संपादकीय

शुभ दीपावली!

'मोगरा फुलला’च्या सर्व मित्रमैत्रीणींना, हितचितकांना, सहभागी लेखक-कवी-कलाकारांना आणि समस्त वाचकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! ही दीपावली व येणारे वर्ष आपल्याला आनंदाचे, सुखा-समाधानाचे व भरभराटीचे जावो ही सदिच्छा!

आपलं तांत्रिक ज्ञान व लेखणी वापरून, इंटरनेटवर लेखकू स्वत:ला आत्मविश्वासाने ’लेखक’ म्हणवू शकला आहे, तो या ब्लॉगिंगमुळे आणि ब्लॉगची सुविधा मोफत उपलब्ध करून देणार्‍या ब्लॉग होस्टींग कंपन्यांमुळे. ब्लॉगसारखं व्यासपीठ उपलब्ध करून देणार्‍या सर्व ब्लॉग होस्टींग कंपन्यांचे समस्त ब्लॉगर्स-लेखकांतर्फे मन:पूर्वक आभार! ब्लॉगसारख्या सुविधेमुळेच मोगरा फुललालादेखील गेली दीड वर्षे विविध प्रकारचं साहित्य व या वर्षी एक ई-दिवाळी अंक प्रकाशित करण्याची संधी मिळाली.

मोगरा फुललातर्फे प्रकाशित झालेला हा पहिलाच दिवाळी अंक. पण साहित्य निवडताना चोखंदळपणे निवडलं. बरेच ब्लॉगर्स दर्जेदार लेखन करतात, परंतू निरनिराळ्या कारणास्तव त्यांच्या लेखनाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. अशा ब्लॉगर्सचे पूर्वप्रकाशित लेखनही मोगरा फुललाने ई-दीपावली अंकात समाविष्ट केले आहे. काही हौशी लेखक उत्तम लिहीतात परंतु त्यांना ब्लॉगिंगचे ज्ञान नाही, अशा लेखकांचं साहित्यही या अंकात वाचण्यासाठी उपलब्ध करून दिलं आहे. जे चांगलं आहे ते सर्वांसमोर आलं पाहिजे, हा यामागचा प्रांजळ हेतू आहे. कदाचित अप्रकाशित साहित्याचा अट्टहास न धरल्यामुळे असेल पण साहित्यरूपी प्रतिसाद उदंड मिळाला. काही साहित्य साभार परतही पाठवावे लागले आहे. त्यामागे ’दर्जा’ हे एकमेव कारण नसून, समीक्षेसाठी वेळेचा अभाव, फॉन्ट अनुरूप नसल्याने पुनर्लेखन करावे लागणे, मुदतीनंतर साहित्य प्राप्त होणे इ. कारणेदेखील आहेत. या उदंड साहित्यामधून वेचक व वेधक असे साहित्य निवडले आहे खास आपल्यासाठी!

साहित्य आल्यानंतर ते संपूर्ण वाचून, प्रत्येक वाक्याचा व ओळीचा अर्थ समजून घेणं आणि शुद्धलेखनाकडे लक्ष देणं, हे प्रचंड क्लिष्ट काम आहे. संपादन सहाय्य मंडळाने हे काम अतिशय जबाबदारीने पार पाडलं, याचा मोगरा फुललाला निश्चितच अभिमान आहे आणि राहील. उल्हास भिडे व भाग्यश्री सरदेसाई यांनी गद्य लेखन, तर क्रांति साडेकर यांनी पद्य लेखनाची समीक्षा करताना आपला त्या त्या क्षेत्रातील अनुभव पणाला लावला असंच म्हणावं लागेल.

भाग्यश्रीताई सध्या भारतात नाशिक येथे वास्तव्य करून आहेत. त्यांना वीज-भारनियमनाची असुविधा दिवसातील दहा ते बारा तास सोसावी लागते. असे असूनही नेहमी हसतमुखाने त्यांनी आपल्या दीपावली अंकासाठी संपादन सहाय्य दिलं.

क्रांतिताई आपल्यासारख्याच एक ब्लॉगर. मात्र त्यांची पद्य लेखनाची समज जबरदस्त आहे. स्वत:ची नोकरी आणि घर सांभाळून, त्यांनी समीक्षेसाठी आलेल्या प्रत्येक कवितेमधील आशय समजून घेतला. क्वचित अर्थबोध न झाल्यास सविस्तर चर्चा केली, यातच त्यांची साहित्याविषयची तळमळ दिसून येते.

