कलर’फूल’

बरं मला एक सांगा. तुम्हाला या शब्दांचे अर्थ माहिती आहेत का? खरं तर 'बरं' या शब्दाने पोस्टच्या पहिल्या वाक्याची सुरुवात करत नाहीत पण थेट "तुम्हाला या शब्दांचे अर्थ माहिती आहेत का?" असला काहीतरी प्रश्न विचारून कशी सुरुवात करणार?? म्हणून मग जरा आधाराला, टेकायला म्हणून 'बरं' वापरला..... बरं का!! ;)

रंगीला
रंगीत
रंगारी
रंगीबेरंगी
रंगकर्मी


तर सांगा बघू, या शब्दांचे अर्थ माहित आहेत का? म्हणजे प्रत्यक्ष अर्थ नका सांगू, फक्त अर्थ माहित आहेत की नाही तेवढंच सांगा. होय की नाही? ते पत्त्यांच्या जादूत जादूगार समोरच्याला नाही का म्हणत की "हे पान बघा आणि लक्षात ठेवा. मला नका सांगू" .. अगदी तसंच..

या जगात प्राथमिक रंग किंवा प्रायमरी कलर तीनच. पिवळा, निळा आणि लाल. या रंगांपासून इतर सगळे रंग बनतात, तयार करता येतात. हे तीन रंग म्हणजे मूळ रंग आणि उरलेले सगळे ते सगळे मिश्र रंग. त्यामुळेच मला या तीन प्राथमिक रंगांबद्दल जेवढं प्रेम (वाचा ज्ञान) आहे तेवढंच इतर रंगांबद्दल अजिबात नाही. अर्थातच हे तीन रंग कळले की झालं आणि इतर रंगांवाचून आपलं काही अडत नाही असं माझं ठाम मत (वाचा अज्ञान) काही वर्षांपूर्वीपर्यंत होतं. तर हे प्राथमिक रंग लक्षात ठेवून बाकीचे उरलेले रंग म्हणजे त्याच रंगांना डार्क किंवा फिकट/फेंट चे प्रिफिक्स लावून मी ओळखायचो. थोडक्यात सूर्यफूल म्हणजे डार्क पिवळा आणि लिंबू म्हणजे फेंट किंवा फिक्कट पिवळा. झालं संपलं. उगाच त्या लेमन यलो, क्रोम यलो, यलो ऑकरच्या (या 'यलो ऑकर'ला कोणी कोणी 'हगरा' रंगही म्हणायचे. आम्ही म्हणायचो नाही हे सांगण्यासाठीच मुद्दाम 'कोणी कोणी' या शब्दाची योजना केली आहे हे चाणाक्ष वाचकांनी .... ) भानगडी नाहीत. कालांतराने फेंट किंवा फिक्कट हेही फार 'व्हर्नाक्युलर' वाटायला लागलं. त्याच्याऐवजी फेड म्हणजे जरा भारीतलं (म्हणजे अर्थ फिकटच हो. शब्द भारीतला म्हणतोय मी) वाटायला लागलं. तर असं फिक्कट-फेंट-फेड करत करत का होईना पण आमचं प्राथमिक रंगांशी असलेलं नातं कायमच तसंच टिकून राहिलं....... थेट लग्न होईपर्यंत !! पण त्यानंतर ...

प्रसंग १:

