मानपान

मानपान हा शब्द मानापमान या शब्दाशी निगडीत आहे. मानपान म्हटलं की लगेच लग्न आठवतं. असं वाटतं की कुणाचं तरी लग्न सुरु आहे आणि नेमकी वरमाय कुठल्यातरी गोष्टीवरून अडून बसलीय. मग कारल्याचा वेल असो, वा चांदीची लवंग असो. पण खरचं मानपान म्हटलं की एवढचं आठवतं का, तर नाही; मानपान किंवा मानापमान म्हणजे अहंकाराची दुसरी बाजू.

आज कित्येक घरात या अहंकारावरून कितीतरी नाती भरकटली गेलीत, तुटली किंवा उध्वस्त झालीत. मग त्या नात्यात नवरा-बायको, मुलगी-आई-मुलगा, मुलगा-वडील-मुलगी, सासू-सून, सासरा-जावई, सासू-जावई, सासरा-सून, एवढेच नव्हे तर बहिण-भाऊ, भाऊ-भाऊ, बहिणी-बहिणी, दीर-भावजय, नणंद-भावजय, एकूण काय नातेवाईक-नातेवाईक. त्यात अजून भर पडते ती मित्र-मैत्रीण, मैत्रिणी-मैत्रिणी, मित्र-मित्र. आपण म्हणतो की “घरोघरी मातीच्या चुली”, खरंय ते! कुठल्या न कुठल्या कारणावरून वरील नात्यात सारखे वादविवाद, रुसवे-फुगवे, उणी-दुणी असतात. बरं त्यात काही नात्यात समझोता होतो आणि काही नाती विस्कटून जातात. पुष्कळदा इर्षा, घृणा, यात तिखटपणा आणतात.

आजच्या धकाधकीच्या जीवनात खरंच अहंकाराची गरज आहे का ? आधीच आपल्या आयुष्याची दोरी त्या बाप्पाच्या हातात असते आणि त्यात हे वाद, अहंकार, मानपान, मानापमान यामुळे आपण शारिरीक आणि मानसिक यातना स्वत:ला करून घेतो आणि त्या अलिखित मृत्यूच्या अजून समीप जातो. ह्यात गंमतीची बाब ही की हीच नाती आपण नीट पाळू शकत नाही आणि उगाच देशांत आणि जगात शांतता असावी अश्या बाता मारतो. आपणचं जर आपल्याच माणसात खुश नसू, तर कुठल्या तोंडाने इतर लोकांसोबत खुशहाली आणि शांततेची अपेक्षा कशी काय ठेवू शकतो. कशी नांदेल जगात शांतता?

त्यासाठी आज खरी गरज आहे, स्वत:मधील "मी" ला ओळखण्याची. आपण जर मनाने स्वच्छ राहिलो, तर कुणाची बिशाद आहे आपल्यावर मानपानाची, अहंकाराची, मानापमानाची, इर्षेची, घृणेची सावली आणण्याची? परंतु मनुष्यप्राणी आणि त्याचा स्वभावच मुळी असा आहे ना, की जाणतेपणी व अजाणतेपणी या दोषांचा संसर्ग आपल्याला होतोच. जर हेच नेमकं टाळता आलं तर जग किती सुंदर असेल. त्यात प्रत्येक नातं अगदी घट्ट, प्रेमाने भारलेलं, हळुवार मनावर फुंकर घालणारं असेल.

आपण निरनिराळे सुवासिक साबण वापरतो, त्वचा अगदी घासूनपुसून लख्खं ठेवायचा प्रयत्न करतो पण मनाचं काय ? त्याला घासूनपुसून लख्खं ठेवण्यासाठी आपण काहीच करत नाही. म्हणतात ना की, “नाही निर्मळ मन, तर काय करील साबण?” पण आपण आपला हट्ट, अहं सोडत नाही, मग त्या नात्यात कितीही ताणतणाव आले तरी चालतील पण मी माझं मीपण सोडणार नाही. नका सोडू. राहा भांडत. अगदी नात्यातल्या प्रत्येकाशी भांडत राहा. त्यामुळे कुणाचा फायदा होतो? कुणाचाच नाही. उलट मन:स्ताप, अवहेलना, अपमान, अपेक्षाभंग मात्र होतो. पण आपण हे सर्व अगदी आनंदाने उपभोगतो. मुळात आपल्याला नेमकं काय उपभोगायचं तेच मुळी कळत नाही. असल्या भांडणामुळे कुणीच कुणाचं राहत नाही. शेवट अगदीच वाईट असतो किंबहुना तो सर्वांना माहित असतो तरी पण आपण वागू नये तसंच वागतो. जणू प्रेम, वात्सल्य, माया, ममता या शब्दांचा आपल्याला तिटकारा आहे.

