क्रांति साडेकर

गुणीजन, नमस्कार.

मी क्रांति साडेकर, पूर्वाश्रमीची क्रांति छत्रपति. बीएसएनएलमध्ये नोकरी करतेय. मूळची सोलापूरची, "अन्नासाठी दाही दिशा" फिरत फिरत सध्या नागपूरला स्थिरस्थावर झाले. कळायला लागलं, तशी शब्दांशी मैत्री झाली, गाण्यांशी गट्टी झाली, संगीताशी सख्य जुळलं. माझ्या बाबांनी दाखवलेली पुस्तकांची दुनिया अलिबाबाच्या खजिन्यासारखी अनमोल होती. वाचता वाचता आपणही काहीतरी लिहावं असं वाटायला लागलं आणि १० व्या वर्षी पहिली कविता जन्माला आली. अर्थात त्या वयासारखीच अल्लड, अवखळ, बाळबोध. मग छंदच लागला कवितांचा. गाण्यांच्या सहवासामुळे आपोआपच छंद, गेयता येत गेली. त्यातच उर्दू गज़ल प्रकाराची ओळख झाली आणि "आपण असं का नाही लिहू शकत?" असं वाटून त्या दृष्टीनं प्रयत्न झाले. एखाद्या कर्मदरिद्र्याला परीस मिळावा, तसे कै. सुरेश भटकाका भेटले त्याच वेळी! माझं वय होतं १४ वर्षं. बाबांनी त्यांना माझ्या काव्य[?]लेखनाबद्दल सांगितलं आणि ते बाळबोध वाङ्मय त्यांना वाचायलाही दिलं. त्यातलं एक काव्य वाचून ते मला म्हणाले, "हे तूच लिहिलंस?" मी म्हटलं, "हो, हे सगळं मीच लिहिलंय." "शक्यच नाही. हे तुला बाबांनी लिहून दिलं असेल. तू असं लिहिणं कसं शक्य आहे?" मग बाबा बोलले, "नाही, ते खरंच तिनं लिहिलंय."

"स्वप्नवेड्या पापण्यांना आसवांचा शाप का?
पुण्यवंतांच्या जगी या पुण्य ठरते पाप का?
कोणते हे जीवघेणे दु:ख गासी कोकिळे?
भासती भेसूर रडणे हे तुझे आलाप का?"

काकांनी पुन्हापुन्हा त्या ओळी वाचल्या, त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव क्षणाक्षणाला बदलत राहिले. मग ते म्हणाले, "अगदी अशाच स्वरूपाचं मी सांगतो त्या विषयावर लिहून दाखवशील आत्ता?"

"प्रयत्न नक्कीच करेन." इति मी.

काकांनी मला ’जीवन’ हा विषय दिला. त्यांच्या आणि बाबांच्या गप्पा सुरू झाल्या आणि मी जीवनाची गझल लिहायला लागले. काही वेळानं मी माझी डायरी काकांच्या हातात दिली. "छत्रपति, तुझी पोरगी कमाल आहे! आजपासून ती माझी शिष्या आणि वारसदार झाली. अरे, काय लिहिलंय रे या वयात तिनं! पोरी, माझे आशिर्वाद आहेत तुला. तू मराठी गज़लच्या क्षेत्रात मोठी क्रांति करशील." काकांनी माझं लिखाण वाचून केलेलं हे कौतुक ऐकून मी आणि माझे बाबा दोघेही धन्य झालो. माझी घोडदौड सुरू झाली या क्षेत्रात. काकांनी मला गज़ल कशी असावी, तिचं तंत्र, शब्दांची निवड, रदीफ़-काफ़िया-अलामत या प्रत्येक विषयांवर बहुमोल मार्गदर्शन केलं. त्यांचा एल्गार प्रकाशित झाल्यावर आठवणीनं त्यांच्या आशिर्वादासह त्याची एक प्रत मला पाठवली.

