ओढ नव्या जीवाची - भाग १

"अगं पिल्लू, उठ बाळा. तुझ्यासाठी दूध आणलं आहे बघ मस्त बोर्नव्हिटा घालून. चल, गं लवकर. मग वॉकला पण जायचं आहे ना!... आणि थोडा हलके हलके व्यायामपण करायचा आहे... आता उठतेयस की देऊ एक धपाटा?"

"आऽऽऽऽ...काय रे शोन्या? थोडं जास्तवेळ झोपले असते तर काय बिघडलं असतं तुझं? एक तर हे बेबी किती लाथा मारतंय आतून.." ती उठता उठता हसत म्हणाली.

"हो, माहीत आहे मला बाळा. पण त्या होणार्‍या बाळासाठीच सांगतोय ना! असं आळशी बसू नये, थोडा व्यायाम कर, घरातल्या घरात चाल... काही हवं असेल, खावंसं वाटलं तर सांग की मला, मी आहेच की तुझ्या चरणाचा सेवक. आधी हे ग्लासभर दूध घे आणि थोडी फ्रेश हो. आपण खाली गार्डनमध्ये जाऊया फेरफटका मारायला..."

"ऊँ! म्हणे चरणाचा सेवक. मी नाही सांगत तुला घरी थांबायला पण तुला वाटतं की आपल्या बाळाची नीट काळजी घेतली जात नाहीये म्हणून तू पण घरी थांबलायस..." ती तोंड फुगवत म्हणाली.

"असं नाही गं पिल्लू. आता इथे आई-बाबा नाहीत ना, मग तुझी काळजी करायला, नको का राहायला हवं मी इथे?" त्याने समजावणीच्या सुरात म्हटलं.

"माहीत आहे रे शोन्या, मस्करी केली मी... पण मला ते दूध नकोय रे. प्लीऽज!... तू पी ना!"

"पिल्लू, चल खूप झालं हं!, आता हे दूध संपव बरं... आणि हे तुझ्यासाठी नाही हं, माझ्या बाळासाठी आहे... समजलं?!"

ती तोंड पाडत म्हणाली, "छान! आताच ही हालत आहे, मग बाळ आलं की माझे लाड होणार नाहीत..."

"हा, हा, हा! ते बघू आपण. तू आधी फ्रेश हो बरं आणि दूध लवकर संपव. मी जरा कामं आवरून घेतो."

"अरे, मी करते ना. तू नको...." ती पुढे काही म्हणणार त्या आधीच त्याने तिच्या तोंडावर बोट ठेवलं आणि डोळ्यांनीच ’दूध संपव’ असा इशारा केला.

तीही लहान मुलासारखं मानेने ’हो’ म्हणून दूध पिऊ लागली.

तिचे खूपच लाड करायचा तो. अगदी लहान मुलीसारखे! पण आता तिलाच एक छो्टसं पिल्लू होणार, ह्या कल्पनेनेच तो आनंदाने वेडापीसा झालाय. तिला न्याहळात बसायचा, तिला हवं-नको ते बघायचा, तिला न चुकता डॉक्टरकडे घेऊन जाणं, पुस्तक वाचून दाखवणं, तिच्या बरोबर व्यायाम करणं... सगळं सगळांतो करत होता. घरातली कामही तो तिला करू देत नसे. तिच्या डिलीव्हरीच्या दोन महिने आधीपासूनच त्याने सुट्टी टाकून ठेवली होती, आपल्या पिल्लूच्या पिल्लासाठी. घरात सगळी चांगली चांगली पुस्तक आणली होती. तिच्या आईने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी काटेकोरपणे पाळत होता तो. खरं तर पहिलंच मूल असल्याने तिला तिच्या आईकडे जावं लागणार होतं शेवटच्या दोन महीने तरी. पण ह्यानेच मुद्दाम तिला थांबवून ठेवलं होत काही दिवसांसाठी.

तो हॉलमध्ये नेहमीची आवारा आवर करत होता. ती आली आणि म्हणाली, "चल, जाऊया." तिने टिपिकल फ्रॉक घातला होता आणि खूप गोंडस दिसत होती. तिच्यासाठी पाण्याची एक बाटली घेऊन दोघे निघाले वॉकला. वातावरण प्रसन्न होतं. थंडीचे दिवस असल्याने वातावरणात उष्मा जाणवत नव्हता. ती आणि तो सावकाश पावलं टाकत चालत होती. त्याने तिचा हात घट्ट पकडून ठेवला होता. हळूहळू ते त्या बागेच्या जॉगिंग ट्रॅकवर चालत होते. त्याचे मित्र "गुड मॉर्निंग", "सुट्टी काय", "अभिनंदन!" असं धावता धावता बोलत होते त्याच्याशी. तिच्या चेहेर्याीवर एक प्रसन्न हास्य होतं आणि अशा दिवसांत स्त्रीच्या सौंदर्याला एक वेगळं तेज येतं, हे खरंच!

चालता चालता तिने त्याचा हात धरत विचारल "कोण हवय रे तुला?... मुलगा की मुलगी?" त्याने क्षणाचा विलंब न लावता सांगितलं, "मुलगीच हवी.! तुला माहीत असतं उत्तर, तरी का परत परत विचारतेस तू हे ?"

