सौदागर - भाग १

श्वास हळूहळू नॉर्मल व्हायला लागलाय... समोरच बसलेले प्रवासी व संपूर्ण डबा चमत्कारिक नजरेने माझ्याकडे पहातोय. त्यांच्या मनात सध्या एकच प्रश्न आहे, ’हा माणूस वेडा तर नाही?’ का नसावा? असणारच. गाडी सुटायला तब्बल अर्धा तास असताना असं दम लागेपर्यंत धावत येऊन एवढ्या पटकन गाडीत चढायचं कारणच काय? हे म्हणजे, कुत्रा सोडाच पण डायनोसोरचा शोध सगळ्यात पहिल्यांदा, नामशेष झाल्यानंतर, मलाच लागल्यासारखं झालं, नाही का?

नाही. बरोबर आहे. कुठल्याही ’सुरक्षित’ व कसलीही भीती नसलेल्या माणसाला असंच वाटणार. त्यात माझा वेष म्हणजे अंगावर संपूर्ण काळा कोट आणि डोक्यावर काळीच हॅट. फक्त चेहरा तेवढा दिसतोय. त्यामुळे माझ्याबद्दलची भीती आणखीनच वाढत होती. पण आता मी कुणाला काय करू शकणार? सध्या मी स्वत:च अशा जीवघेण्या संकटातून आलोय की, मी काही करू शकणार नाही. पण फक्त पाच तासांपूर्वी. किती? बरोबर. फक्त पाच. त्या पाच तासांत परिस्थितीच काय पण संपूर्ण आयुष्यच पूर्ण पालटलं. तर काय सांगत होतो मी?. हं. फक्त पाच तासांपूर्वी... मी कुणालाही फक्त एका बोटाच्या इशार्‍याने आयुष्यातून कायमचं खल्लास करू शकत होतो.

दॅट वॉज माय प्रोफेशन, यू नो.

आज आत्ताही माझ्या उजव्या दंडावर S अशी मोठी खूण आहे. ही आमच्या ’सौदागर’ या कुख्यात गुन्हेगारी अंडरवर्ल्ड संघटनेची खूण. या खुणेनेच आम्ही सभासदांना ओळखतो. आम्ही कुणीही एकमेकांना चेहेर्‍याने ओळखत नाही. ओळखतो ते फक्त या खुणेने पण या संघटनेचा सुत्रधार ’बॉस’ मात्र प्रत्येकाला ओळखतो. त्याच्याजवळ प्रत्येकाची संपूर्ण माहिती फोटोसहित असते. तर, मी या ’सौदागर’ नावाच्या मुंबईतील सर्वात ’पॉवरफुल’ डेंजरस संघटनेतील एक गँगस्टर होतो. होय. आता ’होतो’च म्हणणार नाही का, पाच तासांपूर्वीपर्यंत.... पण नंतर मात्र....

या सगळ्याची सुरूवात पाच तासांपूर्वी झाली असली, तरी ती ज्या घटनेमुळे झाली तिची पार्श्वभूमी मात्र एक-दोन महिन्यांपूर्वीची आहे. आमचा खरा व्यवसाय म्हणजे स्मगलिंग. तसा एकच नाही, आहेत बरेच व्यवसाय पण ते कायदेशीर. आमचा बॉस म्हणजे अतिशय डोकेबाज प्राणी. मानलं पाहिजे. दोन-दोन ओळखी ठेवणं आणि दोन्ही एकमेकांपासून संपूर्णपणे भिन्न ठेवताना दोन्ही ओळखींचा चुकूनही एकमेकांशी क्लॅश होऊ न देणं… ही गंमत वाटते तुम्हाला? मग?.... असो. तर, आमचा खरा व्यवसाय ड्रग स्मगलिंग.

त्या दिवशी काय झालं, आम्हाला एका पार्टीकडून एका ब्रिफकेसची ऑर्डर होती. ब्रिफकेस अर्थातच हेरॉईनने भरलेली असणार होती. त्याबदल्यात ते आम्हाला दुसरी नोटांनी भरलेली ब्रिफकेस देणारे होते. तर आम्ही ठरल्याप्रमाणे तिथे पोहोचलो. मी आणि माझा एक सहकारी... दोघेच होतो. पण आमची कार तिथे पोहोचताक्षणीच...