पुढे काही दिवसांनी बर्‍याच घडामोडी झाल्या आयुष्यात. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. त्या उलथापालथीत एखादी जीवघेणी वावटळ यावी, आणि सगळं जग इकडचं तिकडं व्हावं, तसा बहर ओसरून गेला. लेखणीला आराम मिळाला. तब्बल २२ वर्षं हा पानगळीचा ऋतू आयुष्यात ठाण मांडून बसला. त्याच दरम्यान एकदा बाबांसोबत भटकाकांना भेटायला गेले त्यांच्या घरी. ते काहीतरी लिहित बसले होते. त्यांचा पहिला प्रश्न होता, "कुठं आहे तुझा गज़लसंग्रह?"

"काका, मी लिखाण बंद केलंय." माझं गुळमुळीत उत्तर ऐकून काका अक्षरश: संतापले, ते स्वत: लिहित असलेले समोरचे कागद त्यांनी भिरकावले आणि मला म्हणाले, "तू असं म्हणूच शकत नाहीस, एक दिवस असा येईल, की या निर्णयाचा तुला पश्चाताप होईल. तू जगू शकणार नाहीस लिहिल्याशिवाय, लक्षात ठेव माझे हे शब्द!"

एखाद्या दगडासारखी मी ढिम्म राहिले तरीही! दरम्यान काका गेले, मागोमाग बाबाही गेले. मध्यंतरी आलेल्या एका विचित्र वादळात लेकींनी जपलेल्या माझ्या कवितांच्या डायर्‍या अग्निदेवतेच्या चरणी अर्पण झाल्या. त्यानंतर मात्र एक दिवस खरंच माझी अवस्था "जल बिन मछली" अशी झाली. लेकींनी आईची तगमग ओळखली. मग "ए आई, मला पर्यावरणावर एखादी कविता लिहून दे ना गं", "मला गुरुपौर्णिमेसाठी सांग ना, नवीन काहीतरी", "स्पर्धेसाठी एकांकिका लिही ना आमच्या", असं करत करत त्यांनी मला पुन्हा लिहिती केली.

अचानकच जाऊ पहात असलेला सृजनाचा वसंत पुन्हा पलटून आला जीवनात. त्यानं ओळखीची शीळ घातली, त्याच्या हळुवार आर्जवांनी आणि जादुई स्पर्शानं या वठलेल्या फांदीवर पुन्हा आंबिया बहर आला. त्यातच आंतरजालाशी माझी ओळख झाली, मिसळपाव, मायबोली, सुरेशभट.इन यांसारख्या संस्थळांवर मुक्त वावर सुरू झाला, जगभरातल्या रसिक वाचकांची भरभरून मिळालेली दाद मला कुठच्या कुठे घेऊन गेली! मग जालीय मित्रमंडळींच्या मोलाच्या मदतीनं ब्लॉग बनवले, त्यावर मनात येईल ते लिहीत आणि दाद मिळवत गेले. शब्दबंधच्या ई-सभेत अभिवाचन केलं. खूप खूप काही मिळवलं या प्रवासात, जे आजवरच्या आयुष्यात कधीच मिळालं नव्हतं. "ताई, तुझा काव्यसंग्रह कधी प्रकाशित करतेस?" "ए, तू तुझ्या सुंदर गज़लांचा अल्बम का नाही काढत?" "तुझ्या ब्लॉगची एन्ट्री केलीस का स्पर्धेसाठी?" असं आपुलकीनं विचारणारे जगभरातले मित्र-मैत्रिणी, "क्रांति, तुझ्या कविता पाठवायच्या आहेत हं आपल्या अंकासाठी." असं हक्कानं सांगून कौतुकाची शाबासकी देणारी आपली माणसं, माहेर-आजोळ, बरंच काही.

"कोमेजल्या वेलीला या चैत्रपालवी फुटावी
विधात्याने मुक्तहस्ते सारी दौलत लुटावी
आज मनातल्या दाट काळोखाचा अंत व्हावा,
उजळून जावे विश्व, अशी पुनव भेटावी"

अशी पुनव मला खरंच अवचित भेटली, तिनं माझं अंधाराचं आयुष्य उजळून स्वर्गीय अनुभूती दिली. आज खूप मोकळं मोकळं वाटतंय! मनातलं, अगदी मर्मबंधातलं सारं काही सांगितलं माझ्या जीवलग मित्रमैत्रिणींना!

ही माझी वेडीची साठा उत्तराची कहाणी!

