मला संस्कृत बोलायला शिकायचं आहे

प्रस्तावना

लहानपणी पाहिलेली स्वप्ने पूर्ण होतातच असे नाही. कारणे काहीही असोत. पण वयाचं अर्ध शतक ओलांडल्यावरही तेच स्वप्न कायम राहिलं तर ते सत्यात उतरवणं निकडीचं होऊन बसतं. मला संस्कृतमध्ये संभाषण करायचे आहे हे स्वप्न पाहणारी मी एकटी नक्कीच नाही. त्यामुळे हा माझा मार्ग एकला अशी परिस्थिती नक्की नाही.

मध्ययुगात काही आडमुठी धोरणं राबवण्यासाठी, संस्कृत ही क्लिष्ट आणि कठीण भाषा आहे, ही समजण्यासाठी लागणारी आवश्यक ती बुध्दिमत्ता सर्वसामान्यांजवळ नाही, त्यांना ती येणारच नाही, असा सर्वसामान्यांचा ग्रह पध्दतशीरपणे करून देण्यात आला. जनमानसावर तो पगडा आजही बऱ्याच प्रमाणात आहे. इतर भाषांप्रमाणेच संस्कृत ही बोलीभाषा आहे, आता समकालीन अशी नवी संस्कृत भाषा तयार होते आहे, सोपी होते आहे हे लोकांना समजावं म्हणून हा लेखन-प्रपंच!

मला संस्कृत बोलायला शिकायचं आहे!

पस्तीस वर्षांपूर्वी शाळेच्या निरोप-समारंभात बाईंनी प्रश्न विचारला होता, तुम्हाला पुढे काय शिकावसं वाटतं? माझं उत्तर ऐकून विद्यार्थीवर्गच नव्हे तर शिक्षकवर्गही खुदूखूदु ते खोखो हसला होता. संस्कृतच्या भटबाई तेवढ्या गालातल्या गालात समाधानाचं हसू हसल्या होत्या. दोष हसणा-यांचा नव्हता. तो काळच तसा होता. चांगले गुण मिळवणारे सर्व शास्त्र शाखेत प्रवेश घेऊन पुढे डॉक्टर, इंजिनीअर, प्राध्यापक वगैरे होत. त्यावेळच्या स्टॅडर्डप्रमाणे मलाही चांगले गुण मिळाले. त्यानंतर घरात आणि शाळेतही अनेक विरूध्द एक मी बापडी असा सामना काही दिवस रंगला. साहजिकच अनेक जिंकले आणि मी निमूटपणे शास्त्रशाखेत प्रवेश घेतला. जे करायचे ते मनापासून असे संस्कार असल्यामुळे पदरी पडलं ते गणित आणि संख्याशास्त्र शिकले आणि पुढे शिकवलेही! यथावकाश लग्न, मुलं, त्यांच्या शाळा, त्यांचा अभ्यास, पुढे त्यांचं महाविद्यालय, .... अशी नेहमीची ठराविक स्टेशनं घेत गाडी विनातक्रार पूढे सरकत राहिली. मुले मोठी झाली, स्वतःचा अभ्यास स्वतःच करू लागली तशी माझी मूळ इच्छा डोकं वर काढू लागली.

आतातरी आपल्या मनाचा कौल मानायचाच असा निश्चय केला. मुलुंडमध्ये नव्या घरी आल्यावर संधी मिळताच संस्कृतभारतीची वाट धरली. आत्तापर्यंत कोर्‍या झालेल्या पाटीवर पुन्हा गिरवायला सुरूवात केली. अहो आश्चर्यम्! पाटीवर अक्षरं आपोआप उमटू लागली. बालवयात शिकलेलं काहीच वाया जात नाही हेच खरं!