उप-संपादक उल्हास भिडे यांनी अंकाचे दृश्यस्वरूप व वाचनसुलभता याकडे काटेकोरपणे लक्ष दिले. केवळ दूरध्वनीवरच नव्हे, तर प्रत्यक्ष भेटूनही त्यांनी या दोन विषयांवर सविस्तर चर्चा केली. गद्य साहित्याच्या संपादनातही त्यांनी हातभार लावला, तसेच खास वाचकांसाठी काही मनोरंजक कोड्यांची निर्मिती व संकलनही त्यांनी केले. खास मुखपृष्ठासाठी रचलेल्या चारोळीमधून तर त्यांनी जणू मोगरा फुललाचेच मनोगत व्यक्त केले आहे असे वाटते. खरं तर मोगरा फुललाचा दिवाळी अंकही प्रकशित व्हावा, ही कल्पना त्यांचीच! मात्र अतिशय नम्रपणे त्यांनी संपादकत्वाची जबाबदारी नाकारली.

फिरदोस कराई यांनीच यापूर्वी मोगरा फुललाचे हेडर व ओळखचिन्ह तयार केले होते. विनंतीनुसार त्याच मूळ हेडरमधे व ओळखचिन्हामधे दिवाळी अंकाच्या गरजेनुसार त्यांनी आकर्षक बदल करून दिले व आपली सर्जनशीलता सिद्ध केली, तसेच दिवाळी अंकासाठी समर्पक असे मुखपृष्ठही तयार करून दिले.

अंकामधे तांत्रिक बदल करण्यासाठी इंटरनेटवर खास ब्लॉगर्ससाठी तांत्रिक माहिती पुरवणार्‍या ब्लॉगर्सची अप्रत्यक्ष मदतही खूप मोलाची ठरली आहे. याशिवाय क्विलपॅडसारख्या संकेतस्थळामुळे मराठीतून प्रतिक्रिया टंकलिखित करता येण्याचा पर्याय थेट ब्लॉगवरच उपलब्ध करून देता आला. अवर ब्लॉग टेम्पलेट यांच्या आकर्षक टेम्पलेटमुळे या ई-दीपावली अंकामधे काही खास बदल करणं शक्य झालं. मोगरा फुललाच्या काही उत्साही वाचक आणि हितचिंतकांनी वारंवार फोन व ईमेल करून अंकासाठी मदत करण्याचं आश्वासन दिलं आणि तशी मदत केलीही.

या टीमवर्कचं चीज झालं आहे ते आपल्या साहित्यामुळे. अंकासाठी साहित्य पाठविताना लेखक-ब्लॉगर मंडळींनी अक्षरश: कसलीही कसर बाकी ठेवली नाही. अंकाची फारशी जाहीरात न करताही अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त असा प्रतिसाद लाभला. केवळ प्रस्थापित ब्लॉगर्सच नव्हेत, तर नवोदित ब्लॉगर्स व अब्लॉगर - म्हणजे ज्यांनी अजून स्वत:चा ब्लॉग सुरू करण्याचा दृष्टीनेही पाऊल उचललेलं नाही व ज्यांना स्वत:चा ब्लॉग सुरूही करायचा नाही, अशा लेखकांनीदेखील आपले साहित्य प्रसिद्ध करण्यासाठी मोगरा फुलला ई-दीपावली अंकाची निवड केली, या सगळ्यातच मोगरा फुललावरील लेखक-वाचकांचा विश्वास व प्रेम दिसून आलं.

आवडलेल्या साहित्यावर आपली प्रतिक्रिया अवश्य द्या. अंकातील सहभागींना मानधन मिळणार नसले, तरी आपल्या प्रतिक्रियाच त्यांच्यासाठी प्रेरणारूपी मानधन असेल. मोगरा फुललाच्या पहिल्यावहिल्या ई-दीपावली अंकाबद्दलचा आपला अभिप्रायदेखील जरूर नोंदवा.

