नामर्द - भाग ४

"राहू दे राहू दे! बारावीला ना तू? तालुक्याच्या कॉलेजात जातेस ना? दादा सांगत असतो कायम तुझ्याबद्दल!"

तिनं मान डोलावली.

"खूप अभ्यास कर. त्याची स्वप्न पूर्ण कर. तुला मोठ्ठी अधिकारी झालेलं पाहायचंय त्याला. त्यासाठीच तिकडे शहरात राब राब राबतोय तो!" तिच्या डोक्यावर हात ठेवत तो म्हणाला आणि त्यानं स्मित केलं.

त्यांचा सगळ्यांचा निरोप घेऊन तो महारवाड्यातून बाहेर पडून घराकडे निघाला.

अचानक त्याला दूरून छोट्या जमावाचा गोंधळ ऐकू आला, पण तो घराच्या विरूद्ध दिशेनं होता. तिकडे दुर्लक्ष करून तो घराकडे पोचला. तर घराचे सगळे दिवे चालू आणि दरवाजा सताड उघडा. त्याला शंका आली म्हणून तो स्मृतीला हाका मारत घरात शिरला. त्यानं अख्खं घर पालथं घातलं, पण घरात कुणीच नव्हतं. तो एकदम धास्तावला आणि धावतपळतच घराबाहेर पडला. त्याच्या डोक्यात तर्‍हेतर्‍हेचे विचार येत होते. काय करावं ते कळत नव्हतं. आणि अचानक समोरून त्याला गगन येताना दिसला.

"काय झालं साहेब? मी तुमच्याचकडे येत होतो, तुमचा रूमाल राहिला होता घरी."
"अरे माझ्या घरचे सगळे गायब आहेत. घर सताड उघडं आहे." अभय पूर्ण भांबावला होता.
"अरेच्चा!" गगनलाही अर्थबोध होईना. "असं करा, तुम्ही इथे बघा, मी इथून जातो. दहा मिनिटं बघू कुणाच्या घरी गेलेत का? नाहीतर मग सरपंचांकडे जाऊ."

...आणि दहाच मिनिटांत गगन ओरडत आला.

"साहेब, साहेब.." त्याला धाप लागली होती.
"काय झालं?"
"साहेब, चावडीसमोर... देवीच्या देवळाच्या पुढ्यात..."
"काय?"
"चला तुम्ही लगेच!" आणि ते दोघे धावत निघाले.
**********

देवळासमोरचं दृश्य पाहून अभय हबकूनच गेला. ५०-१०० लोकांचा जमाव बसला होता. पुढ्यात एक शेकोटी होती. आणि शेकोटीसमोर एका खांबाला स्मृतीला बांधलेलं होतं. तिच्या तोंडात कापडाचा बोळा घातला होता. शेजारी विजयी मुद्रेनं मांत्रिक उभा होता आणि एका बाजूला त्याचं सगळं कुटुंब खाली माना घालून उभं होतं.

अभयला काहीच कळेना. त्याचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. हे सगळं खरंच घडत होतं? तो खांद्यावर गगनच्या झालेल्या स्पर्शानं भानावर आला.

"ए..." तो जोरात ओरडला आणि धावतच जमावातून रस्ता काढत शेकोटीकडे जायला लागला.

सगळे लोक स्तिमित होऊन त्याच्याकडे बघत होते. तो स्मृतीजवळ पोचला आणि पहिल्यांदा तिच्या तोंडातला बोळा त्यानं काढून टाकला. तिला एकदम ढास लागली. तो तिचे हात सोडवू लागला एव्हढ्यात त्याला मांत्रिकानं मागे ढकललं.

"दूर राहा." मांत्रिक दरडावून म्हणाला.
"काय चाललंय काय इथे? मला माझ्या बायकोपासून दूर राहायला सांगणारा तू कोण?"
"ही तुझी बायको राहिलेली नाही, ही चेटकीण आहे."
"काय?" त्याला धक्क्यांमागून धक्के बसत होते. समोर त्याची हतबल बायको त्याला दिसत होती.