मागे एकदा दिवाळीत आईसाठी एक साडी घेतली होती. त्या साडीचा रंग, डिझाईन, पोत (कन्फेशन: हा पूर्णतः ऐकीव शब्द आहे. आम्हांस 'पोतं' माहित आहे किंवा 'पोट'. परंतु हे/हा/ही पोत हे आम्हास पूर्णतः अझेप्य आहे. तेव्हा भावनाओंको समझो) वगैरे आईला आणि तिच्या मैत्रिणींनाही इतकं आवडलं होतं की मी साडी घेण्याच्या बाबतीत फार ग्रेट आहे असा माझा (वाचा- माझ्या घरच्यांचा) उगाचच्या उगाचच समज झाला होता. तो उगाचच्या उगाच झालेला समज उर्फ गैरसमज तसाच वाढत वाढत जात कालांतराने इतका दृढ झाला की कसं कुणास ठाऊक पण लग्नानंतर माझ्या बायकोलाही ते खरंच आहे असं वाटायला लागलं. आमचा लग्नानंतरच्या सुरुवातीच्या दिवसांतला उत्साह आणि तिचा माझ्या साड्यांच्या रंगसंगतीबद्दलचा दृढ विश्वास हे दोन्ही ऐन ऐन ऐन भरात असताना एक दिवस तिच्या साडी खरेदीसाठी आम्ही दुकानात प्रवेश करते झालो. आता पुलंच्या 'असा मी असामी' मधल्या डब्बल घोडा, चिकन, मांजरपाट, बोकड, दंडिया सारखी मौज आमच्या (वाचा- बायकोच्या) साडीखरेदीत आली नाही पण उलट ती मौज परवडली असली एक जोरदार फजिती या 'चारुदत्ताच्या' नशिबी आली. आम्ही दुकानात शिरताच शहाडे किंवा आठवले किंवा 'आणि मंडळी' या पैकी कोणीच नसणार्‍या एका सदगृहस्थांनी आमचं स्वागत केलं. नमस्कार-चमत्कार, काय दाखवू, बजेट वगैरे प्रश्नोत्तरांचा तास पार पडल्यावर त्यांनी आम्हाला काहीही बोलायची संधी न देता वेगवेगळया रंगांच्या, निरनिराळ्या प्रकारांच्या असतील नसतील तेवढ्या सगळ्या साड्या आमच्यासमोर आणून ओतल्या. एकेक साडी निरखून बघत असताना बायकोने मधेच मला विचारलं "कुठली आवडली?". हा प्रश्न साडीच्या संदर्भातला आहे याचं भान ठेवून चटकन भानावर येत मी समोर (न)असलेल्या एका साडीकडे बोट दाखवून "ही फिक्कट लाल बरी वाटत्ये." असं म्हणून कोथळ्याऐवजी बोटांवर सुटका करून घेतली.

"अरे ही गुलाबी आहे."
"हो, हो. मला गुलाबीच म्हणायचं होतं. फिक्कट गुलाबी बरी आहे त्यातल्या त्यात."
"मग लाल काय म्हणालास?" तिने (फिदीफिदी) हसत पृच्छा केली.
"अग फिक्कट लाल म्हणजेच गुलाबी. आणि फिक्कट गुलाबी म्हणजे...." काही सुचेना तेव्हा मी क्षणभर गप्प बसलो आणि तेवढ्यात त्या सदगृहस्थांनी दावा साधला.
"दुधगुलाबी!"
"काय?" मी खेकसलो.
"दु-ध-गु-ला-बी!..... फिक्कट, फिक्कट, फिक्कट गुलाबी म्हणजे दुधगुलाबी, म्हणजेच या साडीचा रंग!" 'नवीन लग्न झालेल्या जोडप्याच्या प्रायव्हेट संवादात (साडी विषयी असला तरीही) तोंड खुपसू नये' या सर्वमान्य, जगन्मान्य नियमाला पायदळी तुडवत त्याने मी दाखवत नसलेल्या (मला दिसतही नसलेल्या) एका फिक्कट लाल किंवा त्याच्या भाषेत फिक्कट फिक्कट फिक्कट लाल उर्फ गुलाबी उर्फ दुधगुलाबी साडीकडे बोट दाखवलं.

"काय गुलाबी?"
"दुध.. दुध.."
"उग्गाच कैच्याकै!"
"अहो हा रंग दुधगुलाबीच आहे. म्हणजे एकदम हलका हलका गुलाबी."
"मग मी तेच म्हणालो ना !! फिक्कट गुलाबी.... फिक्कट गुलाबी, दुध गुलाबी. काय फरक आहे. पटॅटो.. पोटॅटो.. दोन्ही एकच" माझ्या त्या पोटॅटोवाल्या हल्ल्याने टो सॉरी तो क्षणभर गांगरला असं मला वाटलं पण माझ्या त्या जोकचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही किंबहुना त्याला तो कळलाही नाही हे पाहून वैतागून मी (माझ्याच) कपाळावर हात मारून घेणार एवढ्यात तो पुन्हा म्हणाला.

