भाग्यश्री सरदेसाई

मी भाग्यश्री सरदेसाई. सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरातलीच मीही एक. ग्रॅज्युएशन झाले आणि लगेच सरकारी नोकरी मिळाली. १७ वर्षे इमानेइतबारे ती केली. त्यानंतर अचानक ध्यानीमनी नसताना एक दिवस अमेरिकेत आले. दोन वर्षानंतर इथे इन्शुरन्स कंपनीत नोकरी करू लागले. नोकरी इतकी हाडामांसात भिनली होती की चैनच पडत नसे. गेल्या अडीच वर्षापासून पूर्णवेळ गृहिणी.
जगाच्या पाठीवर आपण कुठेही राहत असलो तरी मनाने मी बरेचदा मायदेशातच रमते. आपले सणवार आले की जीव अजूनच खालीवर होतो. गेल्या दहा वर्षात इंटरनेटचा वापर लक्षणीय वाढला. रोजचे मेल्स, चॅटींग-वेबकॅम, फोटो, चित्रफितीची देवाणघेवाण एवढेच नाही तर अगदी आईकडे गणपती बसतानाची पूजा आणि आरतीत आम्हाला सहभागी होता येऊ लागले. दिवाळीला घरात सगळे जमले की वेबकॅमवरून मीही त्यात सामील होते. खूपच मजा येते. मुख्य म्हणजे तुटल्यासारखे वाटणारी भावना थोडीशी कमी होते.
घरातले काम आटोपले की काही वेळ नक्कीच मोकळा मिळतो. सारखे वाटत होते की काहीतरी करावे. अगदी लहानपणापासून कविता, डायरी लिहिण्याचे व वेड्यासारखे वाचन करण्याचे वेड होतेच. कुठेतरी मनात आपण लिखाण करावे ही दबलेली इच्छाही होतीच. सभोवताली घडणार्या अनेक घटना, व्यक्तीमत्वे, त्यांची वागणूक अशा अनेकवीध गोष्टी मनात ठाण मांडून बसतात. वाटले या सार्याचा आपल्यावर जो परिणाम होत गेला तो जसाच्या तसा, कुठलाही बेगडीपणा, अकृत्रिमतेचा आव न आणता जसा भिडला तसा मांडावा. म्हणून मनाचा हिय्या करून १८ फेब्रुवारी, २००९ रोजी 'सरदेसाईज' ब्लॉग सुरू केला.
सुरवातीला चाचपडत हळूहळू सुधारणा करत लिखाण सुरू केले. म्हणजे अगदी ब्लॉग कसा बनवायचा पासून.... अनेक तांत्रिक गोष्टी नव्यानेच पाहत होते. अडखळत-शिकत ब्लॉग सुरू केला. नियमित लिखाण करायचे असे मनात असले तरी, मुळात लिहायला जमेल का? हा प्रश्न होताच. विचार केला निदान सुरवात तर करू, नाहीच जमले तर...... पण मी विक्रमदित्याची बहीण आहे. वेताळ कितीही वेळा निसटून गेला तरी हट्ट सोडायचा नाही. प्रयत्न करीत राहायचे. कासवाच्या गतीने का होईना, चार शब्द लिहीत राहीन निदान ते समाधान तरी नक्कीच मिळेल. इतक्या वर्षात मनात बरेच काही साचलेले होतेच परंतु त्यांना शब्दात उतरवणे, एका सूत्रात बांधणे, वाचनीय करणे हे तसे सोपे नाही. नेटाने व जिद्दीने दिसामाजी काही लिहावेच हे धोरण ठेवून लिहीत होते. माझ्यासाठी ब्लॉग लिहिणे म्हणजे, " मनात अनेक विचार नेहमीच पिंगा घालत असतात, त्यांना मुक्तपणे मांडता येण्यासाठीचा केलेला सारा खटाटोप."
पाहता पाहता ब्लॉगला दीड वर्ष पूर्ण झाले. जवळ जवळ ३६५ पोस्टही लिहील्या. लहानपणापासूनच, "माणूस - त्याचे अंतरंग, समाजात व घरातले त्याचे वागणे, भावजीवन-स्वार्थ, प्रेम, स्वभावाच्या निरनिराळ्या छटा", हे सारे मला मोहवत आले आहे. त्यामुळे आपसूकच त्यावरच जास्त लिहीत गेले. प्रवासाचेही मला जबरदस्त वेड, साहजिकच ती वर्णने-फोटोही आलेच आणि आपल्या सगळ्यांचा वीक पॉंईंट- खाणे, म्हणून खाऊगल्लीही सुरू केली. कथा-कवितांनी अगदी लहानपणापासून जिव्हाळा लावलेला, त्यांचे खास स्थान आहेच. अनेकदा वाटे हे काय लिहिलेय, अगदीच सुमार-टाकाऊ वाटतेय..... डिलटून टाकावे, लिहिणेही बंद करावे. पण अशाने सुधारणा कशी होणार असे वाटून घोडे दामटत होते. वाचकांनी खूप प्रोत्साहन दिले त्यामुळेच मी लिहीत राहिले. गेल्या दीड वर्षात अगणित मित्र-मैत्रिणी जोडले, जिव्हाळ्याचे झाले. आताशा रोज बोलल्याशिवाय चैन पडत नाही इतके घरातले-आपलेसे झाले. लवकरच प्रत्यक्ष भेटीगाठीचा योगही येईलच.
ब्लॉगमुळे या काहीश्या एकटेपणाची झळ खूपच कमी झाली ही मोठी जमेची बाजू. श्री. दिपक शिंदे यांनी काढलेले माझ्या पाककृतींचे पुस्तक 'पोटोबा' ६००६ जणांनी डाउनलोड केलेय हे पाहून खूप आनंद होतो. वाचकांचे व दिपकचे मनःपूर्वक आभार. एकेकाळी आईला, "सारखे काय गं स्वयंपाकघरात गुंतून पडतेस", असे नेहमी म्हणणारी आणि केवळ सांगकाम्यासारखे काम करणारी मी, कधी इतका रस घेऊन पदार्थ बनवू लागले याचे मलाच नवल वाटते. 'नेटभेट' या जालावरील पहिल्या मराठी मासिकात सातत्याने लेख छापून आले. आणि हे सारे केवळ इंटरनेटच्या सुविधेमुळेच करता आले. ब्लॉगिंगमुळे मला स्वत:ची ओळख झाली व अगणित स्वार्थ नसलेले जीवाभावाचे मैत्र जोडले गेले. वाचकांनी दिलेल्या कौतुकाच्या चार बोलांनी उत्साह खूप वाढला. असाच लोभ पुढेही राहील असा प्रयत्न सातत्याने करेन.
धन्यवाद.
--
भाग्यश्री सरदेसाई
shree_279@yahoo.com
संपादन सहाय्य
मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०१०

3 comments:
:) :) :) तुमची चिकाटी अशीच कायम राहो. आणि पाककृतींचा आनंद प्रत्यक्षात घेता यावो. ;) दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा...
धन्यवाद सौरभ. प्रत्यक्ष भेटीत जरूर खिलवेन. :)
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!
वाचून खूप आनंद झाला. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्या ..........
टिप्पणी पोस्ट करा