कोणतीही भाषा आत्मसात करण्यासाठी चार सोपान आवश्यक असतात. सोपान म्हणजे पायरी. श्रवण, भाषण, पठण(वाचन), लेखन. लहान मूल आईकडून थेट भाषा शिकतं ते पहिल्या दोन सोपानांच्या आधारेच! तीच पध्दत संस्कृतभारतीच्या वर्गात वापरली जाते. आपणही तेच धोरण ठेवायला हवं हे पटलं. संस्कृत माध्यमातून संस्कृत शिकवायची त्यांची धडपड पाहिली की कौतुक वाटतं. त्यातून शिक्षक माझ्या मुलांना दादा आणि ताई म्हणतील या वयाचे! चुकलं तरी न चिडता, न रागावता समजावून सांगतात. एकूणच हसत खेळत शिकण्यावर भर दिला जातो.

ज्ञानात रोज भर पडत होती. आपल्या देशात भरत नावाचा अतिपराक्रमी राजा होऊन गेला. त्याच्या नावावरून देशाचं नाव भारत असं पडलं हे लहानपणी बाईंनी सांगितल्याचं आठवतंय. भारतः= भा + रतः . म्हणजे तेजाने परिपूर्ण. असा अर्थ प्रथमच कळला. एका टिनेजरने समजावून सांगितला तेव्हा माझा त्याच्याबद्दलचा आदर द्विगुणीत झाला. ज्या देशाने गेली अर्धशतक माझं पालन-पोषण केलं, मला प्रगतीच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या, त्या माझ्या देशाबद्दल मला किती कमी माहिती आहे हे प्रकर्षाने जाणवलं. मनाची समजूत घातली, जाऊ दे! संधी मिळाली तर नातवंडांना सांगीन भारतःचा हा अर्थ!!

निशा, अगं कित्ती बोलते, कित्ती बोलते अं? जरा गप्प बसायला काय घेशील? शाळेतील तमाम बाईंची माझ्याबाबतीत ही नेहमीची तक्रार होती. पण संस्कृत वर्गातला खाक्याच वेगळा! इथे शिक्षक म्हणतात, "निशाभगिनी, वदतु. किमपि वदतु!" पण अंहं!! निशा भगिनी गप्प!!! कालाय तस्मै नमः. थोडी श्रवणभक्ती, व्याकरणाचं तुटपुंजं ज्ञान, थोडाफार अभिनय (जो सर्वांनाच येतो) आणि आत्यंतिक इच्छा यांच्या बळावर मी थोडसं धाडस केलं आणि घरात सर्वांना वेठीला धरलं. जेवायच्या टेबलावर "ओदनम् आवश्यकं किम्?", "सुपं पर्याप्तं वा?" असे प्रश्नं विचारून नवर्‍याला भंडावून सोडलं. "जलम् आनयतु" "शीघ्रं शीघ्रं न खादतु, शनैः शनैः खादतु" अशा सुचनांचा लेकीवर भडिमार होऊ लागला. वर्षातून एकदा घरी येणारा मुलगाही यातून सुटला नाही. मी बोललेलं कळतं त्यांना. का नाही कळणार? काही वर्षांपूर्वी " घरात तरी मराठीच बोलायचं" असा मी माझ्या अखत्यारीतला फतवा काढला होता. आग्रहाने पाळायलाही लावला होता. तो फतवा मीच मोडीत काढते आहे असं चित्र मुलांना दिसू लागलं. मुलांना गंमत वाटली. मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि संस्कृत मातृभाषेची जननी आहे असं सांगून मी त्यांना गप्प केलं. "ए दादा, आपण लहानपणी चांदोबा वाचायचो ना तसा आई संस्कृतचंदमामा वाचते." असं त्यांना कुजबुजतांना आणि खुदुखुदू हसतांना मी माझ्या या कानांनी ऐकलंय. मुलं श्रवण या पहिल्या पायरीवर तर आहेत या समाधानात असते!

