भगरीची खिचडी

करायला एकदम सोपी व अजिबात घास न लागणारी अशी ही भगरीची खिचडी. गरम किंवा गार कशीही खाल्लीत तरी छानच लागते व उपासाच्या पदार्थांनी होणारे पित्तही होत नाही.



वाढणी: तीन माणसांना पोटभरीची

साहित्य:
एक वाटी भगर
अडीच वाट्या गरम पाणी
दोन मध्यम बटाटे उकडून
दोन टेबलस्पून तूप
चार हिरव्या मिरच्या
पेरभर आले
मूठभर कोथिंबीर
एक चमचा जिरे
मूठभर भाजलेले शेंगदाणे किंवा दोन टेबलस्पून दाण्याचे कूट
स्वादानुसार मीठ
आवडत असल्यास एक चमचा साखर
एक लिंबू ( ऐच्छिक )

कृती:
कढईत मध्यम आचेवर भगर गुलाबी रंगावर कोरडीच भाजून घ्यावी. ( साधारण बारा ते पंधरा मिनिटे ) अडीच वाट्या पाणी चांगले गरम करून घेऊन भाजलेली भगर लगेच त्यात घालावी व झाकून ठेवावे. दोन तासानंतर भगर छान फुलून आलेली व मोकळी झालेली दिसून येईल.

उकडलेल्या बटाट्याची साले काढून हलक्या हाताने कुस्करून घ्यावेत. ( अगदी पीठ करू नये ) हिरव्या मिरच्या खूप तिखट असतील तर फक्त पोट फोडून घ्याव्यात पण अगदीच कमी तिखट असतील तर बारीक चिरून घ्याव्या. आल्याचेही बारीक तुकडे करावे. कोथिंबीर चिरून घ्यावी. मध्यम आचेवर कढई ठेवून तूप घालावे. तापले की त्यात जिरे, आल्याचे व मिरचीचे तुकडे घालून मिनिटभर परतून त्यावर भाजलेले शेंगदाणे व कुस्करलेला बटाटा टाकून परतावे. बटाटा जरासा लालसर दिसू लागला की मोकळी झालेली भगर त्यावर टाकून सगळे मिश्रण नीट परतावे व झाकण ठेवून एक वाफ आणावी. पाच मिनिटाने झाकण काढून स्वादानुसार मीठ घालून परतून पुन्हा एक वाफ आणून आचेवरून उतरवावे. कोथिंबीर व ज्याला हवे त्यास लिंबाचा रस घालून गरम गरम वाढावे.

टीपा:
१. जितकी भगर घेऊ त्याच्या अडीच पट पाणी घ्यावे. कमी घेतल्यास नीट फुलत नाही व फार घास लागतो. चुकून पाणी कमी घेतले गेले तर कढईत भगर टाकून झाल्यावर पाण्याचा एक हबका मारून एक वाफ आणावी.
२. साखर आवडत असेल तरच घालावी. शक्यतो घालू नयेच.
३. शेंगदाणे नसतील तर कूट घालावे.
४. यात बटाट्याचा कीसही घालता येईल. कीस घालायचा झाल्यास फोडणीत शेंगदाणे घातल्यावर लगेच घालून झाकण ठेवून वाफ आणावी. कीस नीट शिजल्याची खात्री करूनच भगर टाकावी.
५. ओले खोबरे आवडत असल्यास कोथिंबिरी सोबत घालावे.

--
भाग्यश्री सरदेसाई
shree_279@yahoo.com

इतर पाककृती:

3 comments:

Suhas Diwakar Zele ३ नोव्हेंबर, २०१० रोजी ६:३१ PM  

वाह मस्त..मला खूप आवडत हे... :)

अपर्णा ४ नोव्हेंबर, २०१० रोजी ९:२० AM  

भगर तो है मगर कब करेंगे पता नाही....रेसिपी tempting आहे...

भानस ५ नोव्हेंबर, २०१० रोजी २:२४ AM  

सुहास, अपर्णा अभिप्रायासाठी अनेक धन्यवाद. :)

टिप्पणी पोस्ट करा

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.

मोगरा फुलला दीपावली अंकाबद्दलचा आपला अभिप्रायही अवश्य नोंदवा.

काही सूचना किंवा सल्ले द्यायचे असतील तर इथे क्लिक करा.

वरील साहित्यावरही आपली प्रतिक्रिया अवश्य द्या.

धन्यवाद.


Creative Commons License
मोगरा फुलला ई-दीपावली अंकामधील कोणत्याही प्रकारचे साहित्य हे Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 3.0 Unported License च्या अंतर्गत सुरक्षित आहे. अंकातील साहित्याच्या पुन:प्रकाशनाचे व्यापक अधिकार हे अंकातील साहित्य कोणत्या प्रकारचे आहे, यावर अवलंबून आहेत.


© 2011 Mogaraa Fulalaa. मोगरा फुलला ई-दीपावली अंक हा ’मोगरा फुलला’चाच एक भाग आहे. मोगरा फुलला ई-दीपावली अंकात प्रकाशित झालेल्या साहित्याचे सर्व हक्क हे त्या साहित्याच्या मूळ निर्मात्यांकडेच सुरक्षित आहेत. मोगरा फुलला दीपावली अंकाच्या प्रकाशित होणा-या आवृत्तीमधील कुठल्याही साहित्याच्या पुन:प्रकाशनासाठी संबंधित साहित्याच्या मूळ निर्मात्यांशी संपर्क साधावा अथवा मोगरा फुलला ई-दीपावली अंकाच्या संपादकांशी mogaraafulalaa@gmail.com या आयडीवर संपर्क साधावा.