"साहेब, दुध वेगळं, बटाटा वेगळा. मी इथे गुलाबी रंगाविषयी बोलतोय. दुधगुलाबी.. दुधगुलाबी.. रंग, रंग.. ही साडी दुधगुलाबी रंगाची आहे." भाजीबाजार, दुधमार्केट ते साड्यांचं दुकान असा बहिर्गोलाकार फेरफटका (आपला लॉंगकट हो) मारत मारत मी पुन्हा साड्यांच्या दुकानात शिरेपर्यंत माझा आणि त्या हिरोचा संवाद ऐकून यथेच्छ हसून झाल्यावर बायको एकदम त्याला म्हणाली, "जाऊ दे हो. माझा नवरा असाच 'रंगीला' आहे जरा.."

एकदम गुदगुल्या झाल्यासारख्या वाटल्या आतमध्ये. साड्या, दुकान, गुलाबी, फिक्कट लाल, दुधगुलाबी, पोटॅटो सगळं सगळं विसरून गेलो क्षणभर.. एकदम हलकं हलकं वाटत होतं.

प्रसंग २:

एकदा बायकोला हपिसातल्या एकाचा बिनडोक किस्सा ऐकवत होतो. हपिसातला बिनडोकपणाचा किस्सा म्हणजे अर्थातच बॉसचा असणार हे ज्याप्रमाणे आत्ता समस्त वाचकांनी ओळखलं त्याप्रमाणेच माझ्या चतुर चाणाक्ष बायकोनेही ते तेव्हा ओळखलं. त्या दिवशी आमच्या डॅमेजरला काहीतरी कारणासाठी बाहेर जायचं होतं आणि स्वतःचं पेट्रोल हजार रुपये लिटर आणि लोकांचं (वाचा- टीममध्ये काम करणार्‍या साध्याभोळ्या गरीब बापड्या जनतेचं) पेट्रोल दहा रुपये लिटर असा स्वतःचा जाणूनबुजून गैरसमज करून घेऊन, तोच कुरवाळत बसत त्याने बाहेर जाण्यासाठी माझी बाईक मागितली. कारण काय तर माझी बाईक पार्किंग लॉटच्या एन्ट्रन्सला लावलेली होती. मला कोणालाही गाडी द्यायला फार जीवावर यायचं (येतं आणि येत राहील). पण निव्वळ बॉसने मागितली या महत्वाच्या कारणामुळे आणि अप्रायजल जवळ आलेलं होतं, या त्याहीपेक्षा महत्वाच्या कारणामुळे नाईलाजास्तव, जड अंतःकरणाने, जिवाची काहिली, तगमग जे काय म्हणतात ते होत असूनही त्याला चावी दिली. पठ्ठ्या दात विचकत हसला. हसताना त्याचे सुळे माझ्या बाईकचं पेट्रोल पिणार्‍या आणि बाईकचे लचके तोडणार्‍या बाईक-ड्रॅक्युला सारखे भासले. अर्थात बिचारा नुसताच प्रेमाने (पक्षि दात न विचकताही) हसला असेल आणि ड्रॅक्युला बिक्युलासारखा वाटलाही नसेल, असं जर तुम्हाला वाटत असेल तर मी तरी इतकंच म्हणेन की तुम्ही माझा (एवढा चांगला, छान, मस्त) लेख वाचताय ना? मग बाजू कोणाची घेणार तुम्ही? तुम्हीच ठरवा.. मला नका सांगू.. हां अगदी ते मगाचसारखंच किंवा त्या जादुगारासारखंच. असो. तर दात विचकून/न विचकता [इथे काय वाचायचं ते मी तुमच्या सद्सद्विवेकबुद्धीवर सोडतो ;)] तो ड्रॅक्युला बाहेर जाण्यासाठी पुढे सरकणार एवढ्यात मी त्याला म्हणालो. "(अरे ए गधड्या,) गाडीचा नंबर माहित्ये का? XXX-yyyy.. ती निळ्या......."

"हो, माहित्ये माहित्ये.. ती बर्गंडी रंगाची आहे तीच!"
"काय? बर्गंडी???" आता तो चावी नक्की कुठल्या बाईकमध्ये घालतो (आणि माझ्या चावीची विल्हेवाट लावतो) या विचाराने (आणि त्या भयंकर उच्चाराच्या विचित्र रंगाच्या कल्पनेने) माझ्या बरगडीतून एक मोठ्ठी कळ आली. पण ती कळ ओसरेपर्यंत तो (वायुवेगाने दौडत दौडत वगैरे) दिसेनासाही झाला. तरीही अगदी राहवेना म्हणून जरा वेळाने मी पार्किंग लॉटमध्ये एक फेरी मारून आलो. आणि त्यावेळी मला तीन साक्षात्कार झाले.

