खिडक्या

मुंबई-पुण्याबाहेर लहान शहरात वाढल्यामुळे की काय न जाणे झाडं, पशु-पक्षी, किडे मुंग्या हे आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग असल्याचं अजाणतेपणीच उमगलं होतं. पुढे काही वर्षांनी मुंबईत आल्यावर सातव्या मजल्यावरच्या सदनिकेत एका मोठ्या खिडकीबाहेरील बॉक्ससारख्या लोखंडी ग्रीलमध्ये आधी कुंड्यांची सोय केली. मगच घरातलं सामान लावायला घेतलं. मी इकडे माझं घर लावत होते आणि बाहेर कबुतरांनी काड्या जमवायला सुरुवात केली. मी त्यांची नीट दखल घेईतोवर कबुतरीणबाईनी दोन अंडी घातलीसुद्धा! मी कपाळावर हात मारला. भविष्य स्वच्छ दिसू लागलं. भविष्यात येऊ घातलेल्या दुर्गंधीने वर्तमानकाळीच नाक वाकडं झालं. मुलं गळ्यात पडली. "आई, राहू दे ना. ते पण त्यांचं घर बनवताहेत ना!" एकदा कबुतरीण बाईंनी अंडी घातल्यावर मी काय करू शकत होते? माझी मूक संमती गृहीत धरून मुलांनी या जोडप्याला आणि येऊ घातलेल्या दोन पिल्लांना दत्तक घेतलं. बसल्या जागी त्यांची खाण्या-पिण्याची सोय केली. मुलं आता त्यांच्या नादी लागली. कावळा आला की कबुतरांच्या जोडीने अंड्यांच रक्षण करू लागली. मुलाचं निरीक्षण वाढलं तशी मी त्यांच्या प्रश्नांनी अडचणीत येऊ लागले.

"अंडी कुठून येतात? कबुतरीण बाई सतत अंड्यावरच का बसलेली असते? तिच्या वजनाने ती फुटत कशी नाहीत? ती अजून किती दिवस अशी बसणार आहे?आम्ही पण अंड्यातूनच आलो का?"एक ना दोन!उत्तरं देतांना आणि प्रसंगी टाळंतांना माझी पुरेवाट झाली. कबुतर दांपत्याला नसेल एवढी उत्सुकता माझ्या लेकरांना होती. आता त्या खिडकीला नवं नाव देण्यात आलं, "Dr. Anuya's Maternity Home".

पिल्लं अंडी फोडून बाहेर आली आणि खिडकी बाहेर दुसरं चौकोनी कुटुंब दिसू लागलं. मातपितरांपेक्षा जास्त आनंद माझ्या मुलांच्या चेहऱ्यावर दिसू लागला. खिडकी बाहेर कबुतर-आईबाबांच्या आणि आत माझ्या मुलांच्या उत्साहाला उधाण आलं. आईबाबा जवळ येताच पिल्लांचं चोच आ वासण, ची ची ची आवाज करणं, त्यांना भरवताना आईबाबांची होणारी धावपळ, कावळ्यापासून पिलांचं रक्षण करण्यासाठी त्यांनी लावून घेतलेल्या पाळ्या, प्रसंगी आक्रमक होणं मुलांनी आसुसून पाहिलं. आजवर आपापल्या हातांनी जेवणारी मुलं एकाएकी मी भरवायचा हट्ट करू लागली. आपल्या जीवनपद्धतीशी असलेलं साधर्म्य आणि भिन्नता ही त्यांनी टिपली असेलच! या बाईपासून आपल्याला काही धोका नाही हे त्या दांपत्याने ओळखलं होतं. एखाद्या माहेर वाशिणी सारखी तिची आणि तिच्या कुटुंबाची बडदास्त राखली जात होती. त्याशिवाय महत्वाचं एक काम मी स्वेच्छेने करीत होते. ते म्हणजे, जमेल तेवढा खिडकीचा तो भाग स्वच्छ ठेवणे! माझी कामवाली बाई माझं घर साफ करते, लादी पुसते तेव्हा मी लांबूनच तिच्यावर एक डोळा ठेवते, ही बया नीट पुसते आहे की नाही असा. तस्सं या कबुतरीण बाई करायच्या! मान डौलदार पणे डोलवत काम पसंतीस पडल्याचं दाखवायच्या!