केवळ एकच विचार आवश्यक आहे, वरील सर्व नात्यात जर प्रेमाची पेरणी केली, त्यावर वात्सल्याचा पाउस टाकला आणि मायेने आणि ममतेने त्या पिकाचे संगोपन केले, तर किती बहारदार वृक्ष आपल्याला पाहायला मिळेल. जग किती सुंदर होईल. कितीतरी लोकांना त्याची मधाळ फळे चाखावयास मिळतील. आयुष्य सत्कारणी लागेल. नाहीतर जन्मलो कशासाठी, जगलो कसे आणि मेलो कशासाठी याचा कुठलाही अर्थ लागणार नाही. किती काळ जगलो यापेक्षा कसे जगलो याला महत्व आहे.

देवाने आयुष्य दिलंय आणि आयुष्याची सीमारेषा पण आखून दिलीय, मृत्यू नंतर आपले काय होते, कुठला जन्म आपण घेतो हे कोडे अजूनही उलगडले नाही. स्वर्ग आणि नरक कुणी पाहिलाय? त्यामुळे चित्रगुप्ताने प्रत्येक मनुष्याला त्याच्या मृत्यू नंतर पुढील जन्मात घालण्यापूर्वी त्या मनुष्याचा एक लेखाजोखा मांडला पाहिजे, मनुष्याने एकदा जरी मानपान, मानापमान, अहंकार, इर्षा, घृणा आदी गोष्टींचा वापर त्याच्या जीवनात केला असेल तरी त्याला परत मनुष्य जन्म देऊन जोपर्यंत तो प्रेम, वात्सल्य, माया, ममता, असल्या बाबीं त्याच्या जीवनात तो आचरणात आणित नाही तोपर्यत त्याच्या आत्म्याला मोक्ष देता येणार नाही असा नियमच केला पाहिजे.

मग कुठलीही सासू कारल्याच्या वेलीसाठी, चांदीच्या लवंगसाठी अडून बसणार नाही, आणि वर नमूद केलेल्या कुठल्याही नात्यात अहंकार, इर्षा, घृणा, राहणार नाही. मग आयुष्य सुंदर होण्यास कितीसा वेळ लागणार आहे? हे सर्व जेव्हा साध्य होईल त्याचवेळी सर्व जगात शांतता नांदेल आणि प्रत्येकाच्या जीवनाला त्याच्या जगण्याला अर्थ येईल आणि तीच त्याच्या जीवनाची आणि जगण्याची इतिकर्तव्यता असेल. काय पटतंय का?

--
जयंत अलोणी
jhaloni@gmail.com

2 comments:

क्रांति ८ नोव्हेंबर, २०१० रोजी ९:०० PM  

वरील सर्व नात्यात प्रेमाची पेरणी केली .......................... हे विचार खूप खूप मनापासून आवडले आणि पटले. खरच प्रत्येकान जर हे अमलात आणायचे ठरवले तर नाट्यामधली विनाकारण वाढत जाणारी तेढ कमी होईल आणि कोणतही नात हे ओझ न होता आनंद फुलवणार झाड होईल.

अनामित,  १२ नोव्हेंबर, २०१० रोजी २:५९ AM  

धन्यवाद
क्रांती
आपला अभिप्राय वाचून अत्यंत आनंद झाला

टिप्पणी पोस्ट करा

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.

मोगरा फुलला दीपावली अंकाबद्दलचा आपला अभिप्रायही अवश्य नोंदवा.

काही सूचना किंवा सल्ले द्यायचे असतील तर इथे क्लिक करा.

वरील साहित्यावरही आपली प्रतिक्रिया अवश्य द्या.

धन्यवाद.


Creative Commons License
मोगरा फुलला ई-दीपावली अंकामधील कोणत्याही प्रकारचे साहित्य हे Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 3.0 Unported License च्या अंतर्गत सुरक्षित आहे. अंकातील साहित्याच्या पुन:प्रकाशनाचे व्यापक अधिकार हे अंकातील साहित्य कोणत्या प्रकारचे आहे, यावर अवलंबून आहेत.


© 2011 Mogaraa Fulalaa. मोगरा फुलला ई-दीपावली अंक हा ’मोगरा फुलला’चाच एक भाग आहे. मोगरा फुलला ई-दीपावली अंकात प्रकाशित झालेल्या साहित्याचे सर्व हक्क हे त्या साहित्याच्या मूळ निर्मात्यांकडेच सुरक्षित आहेत. मोगरा फुलला दीपावली अंकाच्या प्रकाशित होणा-या आवृत्तीमधील कुठल्याही साहित्याच्या पुन:प्रकाशनासाठी संबंधित साहित्याच्या मूळ निर्मात्यांशी संपर्क साधावा अथवा मोगरा फुलला ई-दीपावली अंकाच्या संपादकांशी mogaraafulalaa@gmail.com या आयडीवर संपर्क साधावा.