१. बॉसची बाईक माझ्या बाईकच्या शेजारीच होती.
२. बॉसने रंग बरोब्बर ओळखून माझीच बाईक नेली होती आणि...
.
.
.
.
.
.
.
३. माझ्या डार्क निळ्या रंगाच्या बाईकला बर्गंडी रंगाची बाईक असंही म्हणतात.


एवढं सांगून मी बायकोला विचारलं "अगं, कुठला हा बरगडी रंग? आपली बाईक डार्क निळी आहे की बरगडी? बरगडी म्हणजे नेमका कुठला रंग?"

ती बाकी काही न बोलता हसत हसत फक्त एवढंच म्हणाली "जाऊदे रे.. तू असाच रंगारी आहेस."

आता 'रंगारी' हा शब्द 'रंगीला' एवढ्या गुदगुल्या वगैरे करणारा काही नाही हे स्वतः 'पेंटरबुवा' पण मान्य करतील पण तरीही 'रंगीला' शब्दाचाच रोमँटीक चुलत मित्र वगैरे याअर्थी मला 'रंगारी' शब्दही जवळपास तेवढ्याच गुदगुल्या करून गेला.

असो. तर त्यानंतर असेच वेगवेगळे, साधे, छोटे किस्से होत राहिले. सगळे सांगून उगाच पकवत नाही तुम्हाला. पण अगदी थोडक्यात सांगायचं तर तो किरमिजी* शर्ट घेताना मला मिळालेली 'रंगीत' ही पदवी किंवा तिचा फिक्कट केशरी उर्फ अबोली* ड्रेस घेताना मिळालेली 'रंगकर्मी' ही पदवी, किंवा मग तिचं मरून रंगाचं नेलपॉलिश घेताना लाभलेली 'रंगीबेरंगी' ही पदवी असे अनेक अनेक किस्से घडले, घडत राहिले आणि मला अशी लाडाची नवीननवीन छोटीमोठी नावं बहाल करत राहिले.

*किरमिजी म्हणजे कुठला रंग हे तर मला अजूनही माहित नाहीये. फक्त बायको म्हणजे म्हणून मी त्या शर्टाला किरमिजी शर्ट म्हणतो. थोडक्यात "आमच्या कपाटात किरमिजी शर्ट दाखवा आणि हजार रुपये मिळवा!"(या वाक्यात किरमिजीच्या ऐवजी अबोली किंवा मरून वाचून ते वाक्य तसंच्या तसं पुढे वाचलंत तरी काही फरक पडत नाही. मतितार्थ, भावार्थ, शब्दार्थ, रूढार्थ वगैरे सगळे 'र्थ' तेच!)

पण असं होता होता एक दिवस एक विलक्षण अवचित प्रकार घडला.. म्हणजे म्हटलं तर साधासुधाच पण म्हटलं तर फार भयानक. काय म्हणायचं, कुठली बाजू घ्यायची हे तुम्ही ठरवा.. आठवा सद्सद्विवेकबुद्धी वगैरे वगैरे..

त्या दिवशी जेवायला बसलो होतो. माझ्या आवडीची चांगली बटाट्याची भाजी होती. (नुकत्याच केल्या गेलेल्या एका सर्वेक्षणाच्या आधारे डोंबिवलीहून सीएसटीकडे जाणारी कुठलीही ट्रेन थांबवून आतल्या लोकांच्या बॅगा उघडून त्यातले डबे उघडून बघितले तर शंभरपैकी नव्व्याण्णव लोकांच्या डब्यात बटाट्याची भाजी किंवा कांदा-बटाट्याची भाजी किंवा कांद्यात बटाटा घालून केलेली भाजी किंवा बटाट्यात कांदा घालून केलेली भाजी यापैकी एक आढळते असे मत नोंदविण्यात आलेले आहे. असो..). एवढी आवडती भाजी असूनही मी नीट जेवत नाहीये हे चाणाक्ष, हुशार, चतुर वगैरे वगैरे बायकोने लगेच ओळखलं.