एव्हाना मी संस्कृतभारतीची, 'संस्कृत भाषाप्रवेश-प्रथम' ही परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. जेवायच्या टेबलावर दोन-चार शब्दांची वाक्यं बनवून बोलणं वेगळं आणि मनात येणारे विचार संस्कृत मध्ये शब्दबध्द करणं वेगळं हे लक्षात आलं होतं. प्रत्येक भाषेचे दोन स्तर असतात. लेखनस्तर आणि बोली भाषेचा स्तर! लेखनस्तर म्हणजे पुस्तकी भाषा. जी रोजच्या व्यवहारात वापरली तर काहिशी कृत्रीम वाटते. बोली भाषा आपली सोपी. संस्कृत भाषेचंही तसंच आहे. संस्कृत भाषेत अतिप्राचीन काळी सर्वोत्तम म्हणता येईल असं लेखन झालं आहे. आजही काव्य, नाटक आणि तत्वज्ञान विषयक भरपूर साहित्य उपलब्ध आहे. वेद, उपनिषदे, योगशास्त्रे, पुरातन ग्रंथ यातील ज्ञान संस्कृत काव्यात आहे. भारतातील वेगवेगळ्या पंथांच्या धर्मग्रंथातही संस्कृतच आहे. गेल्या काही वर्षात मानवाची अनेक क्षेत्रात, अनेक शास्त्रांत विलक्षण प्रगती झाली आहे. भरभराट झाली आहे. सर्वच भाषांमध्ये अनेक नवे शब्द निर्माण झालेत. आजही होताहेत. नवे शब्द तयार करण्याचं तंत्र संस्कृत भाषेत सहजसाध्य आहे. त्यामुळे समकालीन अशी नवी संस्कृत भाषा तयार होते आहे. मध्ययुगात काही आडमुठ्या धोरणामुळे संस्कृत भाषा सामान्य जनांपर्यंत पोचली नाही. त्यामुळे संस्कृत ग्रंथातील ज्ञानापासून ते वंचितच राहिले. पण आता परिस्थिती बदलते आहे. इच्छा मात्र आत्यंतिक हवी!

आपापले पोटापाण्याचे उद्योग सांभाळून फावल्या वेळात संस्कृतच्या प्रेमापोटी संस्कृतचा प्रसार आणि प्रचार करणार्‍या संस्कृतभारतीच्या वरिष्ठ शिक्षकांच्या लक्षात आलं, ही बाई धडपडी दिसतेय! ते म्हणाले "बिनधास्त बोलायचं मॅडम, चुकलं तर चुकलं. इथे इतरांचं बोलणं ऐकून आपल्या चुका आपणच सुधारायच्या. आम्ही आहोतच मदतीला. गीताशिक्षण केंद्रात या. थेट संस्कृत भाषेतून गीता समजावून घ्या! गीता माध्यमातून संस्कृत आणि संस्कृत माध्यमातून गीता. एकाच वेळी! दुग्धशर्करायोगः" आंधळीला अजून काय हवं?

गीताशिक्षण केंद्रात प्रवेश घेतला आणि सुटलेच! मनात येणारे विचार रोज दहा वाक्यात लिहायचेच असा संकल्प केला आणि वहीशी मैत्री केली. रोजनिशीच म्हणा ना! एक अघटित घडलं. बालपणापासून कधीही पूर्णत्वास न गेलेली इच्छा पूर्ण झाली. दर्जा अर्थातच सूमार असणार! संस्कृतदिन साजरा करतांना सर्वांपूढे काही विचार मांडले. माझ्या काहीशा विनोदी शैलीत मांडले. माझ्यासारखंच जेमतेम संस्कृत जाणणारे हसले. संस्कृत चांगलं समजणारेही हसले. अर्थात वेगळ्या कारणासाठी! असो. भाषा आधी प्रवाही व्हायला हवी, शुध्द अशुध्द नंतर! मी माझ्या विद्यार्थ्यांना जे आजवर ऐकवत आले तेच स्वतःला पुन्हा पुन्हा ऐकवलं. अंतिम यश महत्वाचं असतंच. प्रयत्न करीत प्रत्येक पायरीवर मिळवलेलं यशही तेव्हढ्याच तोलामोलाचं असतं!