पुढे मी ज्याला भीत होते तेच झालं! सातव्या मजल्यावरून उडण्याच्या प्रयत्नात पिल्लं ...........!! घरात सुतकी कळा पसरली. मुलं या कुटुंबाच्या प्रेमात पडली होती. मुलांना ताळ्यावर यायला काही दिवस जावे लागले. पण या दरम्यान मुलं बरंच काही शिकली. निसर्गासारखा दुसरा शिक्षक नाही हेच खरं!

त्या घरात चिमण्यांची पण एक गम्मत होती. एका खिडकीतून यायच्या आणि बघता बघता दुसऱ्या खिडक्यातून पसार व्हायच्या. नाहीतर घरातच धांदरटा सारख्या भिरभिरत राहायच्या. सारखी लगबग, सारखी लगबग! कसली एवढी लगीनघाई असते देव जाणे!! एका जागी स्थिर म्हणून राहायच्या नाहीत. बरोबर कुणी असो वा नसो तोंडाचा पट्टा सुरूच! एवढास्सा जीव आणि केवढी ती चिव चिव... दोघी-तिघी असतील तर मग पाहायलाच नको. एकाच वेळी सर्वजणी चिवचिवत असतात. कोण कुणाचं ऐकतंय कळतच नाही. बरं! टोनल क्वालिटी पण अशी की पक्षांची भाषा येत नसली तरी कळावं, या साळकाया माळकाया एकमेकींच्या उखाळ्या-पाखाळ्या, तुझं- माझं करताहेत. त्या नेमकं काय बोलताहेत हे पु. लं. ना फक्त कळायचं. आरशासमोर थांबायची भारी हौस त्यांना. "सांग दर्पणा कशी मी दिसते?" अशी पोझ घेऊन स्वतःचं रुपडं न्याहाळतांना दंग व्हायच्या. आरशात स्वतःचं प्रतिबिंब पाहून कटाक्ष टाकीत मुरडत एकमेकींचे सल्ले देत आणि घेत कमालीच्या खुशीत असायच्या. पूर्वी नव्याने साडी नेसायला लागलेल्या मुली जशा आरशासमोर तास न तास घालवायच्या तस्सच. मधूनच आरशावर चोच मारून घराबाहेर भिरभिरत जायच्या. पुढे काही वर्षांनी माझी लेक ही आरशासमोर असाच काहीसा अभिनय मनापासून करायची.

माझ्या घरातली पाखरं ही मोठी झाली. त्यांना पंख फुटले. उच्च शिक्षण घेण्यासाठी आणि स्वतःला शोधण्यासाठी घराबाहेर उडाली. घरटे ओस पडले. मुलुंडच्या नव्या घरात चौदाव्या मजल्यावर आल्यावर आधी प्रत्येक फ्रेंच विंडो बाहेर बॉक्ससारख्या लोखंडी ग्रील मध्ये मावतील तेवढ्या कुंड्या ठेवल्या आणि घरातील हिरव्या सदस्यांची संख्या वाढवली. प्रत्येक खिडकीत आतल्या बाजूस बसण्यासाठी दिड फुट रुंदीचा काळा granite. एकूण रचना अशी की आतून पाहणाऱ्याला कुंडीतील हिरवी झाडं दिसावी. कुंड्या नाही. दूरवर national पार्कच्या मागे असलेला येऊर डोंगराचा लांबलचक भाग दिसावा. गेल्या काही वर्षात प्राजक्त, जाई, लाल आणि पिवळा गुलाब, अबोली, पांढराशुभ्र जास्वंद, वड, लिली इत्यादी झाडं लावली आहेत. सीजनमध्ये खिडकी उघडी ठेवली तर प्राजक्ताचा छोटेखानी सडाच पडतो काळ्याभोर granite वर! खिडकीत बाहेरील बाजूस पाय सोडून बसले की घरातच झाडाखाली बसायचं सौख्य मिळतं.