"का रे जेवत का नाहीयेस? आवडली नाही का भाजी? तुझी आवडती तर आहे."
"अग आवडली गं... पण..."
"पण...?"
"नाही, तसं नाही.. पण भाजीचा रंग जरा नीट नाही आलाय."
"नीट म्हणजे?"
"म्हणजे आपला तो छान खमंग पिवळा असा गं."
"अरे, हा पिवळाच आहे."
"हो पण नेहमीसारखा छान खरपूस पिवळा रंग नाही आलाय."
"अरे त्यात काय! मिरच्यांचा, हळदीचा रंग वगैरे थोडाफार वेगळा असतो कधीकधी. त्यामुळे वेगळा रंग वाटत असेल. पण त्याने चवीला काय फरक पडतोय? ...आणि तुझा तो आवडता खमंग, खरपूस का कुठला तो पिवळा रंग नाही म्हणून तू जेवणार नाही की काय?"
"अग तसं नाही गं. पण तो तसा नेहमीचा छान पिवळा रंग असल्याशिवाय चवच येत नाही. मजाच येत नाही खायला."
"रंगाचा आणि चवीचा काय संबंध?"
"अरे वा! असं कसं? संबंध नाही कसा?"
"बरं, असेल संबंध... पण तुझा आणि रंगाचा काय संबंध?"
"काय?????? काय म्हणालीस???? म्हणजे???"

एकता, करण, शाहरुख/सलमान यांच्या सिरीयलींतल्या/चित्रपटातल्या 'हिरविनी' जशा धक्क्याने (म्हणजे धक्का बसून.. धक्का लागून नव्हे) कपबशा फोडतात किंवा कपूर, जोहर, खान यांच्या सिरीयलींतले/चित्रपटातले 'हिरवे' जसे रागाने टीव्ही, कॉफीटेबल वगैरे फोडतात तसं या धक्क्याने (धक्का बसून नाही तर निदान धक्का लागून तरी) निदान एखादा कप तरी फोडावा असा विचार माझ्या मनात येऊन गेला.

"म्हणजे काय? तेच.. तुझा आणि रंगाचा किंवा तुझा आणि एकूणच रंगांचा काय संबंध?"
"अग तूच तर मला 'रंगीला', 'रंगारी', 'रंगीबेरंगी', 'रंगकर्मी', 'रंगीत' आणि असंच अजून काय काय म्हणायचीस ना? त्याचं काय झालं मग आता?
"त्याचं काय झालं? त्याचं काय होणारे?"
"म्हणजे?"
"म्हणजे हेच की तुला जसे रंग अजिबात ओळखता येत नाहीत तसेच या शब्दांचेही अर्थ अजिबात कळलेले नाहीत." इति बायको.

------

बरं मला एक सांगा. तुम्हाला या शब्दांचे अर्थ माहिती आहेत का? (लेखाच्या शेवटच्या वाक्याची सुरुवात 'बरं' ने होऊ शकते याची कृ. नों. घ्या.)

रंगीला
रंगारी
रंगीत
रंगीबेरंगी
रंगकर्मी

तर सांगा बघू, या शब्दांचे अर्थ माहित आहेत का? पण यावेळी नुसतं 'हो' किंवा 'नाही' असं उत्तर नाही चालणार. तर या शब्दांचे अर्थही सांगा किंवा मग मीच सांगतो. तुम्ही फक्त टॅली करून बघा.

रंगीला: रंग + इल्ला = ज्याचा रंगांशी काहीही संबंध नाही असा तो.
रंगारी: रंग + अरि = रंगांचा अरि उर्फ शत्रू आहे असा तो.
रंगीत: रंग + इत (इति) = ज्याच्यापाशी रंगांची इति होते असा तो.
रंगीबेरंगी: रंगांना 'बेरंग' करून ठेवणारा असा तो.
रंगकर्मी: ज्याला पाहिल्यावर रंगच 'कर्म माझं' असं म्हणतात, असा तो.

--
हेरंब ओक
heramboak@gmail.com

14 comments:

अनामित,  १ नोव्हेंबर, २०१० रोजी १०:३३ AM  

हहपूवा.. लोळालोळी नुसती.. हा लेख खरं तर विनोदी या श्रेणीत घालायला हवा होता.