गेल्या वर्षी गोव्याला संस्कृतभारतीचा संस्कृत भाषाबोधन वर्ग झाला. तब्बल दोनशे संस्कृतप्रेमी लोकांनी हजेरी लावली होती. त्यात डॉक्टर्स, इंजिनीअर्स, वैज्ञानिक, प्राध्यापक,सी. ए.,असे उच्चविद्याविभूषितही होते. शाळा व महाविद्यालयात शिकणारी नवी पिढीही मोठ्या संख्येने उपस्थित होती. संस्कृतमध्ये उच्च पदवी घेतलेले काहिजणही संभाषण करायचे कसे हे जाणून घ्यायला आले होते. थोडक्यात काय, व्याकरण आलं म्हणजे बोलता येईलच असे नाही. समानधर्मेषु अनेक लोक भेटल्यामुळे अंगी नवं चैतन्य संचारलं.

पाच दिवसांच्या या निवासी वर्गात संस्कृतमध्ये संभाषण करणे अनिवार्य होते. इतर कोणत्याही भाषेचा वा मोबाईल फोनचा वापर निषिध्द होता. रोज दुपारी आणि रात्री जेवण्यापूर्वी गीतेचा बारावा अध्याय आणि भोजनमंत्राचं पठन होत असे. फातर्फ्याच्या शांतादुर्गा मंदिराचा विस्तीर्ण परिसर, भारतीय पध्दतीची पंक्तीची भोजन-व्यवस्था, दोनशे आवाज एका सूरात,शब्दोच्चारण स्पष्ट आणि योग्य व्हावं यासाठी जागरूक असलेला शिक्षकवर्ग, मंत्रोच्चारणाने भारलेला संपूर्ण परिसर मला माझ्या बालपणीच्या आजोळी घेऊन गेला.ते वातावरण पुन्हा एकदा जीवंत झाले. हरवलेले काहीतरी पुन्हा एकदा गवसल्यागत वाटले.

तिथेच एक मनोहारी दृश्य पाहायला मिळाले. चार-पाच कुटुंबं अशी होती, ज्यात आई-बाबा आणि मुले आपापसात संस्कृतमध्ये संभाषण करीत होते. त्या कुटुंबातील आईने, घरात तरी संस्कृतच बोलायचं असा वटहुकुम काढल्यागत! एकदा दुपारी काही कारणाने रुसून चार-पाच वर्षाची एक चिंगी "आम्ही नाही जा" अशा आविर्भावात संस्कृतमध्ये काहीतरी बडबडली. मला हसू आलं. दुसर्‍या दिवशी सकाळी तिची आई तिला उत्तीष्ठ, उत्तीष्ठ म्हणत उठवायचा प्रयत्न करीत होती. आंजारत गोंजारतही होती. "न इदानींम् न" असं म्हणत ती अंगाचं आणखीच मुटकुळं करीत होती. तेव्हा खरी माझी विकेट पडली. जागृतावस्थेत आणि अर्धजागृतवस्थेतही या चिमुरडीच्या मुखी संस्कृतच आहे. ही पोर संस्कृत माध्यमातून विचार करते आहे.

एके काळी भारतात भारतीय संस्कृती सुखाने नांदत होती. आता परकीय संस्कृतीही जोडीला आली आहे. एकाच देशाचे भारत आणि इंडिया असे दोन भाग दिसत आहेत. अशा वेळी परकीय संस्कृतीतील चांगले तेच घ्यावे व आपल्या संस्कृतीतील चांगले ते टिकवावे असा दृष्टीकोन ठेवायला हवा. संस्कृत आणि भारतीय संस्कृती यांचा घनिष्ठ संबंध आहे. भारतीय संस्कृती टिकवायची असेल तर संस्कृतशी जास्तीत जास्त जवळीक निर्माण व्हायला हवी. भारत आणि इंडिया यांना जोडणारा सेतू बांधणे आवश्यक झाले आहे. या कामात ती चिमुरडी खारीचा वाटा उचलते आहे. अजाणतेपणीच!