धांय, धांय.... थाड, थाड, थाड, थाड, थाड, धांय...!!! क्षणात चारही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. आमच्या कारचे टायर्स आणि काचा क्षणार्धात फुटल्या. आम्ही ताबडतोब उडी दुसर्‍या बाजूने बाहेर पडलो. क्षणभर काय चाललंय, कळेचना. पण लगेच लक्षात आलं, की हे तर पोलिस. बाप रे! याचा अर्थ कुणीतरी संघटनेशी गद्दारी केली होती. कोण असेल तो असो. बॉस त्याला शोधून काढेलच. (...आणि दुसर्‍याच दिवशी त्याचं प्रेत पोलिसांना रस्त्यावर मिळालं.) पण आता पळ काढायला हवा. कारण आमची काहीच तयारी नव्हती. कशी असणार ना? असं आतापर्यंत कधी झालं नव्हतं आणि असं होईल, हे आम्ही गृहीत धरलं नव्हतं.

आम्ही जीव वाचवण्यासाठी आणि त्याहिपेक्षा पोलिसांच्या तावडीत न सापडण्यासाठी सैरावैरा पळत सुटलो. पोलिस तीव्र गतीने आमचा पाठलाग करत होते. तेवढ्यात ताड्‍कन एक गोळी सुटली आणि घुसली ती माझ्या सहकार्‍याच्या पाठीत. त्याने किंकाळी फोडली. मी लगेच त्याच्या दिशेने धावलो. पण तोपर्यंत तो ठार झाला होता. मी आणखीनच घाबरलो. जीव खाऊन पळायला लागलो. सुदैवाने माझा वेग पोलिसांपेक्षा जास्त होता. पळत पळत मी एक वळण घेतलं आणि एका गल्लीत घुसलो. पोलिस मागून येतच होते. घाईघाईने मी एका झोपडीचा दरवाजा ठोठावला. दरवाजा उघडला गेला. मी समोर पाहिलं आणि.....

... पोलिस, जीव, संघटना सर्व काही विसरलो. समोर एक असं अस्मानी सौंदर्य उभं होतं की ते मी ते आजपर्यंत कुठेच पाहिलं नव्हतं. तिच्या सौंदर्याबद्दल सांगायचं तर एवढंच सांगता येईल की त्या सौंदर्याने मधुबालापासून ऐश्वर्या, कतरिनापर्यंत सर्वांना निगेटीव्ह कॉम्प्लेक्स दिला असता. मी बराच वेळ तिच्याकडे पहात राहिलो. माझं एक मन म्हणत होतं की, ’बॉस आणि सौदागर’ हे महत्त्वाचे आहेत, त्यांचा विचार कर. पण दुसर्‍या मनात ’मुन्नाभाई’ मधलं गाणं वाजत होतं,

“ सीख ले, ऑंखो मे ऑंखे डाल सीख ले,
जीवन के पल है चार, मरना है एक बार,
मरने से पहले जीना.... सीख ले!! “

"या, आत या". ती म्हणाली आणि माझ्या मनातली टेप बंद होऊन मी खाडकन भानावर आलो. मला एक गोष्ट व्यवस्थित कळत होती की आपण कोण आहोत हे तिला मुळीच कळता कामा नये. मी आत गेलो. मनात माझी नकली गोष्ट तयार करण्यात मग्न झालो पण माझा प्रश्न तिनेच सोडवला.

"पोलीस निघून गेलेत, घाबरण्याचं काही कारण नाही."

--
कुलस्य जोशी
kulasya@gmail.com

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.

मोगरा फुलला दीपावली अंकाबद्दलचा आपला अभिप्रायही अवश्य नोंदवा.

काही सूचना किंवा सल्ले द्यायचे असतील तर इथे क्लिक करा.

वरील साहित्यावरही आपली प्रतिक्रिया अवश्य द्या.

धन्यवाद.


Creative Commons License
मोगरा फुलला ई-दीपावली अंकामधील कोणत्याही प्रकारचे साहित्य हे Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 3.0 Unported License च्या अंतर्गत सुरक्षित आहे. अंकातील साहित्याच्या पुन:प्रकाशनाचे व्यापक अधिकार हे अंकातील साहित्य कोणत्या प्रकारचे आहे, यावर अवलंबून आहेत.


© 2011 Mogaraa Fulalaa. मोगरा फुलला ई-दीपावली अंक हा ’मोगरा फुलला’चाच एक भाग आहे. मोगरा फुलला ई-दीपावली अंकात प्रकाशित झालेल्या साहित्याचे सर्व हक्क हे त्या साहित्याच्या मूळ निर्मात्यांकडेच सुरक्षित आहेत. मोगरा फुलला दीपावली अंकाच्या प्रकाशित होणा-या आवृत्तीमधील कुठल्याही साहित्याच्या पुन:प्रकाशनासाठी संबंधित साहित्याच्या मूळ निर्मात्यांशी संपर्क साधावा अथवा मोगरा फुलला ई-दीपावली अंकाच्या संपादकांशी mogaraafulalaa@gmail.com या आयडीवर संपर्क साधावा.