"हो, माहीत असतं पण त्या वेळी तुझ्या चेहर्या वर दिसणारा उत्साह बघितला की खूप भरून येतं मला. तुलाच काय, मला पण मुलगीच हवी आहे! तिचे बोबडे बोल, दुडूदुडू चालणं, हट्ट करणं, रडणं, हसणं, आपल्याला हाका मारणं, सगळं कसं छान ना? तू म्हणतोस ना, मी समोर आले की तुझा राग, कंटाळा सगळा निघून जातो. पण आपल्या पिल्लूला पाहिल्यावर तू सगळ्या अडचणी, संकट, चिंता विसरशील. बघ, इतकी क्यूट, बब्ब्ली अँड चार्मिंग असेल ती! थोडी मोठी झाल्यावर मी कधी तिला ओरडले, तर तू घरी आल्यावर ती तुझ्याकडे हळूच माझी तक्रार करेल आणि तिच्या तक्रारीला न्याय मिळावा म्हणून तू पण मला खोटं खोटं ओरडशील आणि नंतर माझी पण समजूत घालशील. हं.. आणि आम्ही कपड्यांच्या दुकानात जर शिरलो तर तुझं काही खरं नाही बघ!" ती खुदूखुदू हसत म्हणाली.

--
सुहास झेले
suhas.zele@gmail.com

7 comments:

अपर्णा २ नोव्हेंबर, २०१० रोजी ११:४३ AM  

अरे दिवाळी अंकात असे भाग एक पण देता येतात??? बाकी मला एकदम माझे "ते" दिवस/महिने आठवले तुझ वर्णन वाचून....फक्त कथा मी पूर्ण वाचेन का मला माहित नाहीये कारण मी फार कथा वाचत नाहीये सध्या....

(Just FYI..:))

Kanchan Karai (Mogaraafulalaa) २ नोव्हेंबर, २०१० रोजी ११:५५ AM  

अपर्णा, भाग १ जिथे संपतो आहे, तिथे खालीच सुहासच्या आयडीजवळ पान १ व २ उपलब्ध आहे ना. जर २ वर क्लिक केलंस तर पुढचा आणि शेवटचा भाग वाचता येईल. या दिवाळी अंकात कुठलीच कथा क्रमश: नाही केवळ कथेच्या लांबीनुसार, वाचकांना नॅव्हिगेशन सोपं जावं म्हणून भाग पाडले आहेत

कृष्यणकुमार प्रधान ३ नोव्हेंबर, २०१० रोजी ६:०४ AM  

मोगरा फुलला दिवाळी अंक फारचछान आहे मे संपूर्ण वाचला. जवळ जवळ प्रत्येक लेख वा कवितेवर टिप्पणी केली होती, पण ती खालील चोकोनात कापीपेस्ट करण्याची सूचना वाचनात आली नव्हती त्यामुळे छापली गेली नाही.
वरील चोकोनात लिहिली असल्याने खाली फक्त धन्यवाद असे शब्द लिहिले.
झाले ते झाले आता पुन्हा काही करण्याची शक्यता नाही

Suhas Diwakar Zele ४ नोव्हेंबर, २०१० रोजी १:४७ PM  

अपर्णा, कांचन ने माहिती दिलीच आहे तर पूर्ण कथा वाच की ग एकदा मग सांग की कशी झालीय ते :):)

कांचन ताई, थॅंक्स...

काका, तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभार :)

अपर्णा ११ नोव्हेंबर, २०१० रोजी १२:४४ AM  

kanchan आभारी ...सुहास katha chan aahe ekdam diwalicha ladu...sagala kahi goad goad...:)

हेरंब १३ नोव्हेंबर, २०१० रोजी २:३० AM  

सुहास, एकदम छान आहे रे कथा.. आवडली.

टिप्पणी पोस्ट करा

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.

मोगरा फुलला दीपावली अंकाबद्दलचा आपला अभिप्रायही अवश्य नोंदवा.

काही सूचना किंवा सल्ले द्यायचे असतील तर इथे क्लिक करा.

वरील साहित्यावरही आपली प्रतिक्रिया अवश्य द्या.

धन्यवाद.


Creative Commons License
मोगरा फुलला ई-दीपावली अंकामधील कोणत्याही प्रकारचे साहित्य हे Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 3.0 Unported License च्या अंतर्गत सुरक्षित आहे. अंकातील साहित्याच्या पुन:प्रकाशनाचे व्यापक अधिकार हे अंकातील साहित्य कोणत्या प्रकारचे आहे, यावर अवलंबून आहेत.


© 2011 Mogaraa Fulalaa. मोगरा फुलला ई-दीपावली अंक हा ’मोगरा फुलला’चाच एक भाग आहे. मोगरा फुलला ई-दीपावली अंकात प्रकाशित झालेल्या साहित्याचे सर्व हक्क हे त्या साहित्याच्या मूळ निर्मात्यांकडेच सुरक्षित आहेत. मोगरा फुलला दीपावली अंकाच्या प्रकाशित होणा-या आवृत्तीमधील कुठल्याही साहित्याच्या पुन:प्रकाशनासाठी संबंधित साहित्याच्या मूळ निर्मात्यांशी संपर्क साधावा अथवा मोगरा फुलला ई-दीपावली अंकाच्या संपादकांशी mogaraafulalaa@gmail.com या आयडीवर संपर्क साधावा.