Suhas Diwakar Zele १ नोव्हेंबर, २०१० रोजी १०:४२ AM  

हा हा हा मस्तच हेरंब...आवडेश

मंदार जोशी १ नोव्हेंबर, २०१० रोजी १०:४५ AM  

अगदी अप्रतीम झालाय रे लेख. धम्माल आली वाचताना!!

प्रमोद देव १ नोव्हेंबर, २०१० रोजी ११:२० AM  

झकास हो हेरंबराव...अरेच्च्या ह्या नावातही रं आहेच की! ;)

मुक्त कलंदर १ नोव्हेंबर, २०१० रोजी ६:३६ PM  

हाहा हेरंब नाव बदलून घे आणि नामकरण कर "रंगराव" किंवा "चतुरंग"....

अपर्णा २ नोव्हेंबर, २०१० रोजी ११:३८ AM  

मस्तच ...एकदम रंगारंग....दिवाळीला तुझ्या बायकोने रांगोळी काढली तर अर्थातच ती तुला रंगांबद्दल काही विचारणार नाही...:)

हेरंब १३ नोव्हेंबर, २०१० रोजी २:२६ AM  

हेहेहे... काका, आभार. पहिलीच प्रतिक्रिया तुमची बघून जाम मस्त वाटलं.

सुहास, धन्स धन्स रे :)

मंदार, खूप आभार्स रे..

काका, खूप आभार... नावातला 'रं' जे का 'रंजले' गांजले मधल्या रं चा आहे ;)

भारत, "रंगराव" किंवा "चतुरंग" हा हा हा .. हेच दोन प्रकार राहिले होते फक्त ;)

तनु, खूप आभार

अपर्णा, तशीही ती कधीच कुठल्याच रंगांबद्दल मला काहीच विचारत नाही. 'जेजे वाले ग्राफिक आर्टिस्ट' आणि अन्य असे दोन विभाग आहेत आमच्याकडे ;)

संगमनाथ, खूप धन्स..

काका, धन्यवाद.

पुन्हा एकदा सर्वांचे 'रंगीबेरंगी' आभार ;)

Unknown २० नोव्हेंबर, २०१० रोजी ६:२४ AM  

KHUPACH खूपच छान लिहिलाय...धमाल आली वाचतांना.....दित्तो माझया नवर्‍या सारखच रंगा प्रेम वाचून !!!

हेरंब २० नोव्हेंबर, २०१० रोजी ९:४५ AM  

हेहे.. धन्यवाद प्राची.. मेन वुईल ऑलवेज बी मेन.. ;)

टिप्पणी पोस्ट करा

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.

मोगरा फुलला दीपावली अंकाबद्दलचा आपला अभिप्रायही अवश्य नोंदवा.

काही सूचना किंवा सल्ले द्यायचे असतील तर इथे क्लिक करा.

वरील साहित्यावरही आपली प्रतिक्रिया अवश्य द्या.

धन्यवाद.


Creative Commons License
मोगरा फुलला ई-दीपावली अंकामधील कोणत्याही प्रकारचे साहित्य हे Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 3.0 Unported License च्या अंतर्गत सुरक्षित आहे. अंकातील साहित्याच्या पुन:प्रकाशनाचे व्यापक अधिकार हे अंकातील साहित्य कोणत्या प्रकारचे आहे, यावर अवलंबून आहेत.


© 2011 Mogaraa Fulalaa. मोगरा फुलला ई-दीपावली अंक हा ’मोगरा फुलला’चाच एक भाग आहे. मोगरा फुलला ई-दीपावली अंकात प्रकाशित झालेल्या साहित्याचे सर्व हक्क हे त्या साहित्याच्या मूळ निर्मात्यांकडेच सुरक्षित आहेत. मोगरा फुलला दीपावली अंकाच्या प्रकाशित होणा-या आवृत्तीमधील कुठल्याही साहित्याच्या पुन:प्रकाशनासाठी संबंधित साहित्याच्या मूळ निर्मात्यांशी संपर्क साधावा अथवा मोगरा फुलला ई-दीपावली अंकाच्या संपादकांशी mogaraafulalaa@gmail.com या आयडीवर संपर्क साधावा.