--
क्रांति साडेकर
krantisadekar@gmail.com
संपादन सहाय्य
मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०१०

8 comments:

सौरभ १ नोव्हेंबर, २०१० रोजी १२:४२ AM  

वाह!!! दस्तुरखुद्द श्री सुरेश भटांचे आशीर्वाद!!! आणि २२ वर्षे लिखाणबंद!!! असो... पुढील सर्व लिखाणांसाठी आणि दिवाळीच्याही हार्दिक शुभेच्छा... :)

कल्पी २६ नोव्हेंबर, २०१० रोजी ९:१९ AM  

क्रांती हे मी आज वाचले ,मन भरुन आले तुझ्याबद्दल वाचुन
अशीच वाटचाल सुरु ठेव ,,,,,कै.सुरेश भटांचे वाक्य खरे होईल गज़लेच्या दुनियेत खरोअखर क्रांती होईल
कल्पी

जयश्री अंबासकर १९ डिसेंबर, २०१० रोजी ३:०१ PM  

क्रांति....अगं काय लिहिलंस गं........!! डोळे भरुन आले अगदी !! तुझ्या प्रतिभेची पालवी दिवसागणिक फुलत राहो हिच ईश्वरचरणी प्रार्थना !

Ranjeet Paradkar ११ जून, २०११ रोजी ५:४४ PM  

तुमचा प्रवास आणि प्रवास वर्णन दोन्ही अचंबित करून गेलं क्रांति ताई.. I am humbled..

अनामित,  ५ डिसेंबर, २०१२ रोजी २:३३ PM  

क्रांती ताई, तुम्ही खरेच ग्रेट आहात....विश्वजीत गुडधे

Deeptis world १७ जानेवारी, २०१३ रोजी ११:२० AM  

आजच एका मित्राच्या फसेबूक पेज वर तुमची लेकीवरची कविता वाचली . अस वाटल, मला जे जे म्हणायाचहोत ते ते सगळ तुम्ही इतक्या सहज सुंदर श्ब्दात लिहिलय. तुमचा ब्लॉग नाही सापडला पण .कृपया लिंक देता का? तुमच्या सगळ्या कविता वाचायाच्या आहेत

Smita Vaidya ३ मे, २०१४ रोजी ११:४५ AM  

क्रांतीताई मी तुमची जबरदस्त फॅन आहे. फेसबुक वर मी तुमच्या कविता वाचते. त्या उर्दु गजल आणि मराठी कविता सुद्धा फ़ार सुंदर असतात. वरील लेख वाचून डोळे खरंच भरुन आले. तुम्हांला देव उदंड आयुष्य देवो. तुमच्या प्रतिभेला बहर येवो आणि आम्हांला तुमचे लेखन असेच वाचायला मिळो.

टिप्पणी पोस्ट करा

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.

मोगरा फुलला दीपावली अंकाबद्दलचा आपला अभिप्रायही अवश्य नोंदवा.

काही सूचना किंवा सल्ले द्यायचे असतील तर इथे क्लिक करा.

वरील साहित्यावरही आपली प्रतिक्रिया अवश्य द्या.

धन्यवाद.


Creative Commons License
मोगरा फुलला ई-दीपावली अंकामधील कोणत्याही प्रकारचे साहित्य हे Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 3.0 Unported License च्या अंतर्गत सुरक्षित आहे. अंकातील साहित्याच्या पुन:प्रकाशनाचे व्यापक अधिकार हे अंकातील साहित्य कोणत्या प्रकारचे आहे, यावर अवलंबून आहेत.


© 2011 Mogaraa Fulalaa. मोगरा फुलला ई-दीपावली अंक हा ’मोगरा फुलला’चाच एक भाग आहे. मोगरा फुलला ई-दीपावली अंकात प्रकाशित झालेल्या साहित्याचे सर्व हक्क हे त्या साहित्याच्या मूळ निर्मात्यांकडेच सुरक्षित आहेत. मोगरा फुलला दीपावली अंकाच्या प्रकाशित होणा-या आवृत्तीमधील कुठल्याही साहित्याच्या पुन:प्रकाशनासाठी संबंधित साहित्याच्या मूळ निर्मात्यांशी संपर्क साधावा अथवा मोगरा फुलला ई-दीपावली अंकाच्या संपादकांशी mogaraafulalaa@gmail.com या आयडीवर संपर्क साधावा.