आजही इतक्या वर्षांनी संस्कृत शिक्षणाबद्दलची समाजाची मानसिकता फारशी बदललेली दिसत नाही. तसेच मध्य युगातील आडमुठी धोरणे आजही राबवली जात आहेत. कधी उघड-उघड, तर कधी आडून-आडून. हे सर्व पाहून मान दुखी होते. पण या कशाचाही गंध नसलेली ही मुलगी अतिशय निर्व्याज मनाने संस्कृत माध्यमातून आधी संस्कार आणि मग संस्कृती पर्यंत पोचू पाहते आहे. याचा आनंदही होत आहे.

--
निशा पाटील
patil.nisha178@gmail.com

3 comments:

iravatee अरुंधती kulkarni २ नोव्हेंबर, २०१० रोजी १०:१९ PM  

लेख अतिशय आवडला! मी देखील मध्यंतरी हौसेने संस्कृत संभाषण वर्गांना जात होते. तेव्हा घरी, वर्गांत संस्कृत मध्ये बोलले जायचे. पण तो वर्ग संपला आणि घरी संस्कृत बोलणेही संपले. तुमचा लेख वाचून त्या आठवणी जाग्या झाल्या! :-)

Nisha ३ नोव्हेंबर, २०१० रोजी ११:१८ AM  

धन्यवाद. संभाषण शिबीर ही तर पहिली पायरी. दुसर पाऊल टाकल की पहिल पक्क होत. आनंदाची गोष्ट ही की संस्कृतभाषाबोधनवर्ग मुंबईत होतोय. 11 ते 16 नोव्हे. रस असेल तर सांगा. मी अधिक माहिती देईन. पुन्हा एकदा धन्यवाद.

अपर्णा ४ नोव्हेंबर, २०१० रोजी ९:४४ AM  

आमचा एक कानडी मित्र अमेरिकेत त्याच्या घराच्या आसपास राहणाऱ्या इच्छुकांना संस्कृत शिकवतो...मी त्याच्याकडे जायचा विचार करतच होते की आमच मुक्कामाच ठिकाण बदलल ....तुमचा अनुभव वाचयला आवडला...

टिप्पणी पोस्ट करा

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.

मोगरा फुलला दीपावली अंकाबद्दलचा आपला अभिप्रायही अवश्य नोंदवा.

काही सूचना किंवा सल्ले द्यायचे असतील तर इथे क्लिक करा.

वरील साहित्यावरही आपली प्रतिक्रिया अवश्य द्या.

धन्यवाद.


Creative Commons License
मोगरा फुलला ई-दीपावली अंकामधील कोणत्याही प्रकारचे साहित्य हे Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 3.0 Unported License च्या अंतर्गत सुरक्षित आहे. अंकातील साहित्याच्या पुन:प्रकाशनाचे व्यापक अधिकार हे अंकातील साहित्य कोणत्या प्रकारचे आहे, यावर अवलंबून आहेत.


© 2011 Mogaraa Fulalaa. मोगरा फुलला ई-दीपावली अंक हा ’मोगरा फुलला’चाच एक भाग आहे. मोगरा फुलला ई-दीपावली अंकात प्रकाशित झालेल्या साहित्याचे सर्व हक्क हे त्या साहित्याच्या मूळ निर्मात्यांकडेच सुरक्षित आहेत. मोगरा फुलला दीपावली अंकाच्या प्रकाशित होणा-या आवृत्तीमधील कुठल्याही साहित्याच्या पुन:प्रकाशनासाठी संबंधित साहित्याच्या मूळ निर्मात्यांशी संपर्क साधावा अथवा मोगरा फुलला ई-दीपावली अंकाच्या संपादकांशी mogaraafulalaa@gmail.com या आयडीवर संपर्क साधावा.