गेल्या दीड वर्षांत मनातलं कागदावर उमटवण्याच्या प्रयत्नांना ब्लॉगिंगची जोड मिळाली. आपल्या सर्वांचे आशीर्वाद, व शुभेच्छा लाभल्या आणि इथवर येऊन पोहोचले. मागे वळून पहाताना लक्षात आलं की मोगरा खरंच खूप बहरलाय. हे तुमचंच प्रेम आणि विश्वास आहे. या लेखाला आपण मनोगत, ऋणनिर्देश किंवा संपादकीय असं काहीही समजा. संपादकीय लिहावं इतकी मोठी मी अजून झालेली नाही. ’मोगरा फुलला’ वरचा आपला लोभ, आस्था, आपला सहभाग आणि आपणां सर्वांकडून लाभलेलं सहकार्य यामुळेच ’मोगरा फुलला’ चा हा पहिला दिवाळी अंक आकारास आला आहे. हा लोभ उत्तरोत्तर वृद्धींगत व्हावा ही इच्छा. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा आणि तुम्हा-आम्हा, आपल्या सर्वांच्या या मोगरा फुलला ई-दीपावली अंकालाही एक वाचक म्हणून शुभेच्छा!

धन्यवाद.

कांचन कराई
admin@mogaraafulalaa.com
संपादक
मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०१०

37 comments:

Unknown १ नोव्हेंबर, २०१० रोजी १२:१३ AM  

मोगरा फ़ुलला हा ई दिपावली अंक अतिशय सुंदर असा झालेला आहे, आत्ताच पाहिला.
फ़क्त लेख वाचले नाहत पण मांडणी पाहता अणि एकंदरीतच अंकाचे स्वरुप पाहता हा अंक नक्कीच छान झाला असेल याची मला खात्री आहे.

THEPROPHET १ नोव्हेंबर, २०१० रोजी १२:२३ AM  

अंक अतिशय सुंदर झाला आहे आणि वरवरून पाहिल्यावर साहित्य आणि एकंदरच सर्व घटक मस्त जमल्याचं दिसतंच आहे. आता एक एक करून साहित्य वाचतो.

सौरभ १ नोव्हेंबर, २०१० रोजी १२:३२ AM  

अत्यंत सुंदर, आकर्षक आणि दर्जेदार साहित्य असलेला दिवाळी अंक आहे. दिवाळीच्या असंख्य शुभेच्छा...

हेरंब १ नोव्हेंबर, २०१० रोजी १२:४२ AM  

कांचन, क्रांती, श्रीताई, भिडे काका आणि श्री कराई, आपणा सर्वांचं मनापासून अभिनंदन... अंकाचं रुपडं खुपच छान देखणं झालं आहे. साहित्यही नक्कीच अतिशय दर्जेदारच असणार.. आता एकेक करत सगळे लेख/कविता वाचायला घेतो. इतक्या सुंदर अंकाबद्दल'टीम मोफु' चे मनापासून अभिनंदन आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!

Suhas Diwakar Zele १ नोव्हेंबर, २०१० रोजी ७:३३ AM  

अप्रतिम..निव्वळ अप्रतिम..
सगळ्यांच खूप खूप अभिनंदन...

प्रमोद देव १ नोव्हेंबर, २०१० रोजी ८:०१ AM  

कांचन आणि तिच्या चमूचे हार्दिक अभिनंदन. अंक अतिशय सुंदर आणि दृष्ट लागण्यासारखा झालाय.

अनामित,  १ नोव्हेंबर, २०१० रोजी ८:३९ AM  

कांचन ताई,अंक खरच खुप सुंदर झाला आहे.आताच पाहिला,हळुहळु वाचायला घेतोच पण अंकाच रुपड आणि मांडणी खुपच आवडली.तुम्हा सर्व संपादक मंडळाचे मनापासुन अभिनंदन...

शांतीसुधा (Shantisudha) १ नोव्हेंबर, २०१० रोजी ८:५३ AM  

मस्तच कांचन, अभिनंदन. दिवाळी अंक सुरेख झाला आहे. मुखपृष्ठ सजावट आणि चारओळी पण सुंदर-समर्पक आहेत. अंकाची मांडणीही छान झाली आहे. सध्या वेळेअभावी फक्त मुखपृष्ठावरच समाधान मानते आहे. वेळ मिळेल तसं त्यातील साहित्य वाचून त्यावर प्रतिक्रीया कळवेनच. सर्व संपादक मंडळाचे हार्दिक अभिनंदन आणि सर्वांना दिपावलीच्या शुभेच्छा!

Shreya's Shop १ नोव्हेंबर, २०१० रोजी ९:०८ AM  

मस्त , सुंदर, देखणा आणि वाचकांना वाचायला सुटसुटीत असा अंक.

मंदार जोशी १ नोव्हेंबर, २०१० रोजी १०:०६ AM  

अंक मस्त झालाय. सगळा वाचला नाही, पण सहज चाळल्यावर अंदाज येतोय.