"विचार तुझ्याच आईला. तिनंच सगळ्यांसमोर मान्य केलंय, की हिच्यामुळेच तू चेटूक झाल्यागत वागायला लागला आहेस."

अभयनं विस्मयानं वळून आईकडे पाहिलं. ती मान खाली घालून उभी होती. त्याच्या भावानं मान वर केली आणि स्वतःच्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवून पुन्हा मान खाली घातली. अभय आतून पूर्णतः ढासळून गेला होता.

"ही चेटकीण असल्यामुळेच देवाचा कोप होऊन ही वांझ राहिली." मांत्रिक म्हणाला.
"ए...तोंड बंद ठेव तुझं!" अभयच्या अंगात काहीतरी संचारलं आणि त्यानं मांत्रिकाला धक्का दिला. मांत्रिक दोन फूट मागे पडला.

'चेटूक, चेटूक' म्हणून लोक कुजबुजायला लागले आणि एक एक करून उठायला लागले. अभयनं मागे नजर टाकली. गगन कुठेही दिसत नव्हता. लोक अभयवर चाल करून येणार असं वर्तमान होतं. अभयनं आजूबाजूला नजर फिरवली आणि शेकोटीतलंच एक जळतं लाकूड एका बाजूला धरून उचललं. आणि तयारीत उभा राहिला.

"कुणी पुढे आलं आणि माझ्या बायकोला हात जरी लावायचा प्रयत्न केला, तर माझ्याशी गाठ आहे." अभय पूर्णपणे स्मृतीला कव्हर करून उभा होता.स्मृतीच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते.

मांत्रिक उठला आणि पुढे झाला. अभयनं सर्वप्रथम त्याला जोरकस फटका दिला, त्याबरोबर तो मागे कोसळला आणि बेशुद्ध पडला. बाकीचे लोक एकदम घाबरले आणि अभयचा तो आवेश पाहून त्यांची पुढे यायची हिंमत होईना. सगळे थोडे मागे सरले. अभय आईकडे वळला.

"आई.. ही तुला चेटकीण वाटते?"

आई काहीच बोलली नाही.

--
विद्याधर भिसे
vnb2005@gmail.com

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.

मोगरा फुलला दीपावली अंकाबद्दलचा आपला अभिप्रायही अवश्य नोंदवा.

काही सूचना किंवा सल्ले द्यायचे असतील तर इथे क्लिक करा.

वरील साहित्यावरही आपली प्रतिक्रिया अवश्य द्या.

धन्यवाद.


Creative Commons License
मोगरा फुलला ई-दीपावली अंकामधील कोणत्याही प्रकारचे साहित्य हे Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 3.0 Unported License च्या अंतर्गत सुरक्षित आहे. अंकातील साहित्याच्या पुन:प्रकाशनाचे व्यापक अधिकार हे अंकातील साहित्य कोणत्या प्रकारचे आहे, यावर अवलंबून आहेत.


© 2011 Mogaraa Fulalaa. मोगरा फुलला ई-दीपावली अंक हा ’मोगरा फुलला’चाच एक भाग आहे. मोगरा फुलला ई-दीपावली अंकात प्रकाशित झालेल्या साहित्याचे सर्व हक्क हे त्या साहित्याच्या मूळ निर्मात्यांकडेच सुरक्षित आहेत. मोगरा फुलला दीपावली अंकाच्या प्रकाशित होणा-या आवृत्तीमधील कुठल्याही साहित्याच्या पुन:प्रकाशनासाठी संबंधित साहित्याच्या मूळ निर्मात्यांशी संपर्क साधावा अथवा मोगरा फुलला ई-दीपावली अंकाच्या संपादकांशी mogaraafulalaa@gmail.com या आयडीवर संपर्क साधावा.