रोज संध्याकाळी केशरी होत जाणारा सूर्य आकाशातील रंग छटा बदलत अस्तास जातांना पाहण्याचा आनंद काही औरच! "दाखवा आम्हाला कागदावर उतरवून!" असं आव्हान देणाऱ्या रंगछटा ढगांच्या मदतीने झरझर छटा पालटतात तेव्हा आपण निसर्गापुढे किती थिटे आहोत याची जाणीव होते. पावसाळ्यात समोरचा डोंगर हिरवागार होतो. कधी धुक्यात तर कधी पावसात लपंडाव खेळतो. घराजवळचे कदंब, गुलमोहर, बकुळ, कडूनिंब आणि LBS मार्गावरचे वृक्ष सुस्नात पण खुजे दिसतात. जमीन धूसर दिसू लागते. पाण्याचे बारीक बारीक तुषार वाऱ्यासोबत वाहतांना ढगांचा आभास निर्माण करतात. आपण ढगांच्याही वर बसून हा निसर्गरम्य सोहळा पाहतोय असं वाटतं.

एकदा ग्रीलवर एक खार धापा टाकीत मान वाकडी करून माझ्याकडे पाहत असतांना दिसली. धस्सं झालं. पडली बिडली म्हणजे एवढ्या उंचीवरून? चौदावा मजला म्हणजे एकावर एक दोन मोठे वृक्ष! तिचं हे चौदा मजले चढून वर मला भेटायला येणं अगदीच व्यर्थ होऊ नये म्हणून तिच्यासाठी खाऊ आणि पाणी ठेवू लागले. आता ती तिच्या दोन मैत्रिणींसह तोल सांभाळत वर येते. रामाने कौतुकाने पाठीवरून फिरवलेली तीन बोटं दाखवून "हम भी कुछ कम नही" असा भाव खाते. चिमण्या, कावळे, कबुतरे, साळुंक्या आणि क्वचित एखाददुसरा अनोळखी पक्षी येऊन या खाऊचा फन्ना उडवतात. "एक घास चिऊ चा, एक घास काऊ चा" असं म्हणत मुलांना भरवायचे दिवस इतिहासजमा झालेत. आता काऊ-चिऊलाच भरवायचे दिवस आलेत. केव्हा केव्हा तर त्यांची भांडण ही सोडवावी लागतात मला! प्रसंगी ओरडावं लागतं, माझ्या ओरडण्याचा कावळ्यावर मात्र ढिम्म परिणाम होत नाही. तो उपकार केल्या सारखा उडून जातो. घाबरून नाही. गल्लीच्या दादाला जसे सर्व टरकून असतात तसे हे पक्षी कावळ्यापासून चार हात लांब राहणं पसंत करतात. चिमण्या तर त्याच्या वाऱ्यालाही उभ्या रहात नाहीत. किंबहुना त्याच्या वाऱ्याला उभ्या राहण्याइतक्या चिमण्याच मुंबईत उरल्या नाहीत. केवढी ही दहशत! कबुतरं घरात शिरायला टपलेलीच असतात. बोट दिलं तर हात धरणारी जात आहे ही. संध्याकाळी इथे बसून मी माझ्या संस्कृतभारतीच्या मैत्रिणींशी संस्कृत भाषेत गप्पा करीत असते तेव्हा त्या तिघी खारी-मैत्रिणी मागील पायाने मधून मधून आपले इवले इवले कान खाजवत ऐकत असतात. पाखरं कुतूहलाने आमचं बोलणं ऐकत असतात. जसं काही त्यांना सारं कळतंच!