धन्यवाद.

mau १ नोव्हेंबर, २०१० रोजी १०:०९ AM  

अप्रतिम !!!!!!!!!!!!!!!!!
सगळ्याचे खूप खूप अभिनंदन!!!!

मुक्त कलंदर १ नोव्हेंबर, २०१० रोजी ११:०५ AM  

अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अंक आहे. कारण मांडणी आणि संकलन अतिशय सुरेख झाले आहे. संपादक मंडळाचे मनपूर्वक अभिनंदन...

ulhasbhide १ नोव्हेंबर, २०१० रोजी ११:२७ PM  

सर्वांनी भरभरून दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

‘मोगरा फुलला’ वरचा तुमचा आजवरचा लोभ, अंकासाठी साहित्य पाठवून अनेकांनी घेतलेला प्रत्यक्ष सहभाग, संपादक मंडळाने कांचनच्या कुशल नेतृत्वाखाली पार पाडलेली जबाबदारी, तसंच असंख्य जाल-मित्रांच्या सदिच्छा; या सर्वाच फलित म्हणजे हा आपला ’मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०१०’.

इतका सारा पाठिंबा असल्यामुळेच मी माझा खारीचा वाटा उचलू शकलो.
लोभ आहेच, तो वृद्धिंगत व्हावा.
...... उल्हास भिडे

अनामित,  २ नोव्हेंबर, २०१० रोजी १२:०३ AM  

http://mfdiwaliank.blogspot.com/2010/09/://mfdiwaliank.blogspot.com/2010/10/paneer-biryani.html

is not opening i tried more than 20 times in 4 browsers
correct it

Kanchan Karai (Mogaraafulalaa) २ नोव्हेंबर, २०१० रोजी ११:१९ AM  

नमस्कार मित्रमैत्रीणींनो,

तुमच्या सर्वांच्या विश्वास आणि प्रेमाच्या बळावरच या अंकाची निर्मिती होऊ शकली आहे. आपल्या प्रतिसादांबद्द्ल मन:पूर्वक धन्यवाद.

Kanchan Karai (Mogaraafulalaa) २ नोव्हेंबर, २०१० रोजी ११:२३ AM  

अनामित,

आपण उल्लेख केलेली लिंक ही योग्य लिंक नाही. जर आपण या अंकावरील पनीर बिर्याणी या पाककृतीच्या लिंकबद्दल सांगू इच्छित आहात, तर ही लिंक अगदी व्यवस्थित काम करते आहे. पनीर बिर्याणी या पाककृतीची लिंक इथे क्लिक करून वाचू शकता.

सूचनेसाठी आभार.

अनामित,  २ नोव्हेंबर, २०१० रोजी १२:०४ PM  

ya opening now thanks for quick response

उत्तमअंक
मला आवडलेल साहित्य वाचल
पुढच्या वर्षासाठी गुड लक

परत एकदा उत्तम!!!!!

प्रमोद देव २ नोव्हेंबर, २०१० रोजी ६:२२ PM  

http://www.divshare.com/download/13051389-c27
मोगरा फुलला दिवाळी अंकावरील चारोळी चालीत ऐका .

महेंद्र २ नोव्हेंबर, २०१० रोजी ६:५४ PM  

सुंदर झालाय. अजून वाचायला वेळ मिळालेला नाही. पण दिवाळीत फराळासोबत नक्की संपवणार.

अनामित,  २ नोव्हेंबर, २०१० रोजी ६:५४ PM  

ब्लॉगर्स नसलेलयानी लेखांबद्द्लच्या प्रतिक्रिया कशा नोंदवाव्यत ?
कारण त्या लेखकाला किवा कोणालाच दिसत नाहीत.

Kanchan Karai (Mogaraafulalaa) २ नोव्हेंबर, २०१० रोजी ७:०२ PM  

नमस्कार अनामित,

ब्लॉगर्स नसलेल्यांनी प्रतिक्रियेसाठी नाव/URL या पर्यायाचा वापर करावा. हा पर्याय अनामित या पर्यायाच्या अगदी वरच आहे. आपल्याला आपले खरे नाव देण्यास संकोच वाटत असल्यास, टोपण नावाने प्रतिक्रिया देण्यासाठी हा पर्यायसुद्धा वापरता येईल.

लेखकांना प्रतिक्रिया दिसतात की नाही, हे लेखकांना ठरवू द्या. लेखकांना प्रतिक्रिया दिसण्यात काही अडचण असेल, तर ते थेट माझ्याशी संपर्क साधू शकतात, हे त्यांना माहीत आहे.

