृतीलाच खूप वाईट वाटलं. त्याच्याशी ती कधीच खोटं बोलली नव्हती. तिला खूप अपराधी वाटत होतं.
**********

अभय रिक्षातून उतरला आणि पायवाटेवरून झपझप घराकडे निघाला. घराचा दरवाजा उघडा बघून त्याला शंका आली. आणि एकदम घरातून धूराचा वास येत होता. अचानक घरातून कुणीतरी मंत्रोच्चारण करत असल्याचा आवाज येऊ लागला. तो पटकन आवाजाच्या दिशेनं निघाला. आवाज स्वयंपाकघरातून येत होता. तो आत शिरला आणि आतलं दृश्य पाहून हादरलाच.

एक मांत्रिक एक हवन पेटवून बसला होता. त्याचे पांढरे कपडे, लांब वाढलेले काळे केस, दाढी-मिशा आणि कपाळाचं मोठ्ठं गंध ह्यांबरोबरच असलेल्या दाट भुवयांमुळे तो अजूनच भयावह दिसत होता. शेजारीच त्यांच्या ओळखीतल्या मुसळेबाई होत्या. आणि तो मांत्रिक स्मृतीवर काहीबाही उधळत होता. स्मृतीशेजारी बसून त्याची आई भक्तिभावानं हे सगळं बघत होती. अभयच्या आण्याची कुणालाच कल्पना आली नाही. अभय थिजूनच गेला होता. हे सगळं त्याच्या घरात चालू होतं ह्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. एव्हढ्यात त्या मांत्रिकानं स्मृतीला प्यायला काहीतरी दिलं आणि अभय भानावर आला.

"थांब स्मृती!" तो जोरानंच म्हणाला.

सगळेच दचकून त्याला पहायला लागले. मुसळेबाई घाबरल्या, आई बावरली, स्मृतीला खूपच वाईट वाटत होतं. मांत्रिक त्याचे लालभडक डोळे रोखून त्याच्याकडे पाहत होता.

"स्मृती हे तू प्यायचं नाहीस!" तो पुढे होऊन तिच्या हातून ते भांडं काढून घेत म्हणाला.
"अरे अभय.."
त्याची आई काही बोलायला सुरूवात करणार इतक्यात मांत्रिक म्हणाला. "का नाही प्यायचं? तिला गरज आहे. तिचं औषध आहे ते."
"तिचं औषध? काय झालंय तिला?" तो अविश्वासानं स्मृतीकडे पाहत म्हणाला.
"ती वांझ आहे!" मुसळेबाई धीर एकवटून म्हणाल्या.
"मुसळेबाई!" अभय कडाडला, "तोंड सांभाळा आपलं! पाहुण्या आहात पाहुण्यांसारखं वागा." तशी मुसळेबाईंची बोलती बंद झाली.
"काय चुकीचं बोलल्या त्या?" आता चक्क अभयची आई म्हणाली.
"आई.." अभयच्या स्वरात दुःख ओतप्रोत भरलं होतं. "तू पण? तुला माहित तरी आहे..."
त्यानं वाक्य पूर्ण करायच्या आधीच स्मृतीनं त्याचा हात धरला. त्यानं स्मृतीकडे पाहिलं. ती त्याला डोळ्यानंच विनवत होती. त्याच्या डोळ्यांत अश्रू आले. मग त्याचं लक्ष मांत्रिकाकडे गेलं आणि अश्रूंची जागा संतापानं घेतली.
"आई, हे सगळं थोतांड बंद कर!" तो मांत्रिकाकडे बोट दाखवत म्हणाला.
"मुला, तू अजाण आहेस म्हणून माफ करतोय तुला. पण तुझ्या बायकोचा इलाज अजून बाकी आहे." मांत्रिक म्हणाला.

--
विद्याधर भिसे
vnb2005@gmail.com


0 comments:

टिप्पणी पोस्ट करा

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.

मोगरा फुलला दीपावली अंकाबद्दलचा आपला अभिप्रायही अवश्य नोंदवा.

काही सूचना किंवा सल्ले द्यायचे असतील तर इथे क्लिक करा.

वरील साहित्यावरही आपली प्रतिक्रिया अवश्य द्या.

धन्यवाद.


Creative Commons License
मोगरा फुलला ई-दीपावली अंकामधील कोणत्याही प्रकारचे साहित्य हे Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 3.0 Unported License च्या अंतर्गत सुरक्षित आहे. अंकातील साहित्याच्या पुन:प्रकाशनाचे व्यापक अधिकार हे अंकातील साहित्य कोणत्या प्रकारचे आहे, यावर अवलंबून आहेत.


© 2011 Mogaraa Fulalaa. मोगरा फुलला ई-दीपावली अंक हा ’मोगरा फुलला’चाच एक भाग आहे. मोगरा फुलला ई-दीपावली अंकात प्रकाशित झालेल्या साहित्याचे सर्व हक्क हे त्या साहित्याच्या मूळ निर्मात्यांकडेच सुरक्षित आहेत. मोगरा फुलला दीपावली अंकाच्या प्रकाशित होणा-या आवृत्तीमधील कुठल्याही साहित्याच्या पुन:प्रकाशनासाठी संबंधित साहित्याच्या मूळ निर्मात्यांशी संपर्क साधावा अथवा मोगरा फुलला ई-दीपावली अंकाच्या संपादकांशी mogaraafulalaa@gmail.com या आयडीवर संपर्क साधावा.