घरात एकटीच असतांना दुपारी हलक्या आवाजात घातलेली शीळ ऐकू यायची. माझ्या या वयात माझ्यासाठी शीळ वाजवणारा हा कोण रसिक म्हणून शोध घेतला तर कुंडीतल्या मोठ्या झाडावर बसलेले रेशमी पोपटी रंग ल्यालेले, लालबुंद चोच असलेले मिठूमिया दिसले. हरखले! अक्षरशः दोन फुटांवरून त्याचं देखणं, रुबाबदार रुपडं पाहून भाळलेच! खरं बोलायला कुणाची भीती आहे? खरं सांगते, पिंजऱ्यातल्या पोपटाच्या अंगावर ही झळाळी नसते. स्वातंत्र्याचा आनंद असा अंगा-खांद्यावर चमकतो. एक आलाय म्हणजे अनेकही येतील असा विचार करून पोपटांना आकर्षित करण्यासाठी ग्रीलवर १०-१२ हिरव्या मिरच्या लटकवल्या. पण हिरव्या मिरच्या उन्हाने तांबड्या झाल्या तरीही आकाशात वारंवार दिसणारा पोपटांचा थवा या दिशेला फिरकला नाही. माझा boyfriend मात्र अधून मधून फेरी टाकतोच. त्याचं स्वागत आम्ही दोघंही पेरूची फोड, मिरची, मुगाची डाळ देऊन करतो. एका कुंडीत मिरची लावलीय ती त्याच्यासाठीच.
एक दिवस सकाळी साखरझोपेतच बारीक चीं चीं चीं असा आवाज आला. कुंड्यांच्या आड माझी नजर चुकवून कुणा पक्षाने घरटे केलेय की काय या विचाराने ताडकन उठून बसले. पूर्वानुभव! आवाजाचा वेध घेतला तेव्हा अंदाज आला, एसी च्या बाहेरील बाजूस एखादं घरटे असावं. इलाज नाही. दृष्टी आड सृष्टी! आता माझ्या साखरझोपेची लज्जत वाढली आहे. कोंबड्याच आरवणं कुठलं मुंबईकरांच्या नशिबात?

प्राजक्ताचा भुयिष्ट सडा, घराच्या वेलीची फुलं तोडून केलेला गजरा, जात्याची घरघर, आजीने, मामीने गायिलेल्या ओव्या, शेणाने सारवलेली जमीन, धारोष्ण दूध, कोंबड्याची बांग, ते वातावरण मुंबईच्या सिमेंटच्या जंगलात कसं असेल? अशी अपेक्षा करणच चुकीचं आहे. पण मी माझ्या घरात अनेक हिरवे कोपरे निर्माण केलेत. जितक्या खिडक्या तेवढे हिरवे कोपरे. मला चौदाव्या मजल्यावर येऊन आवर्जून भेटणारे प्राणी आणि पक्षी तेवढेच जास्त. त्यांच्या चिवचिवाटाने आणि कलकलाटाने निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचा हा अल्पसा प्रयत्न सफल झाला आहे असे वाटते. कोण म्हणतं, खिडक्या फक्त भरपूर प्रकाश आणि हवेसाठी असतात असं? खिडक्यावाटे घरात आनंद ही शिरतो. ज्ञान-विज्ञानाच्या पलीकडे जाऊन तो आनंद ओळखण्याची दृष्टी मात्र हवी. आनंदाचे हे छोटे छोटे क्षण जगता यायला हवेत. मोठ-मोठे आनंद मिळवण्यासाठी खूप प्रयत्न आणि कष्ट करावे लागतात. ते करण्यासाठी लागणारी उर्जा या छोट्या छोट्या आनंदामधूनच तर मिळत असते. त्यांना कमी लेखण्याची चूक कुणीच करू नये!

--
निशा पाटील
patil.nisha178@gmail.com


9 comments:

कृष्यणकुमार प्रधान १ नोव्हेंबर, २०१० रोजी ५:५३ AM  

शितावरून भाताची परीक्षा करायची तर कथा व लेख वाचोन अंक चांगलाच वाटतो आहे.अभिनंदन

Suhas Diwakar Zele १ नोव्हेंबर, २०१० रोजी १०:०२ AM  

खूपच सुरेख...
किती हळूवारपणे ह्या साध्यासाध्या गोष्टी आपल्याला आनंद देऊन जातात..शब्दात ते सहजासहजी व्यक्त केलत आपण. शुभेच्छा

pranay २ नोव्हेंबर, २०१० रोजी २:३१ PM  

खूप सुरेख लिहिले आहे तुम्ही खरच खिडीकी मुळे किती गोष्टीसमजतात हे आजच कळले,पण खरच मुंबईच्या ह्या सिमेंटच्या जंगाला मधे निसर्ग हरवल्या सारखा वाटतो

Nisha ३ नोव्हेंबर, २०१० रोजी ११:२७ AM  

धन्यवाद. रोजच्या घाई-गडबडीत कुणाला वेळ आहे या छोट्या छोट्या गोष्टींकडे पाहायला? Nobody has time to stand and stare. माझ्याकडे वेळ आहे म्हणून सत्कारणी लावतेय. तुम्हालाही तो मिळावा ही सदिच्छा! शुभ दिपावली.