Kanchan Karai (Mogaraafulalaa) २ नोव्हेंबर, २०१० रोजी ७:०३ PM  

धन्यवाद दादा. सावकाश फराळाबरोबर वाचून काढा हा अंक. मलाही दिवाळीतच पुन्हा वाचायला मिळणार आहे. सध्या फक्त प्रतिक्रियांना उत्तरं देतेय.

iravatee अरुंधती kulkarni २ नोव्हेंबर, २०१० रोजी ८:३१ PM  

सुरेख मांडणी, आकर्षक सजावट आणि मजकुराची मेजवानी! दिवाळी अंक सुंदर सजला आहे. प्रथम दर्शनी छानच दिसत आहे. आता निवांत वाचून काढते. कांचन, उल्हास, भाग्यश्री, क्रांती व सर्व टीम, हार्दिक अभिनंदन!

सस्नेह
अरुंधती

Salil Chaudhary ३ नोव्हेंबर, २०१० रोजी ८:३२ AM  

अंक मस्तच झालाय. सध्या नुसता चाळला आहे. पण भरपुर वाचनीय अंक आहे हे कळले. आमच्या सारख्या e-वाचकांना हा दिवाळीचा फराळ दिल्याबदद्ल धन्यवाद

सलिल चौधरी

Kanchan Karai (Mogaraafulalaa) ३ नोव्हेंबर, २०१० रोजी १२:०४ PM  

ताई, धन्यवाद. शुभेच्छा कायम पाठीशी राहू देत.
सलीलजी, कामात व्यग्र आहात असे कळले. तरीदेखील वेळ काढून प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. सवडीने का होईना, अंक जरूर वाचा.

GAJANAN LOKHANDE ३ नोव्हेंबर, २०१० रोजी ४:३० PM  

मोगरा फुलला, यात नाही वाद
वाचनीय अंक, येतोय सकारात्मक प्रतिसाद
घेतली प्रचंड मेहनत, करताय मराठीची सेवा
मोबदला, अपेक्षा, नाही कुठून, कसला मेवा
दिले नव कवींना मोफत उत्तेजन
बळ दिले हत्तीचे, आपलेच प्रोत्साहन
दिवाळीच्या हार्दिक सुगंधी शुभेच्छा
पूर्ण होवो आपल्या मनातील इच्छा
नवकवी - गजानन लोखंडे

Marathi Paul ३ नोव्हेंबर, २०१० रोजी ९:०२ PM  

संपादक महोदया,

मोफ़ु चा दिपावली अंक २०१० अतिषय सुंदर झाला आहे. मी बराचसा बघीतला आहे. पुर्ण वाचल्याशिवाय सोड्णार नाही. जसा जसा वाचत जाईल तशा प्रतीक्रियाही पाठवत जाईल, खरच मलाही अंक खुप आवडला. दिपावलीच्या आपणास व संपुर्ण संपादक मंडळास हार्दीक शुभेच्छा
अमोल देशमुख

mahesh ५ नोव्हेंबर, २०१० रोजी १:५६ PM  

अंक सुंदर ,वाचनीय आहे,आपले व संपादकीय विभागाचे अभिनंदन ,दिवाळीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छया ,

Sai - BloggerStop.Net ७ नोव्हेंबर, २०१० रोजी १२:१६ AM  

दीपावली की हार्दिक शुभकामनाएं Kanchan di :)

सचिन उथळे-पाटील ८ नोव्हेंबर, २०१० रोजी ११:०४ AM  

अतिशय सुरेख,सुंदर बनवलाय अंक.
अप्रतिम रंगसंगती.

हा अंक सुंदर बनवण्यासाठी कष्ट घेतलेल्या सर्वांचे मनापासून आभार.

Kanchan Karai (Mogaraafulalaa) ८ नोव्हेंबर, २०१० रोजी १:०८ PM  

गजानन, कवितेतून आपल्या भावना फार सुंदर व्यक्त केल्यात.
अमोल, धन्यवाद. पुढच्या वेळेस आपलाही लेख समाविष्ट करण्याचा विचार आहे.
महेश, आपल्या प्रशंसोत्गारांसाठी धन्यवाद. शुभेच्छा पाठिशी असू द्यात.
साई, आपको भी दीपावली की हार्दिक शुभकामनाएँ। बहोत बडा सरप्राईज दिया देवनागरी में टाईपिंग करके।
सचिन, धन्यवाद. वाचून कळवत जा. कसा वाटतोय अंक ते.

Nisha ८ नोव्हेंबर, २०१० रोजी ११:१७ PM  

दिवाळीची गडबड आणि पाहुण्यांची सरबराई करीत असतांनाच मो.फु. च मुखपृष्ठ खुणावत राहील. संधी मिळताच खेळायला पळणार्‍या मुलांप्रमाणे मी पण अंकाचा धावता आढावा घेतला. दिवाळीसाठी अगदी समर्पक मुखपृष्ठ. केकवर चेरी असावी तशी चारोळी. संपूर्ण टीमचे मनःपुर्वक अभिनंदन! माझ्या दोन्ही लेखांचा अंतर्भाव झाल्यामुळे कां. कराई यांच्या चोखंदळपणाला खरे उतरलो याची जाणीव आनंद देऊन गेली. धन्यवाद. निवांतपणे वाचायला सुरूवात केली आहे. हळूहळू प्रतिक्रिया देते आहे. उत्तरही देते आहे. पुन्हा एकदा धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा!

Kulasya ९ नोव्हेंबर, २०१० रोजी १२:०३ PM  

अंक खूपच छान आहे. उशिरा प्रतिक्रिया दिली , कारण, अंक पूर्ण वाचून झाल्यानंतरच प्रतिक्रिया द्यायची असे ठरवले होते. अंकाचे सादरीकरण उत्तम आहे. मुखपृष्ट्पासूनच दिवाळीचा फील येत राहतो. साहित्यकृती अर्थातच उत्तम आहेत. आपल्या अंकाचे, माझे आणि आपल्या इतर लेखकांचे ई-सकाळ मधे नाव आलेले आहे. त्याबद्दल लेखही आलेला आहे.

अनामित,  १० नोव्हेंबर, २०१० रोजी ११:१० PM  

खर तर संपुर्ण अंक वाचल्यावरच प्रतिक्रीया द्यावी म्हणुन थांबलो होतॊ अ

सांगायला आनंद होतोय की खरच अंक वाचनीय आहे.

आजकाल मराठीत दीवाळी अंकाचे उदंड पीक आले आहे परंतु त्यात

वाचनीय मजकुर कमी असतॊ पण आपल्या अंकातील सर्व लेख वाचनीय आहेत.

आपले व आपल्या सहकारयांचे मनापासुन अभिनंदन.

Nachiket १२ नोव्हेंबर, २०१० रोजी १०:३४ AM  

मोगरा फुलला दिवाळी अंक निर्विवादपणे ब्लॉकबस्टर हिट आहे. १५,००० कधीच क्रॉस झालेत..

अंकातल्या साहित्याचा दर्जा निर्विवादपणे "वाचनीय" आणि "उत्कृष्ट" आहे..

संपादक मंडळ आणि यामागे कष्ट घेतलेल्या सगळ्यांचं अनेकवार अभिनंदन..

टिप्पणी पोस्ट करा

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.

मोगरा फुलला दीपावली अंकाबद्दलचा आपला अभिप्रायही अवश्य नोंदवा.

काही सूचना किंवा सल्ले द्यायचे असतील तर इथे क्लिक करा.

वरील साहित्यावरही आपली प्रतिक्रिया अवश्य द्या.

धन्यवाद.


Creative Commons License
मोगरा फुलला ई-दीपावली अंकामधील कोणत्याही प्रकारचे साहित्य हे Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 3.0 Unported License च्या अंतर्गत सुरक्षित आहे. अंकातील साहित्याच्या पुन:प्रकाशनाचे व्यापक अधिकार हे अंकातील साहित्य कोणत्या प्रकारचे आहे, यावर अवलंबून आहेत.


© 2011 Mogaraa Fulalaa. मोगरा फुलला ई-दीपावली अंक हा ’मोगरा फुलला’चाच एक भाग आहे. मोगरा फुलला ई-दीपावली अंकात प्रकाशित झालेल्या साहित्याचे सर्व हक्क हे त्या साहित्याच्या मूळ निर्मात्यांकडेच सुरक्षित आहेत. मोगरा फुलला दीपावली अंकाच्या प्रकाशित होणा-या आवृत्तीमधील कुठल्याही साहित्याच्या पुन:प्रकाशनासाठी संबंधित साहित्याच्या मूळ निर्मात्यांशी संपर्क साधावा अथवा मोगरा फुलला ई-दीपावली अंकाच्या संपादकांशी mogaraafulalaa@gmail.com या आयडीवर संपर्क साधावा.