संगमनाथ खराडे ५ नोव्हेंबर, २०१० रोजी १२:४२ AM  

खूप - खूप सुंदर लेख आहे...अगदी मनापासून आवडला.

मला ही खूप लवकर ६ व्या मजल्यावर राहायला जायच आहे, तेव्हा हे सारे अनुभव नक्कीच कामी येतील...:)

क्रांति ८ नोव्हेंबर, २०१० रोजी ८:५२ PM  

लेख आवडला निशाताई. माझ्या किचनच्या खिडकीतूनही समोरच्या औदुंबराची फळं खायला इतके वेगवेगळे पक्षी येतात सकाळी सकाळी. तसंच खारुल्याही मस्त तुरुतुरू फिरत रहातात. ही सगळी पाहुणे मंडळी पहात कामाचा ताणही जाणवत नाही. खूपच सुरेख लिहिलंय तुम्ही!

Nisha ८ नोव्हेंबर, २०१० रोजी १०:५३ PM  

To be happy is one's own ability. But I think to some extent it can be developed. प्रयत्न मात्र करायला हवेत. तेवढा वेळही हवा. त्यासाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा! धन्यवाद.

Smita Rashinkar,  ९ नोव्हेंबर, २०१० रोजी १२:०० PM  

खिडक्या.....
आपल्या जीवनात इतका विविध प्रकारे आनन्द निर्माण करतात याचा आपण विचारच करीत नाही.
ही नवी ओळख करुन दिल्याबद्दल निशाला धन्यवाद.
खुप सुरेख लेख लिहीला आहे. किती छोटया आणि साध्या गोष्टी आपल्याला आनन्द देउन जातात हे निशाने सहजपणे जाणवून दिले आहे.

Nisha ९ नोव्हेंबर, २०१० रोजी १०:४२ PM  

धन्यवाद स्मिता. आपल्या जागृती थ्रो-बॉल मंडळाची ही पहिली प्रतिक्रिया. छान वाटले.

टिप्पणी पोस्ट करा

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.

मोगरा फुलला दीपावली अंकाबद्दलचा आपला अभिप्रायही अवश्य नोंदवा.

काही सूचना किंवा सल्ले द्यायचे असतील तर इथे क्लिक करा.

वरील साहित्यावरही आपली प्रतिक्रिया अवश्य द्या.

धन्यवाद.


Creative Commons License
मोगरा फुलला ई-दीपावली अंकामधील कोणत्याही प्रकारचे साहित्य हे Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 3.0 Unported License च्या अंतर्गत सुरक्षित आहे. अंकातील साहित्याच्या पुन:प्रकाशनाचे व्यापक अधिकार हे अंकातील साहित्य कोणत्या प्रकारचे आहे, यावर अवलंबून आहेत.


© 2011 Mogaraa Fulalaa. मोगरा फुलला ई-दीपावली अंक हा ’मोगरा फुलला’चाच एक भाग आहे. मोगरा फुलला ई-दीपावली अंकात प्रकाशित झालेल्या साहित्याचे सर्व हक्क हे त्या साहित्याच्या मूळ निर्मात्यांकडेच सुरक्षित आहेत. मोगरा फुलला दीपावली अंकाच्या प्रकाशित होणा-या आवृत्तीमधील कुठल्याही साहित्याच्या पुन:प्रकाशनासाठी संबंधित साहित्याच्या मूळ निर्मात्यांशी संपर्क साधावा अथवा मोगरा फुलला ई-दीपावली अंकाच्या संपादकांशी mogaraafulalaa@gmail.com या आयडीवर संपर्क साधावा.