सौदागर - भाग ३

तेव्हा मी ते उडवून लावलं. पण नंतर विचार करताना हळूहळू माझ्या लक्षात आलं, की खरंच यात तथ्य आहे. नाहीतरी मी या कामात मजबुरीने पडलो होतो आणि त्या बॉसची हुकूमशाही वागणूक फार त्रासदायक होत होती. मला पाहिजे ते कायदेशीर काम करून आम्ही सुखात राहू शकलो असतो.

ओ.के. मी ठरवलं, बस्स झालं आता. यापुढे बॉस आणि संघटनेला कायमचा रामराम. पण हे काम जेवढं सोपं वाटत होतं तेवढं सोपं नव्हतं. बॉसला जर हे सर्व समजलं तर तो मला नक्कीच जिवंत सोडणार नव्हता. म्हणून मी माझ्या एका मित्राला विश्वासात घेतलं. त्याच्याच मदतीने मी माझ्या पुढच्या मूव्हज करणार होतो. मी सरळ देशाबाहेर जायचं ठरवलं होतं. म्हणजे त्या बॉसचा बापही मला गाठू शकणार नव्हता.

ठरल्याप्रमाणे सगळं पार पडल. तो मित्र आमच्या बदललेल्या नावाचा पासपोर्ट, व्हिसा वगैरे सर्व कागदपत्रांची पूर्तता करणार होता. आम्ही दोन-तीन दिवसांनी निघणार होतो. बॉसला अजून काहीच समजलं नव्हतं.

आणि बरोबर संध्याकाळी सात वाजता बॉसचा एस.एम.एस. “Come Immediately.” पण बॉस काही मिशन सोपवायचं असेल, तर एस.एम.एस.च करायचा आणि बॉसला अजून काहीच समजलेलं नव्हतं म्हणून मी निश्चिंतपणे गेलो. त्यावेळी काय माहीत होतं मला, की माझे ते जीवघेणे पाच तास सुरू झाले होते...

बॉस स्वत:च्या प्रशस्त खोलीत त्रस्त वाघाप्रमाणे येरझर्‍या घालत होता. नेहमीप्रमाणे अंधार्‍या खोलीत दिव्याचं तोंड माझ्याकडे केलं होतं जेणेकरून बॉसला माझा चेहेरा व्यवस्थित दिसावा पण मला त्याचा चेहेरा दिसू नये.

“गुड इव्हिनींग बॉस.” मी म्हणालो.

“मला असं म्हणता आलं असतं तर. पण दुर्दैवाने ते शक्य नाही. तू ’सौदागर’ सोडणार आहेस ना?”

“क्‍... काय.................. काय? काहीतरी काय बोलताय बॉस?” मी चांगलाच घाबरलो.

“नाटक करू नकोस.” बॉस कडाडला. “तुला काय वाटलं, हे माझ्यापासून लपून राहील? तुला मदत करणारा जो मित्र होता ना... हो.... आता ’होताच’ म्हणायला पाहिजे, कारण त्याच्या घरात याक्षणी त्याचं प्रेत आहे आणि त्याला मीच वर पोहोचवलंय, आता बोल...”

काय बोलणार होतो मी, सांगा ना??

“प्‍.... प.... पण बॉस....... बॉस.....”, भीतीने मला काही बोलवलंच नाही.

“शट अप!” बॉसचा आवाज चाबकासारखा फटकारला. “पटापट सांग मला तुझी हकीकत. मग कदाचित तुला जिवंत ठेवीन.”

मी सुटेन या आशेवर त्याला सगळी हकीकत सांगितली.

“हं!” बॉस उद्गारला. “म्हणजे तुला तुझ्या प्रेयसीसोबत नवीन आयुष्य सुरू करायचंय. नक्की करा पण वर.” बॉस छद्मी हसत म्हणाला.

“प्‍.... पण बॉस, मी इतकी वर्षे ’सौदागर’ला बेस्ट सर्व्हिस दिली. गद्दारी न करता.” मी काकुळतीने म्हणालो.

“ठीक आहे. आजपर्यंतच्या तुझ्या कामाला सलामी म्हणून तुझ्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे.”

माझ्या आशा पल्लवीत झाल्या.

“ओ.के. तुला वचन देतो. आजच्या दिवसात माझ्यापासून आणि ’सौदागर’ पासून वाचलास तर आयुष्य तुझं. आता आठ वाजलेत रात्रीचे, बरोबर चार तासांनी दिवस संपेल आजचा. या चार तासांत तू भारताबाहेर.... तसं कशाला.... चल, मुंबईबाहेर जाऊन दाखव. मध्यरात्री बारा वाजेपर्यंत तू ठार होशील.... आणि जर नाही झालास, तर मध्यरात्री बारावर काटा आला, की तू मुक्त! कुठेही जा, मी तुझ्या आयुष्याच्या आड येणार नाही. पण ती वेळ येणारच नाही. माझी माणसं या चार तासांत तुला ठार करतीलच. जा, आता पळ!”

मी अक्षरश: सैरावैरा खोलीच्या बाहेर पळालो. आता तिथे एक सेकंदही थांबणं धोक्याचं होतं. बॉस शब्दाला किती पक्का आहे, हे मला दुसर्‍या कुणी सांगायची गरज नव्हती. तिथून सुरू झाले माझे जीवघेणे चार तास. या चार तासांत मला सुरक्षित रहायचं होतं. ’सौदागर’ पासून लपून. माझा पासपोर्ट, व्हिसा वगैरे त्या मित्राच्या घरीच होता. बॉसने त्याला ठार केलं म्हणजे आता त्या कागदपत्रांची आशा बाळगणं गाढवपणाचं होतं.

आता माझ्यासमोर भलंमोठं प्रश्नचिन्हं होतं. करायचं काय? माझा जुना पासपोर्ट काही कामाचा नव्हता. पोलिसांनी ’ऑन द स्पॉट’ पकडलं असतं. पण नवीन पासपोर्टसाठी माझ्याकडे एक पैसाही नव्हता. बॅंकेच्या खात्यातली सर्व कॅश काढून घ्यावी लागणार होती, लवकरात लवकर.

--
कुलस्य जोशी
kulasya@gmail.com

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.

मोगरा फुलला दीपावली अंकाबद्दलचा आपला अभिप्रायही अवश्य नोंदवा.

काही सूचना किंवा सल्ले द्यायचे असतील तर इथे क्लिक करा.

वरील साहित्यावरही आपली प्रतिक्रिया अवश्य द्या.

धन्यवाद.

Creative Commons License
मोगरा फुलला ई-दीपावली अंकामधील कोणत्याही प्रकारचे साहित्य हे Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 3.0 Unported License च्या अंतर्गत सुरक्षित आहे. अंकातील साहित्याच्या पुन:प्रकाशनाचे व्यापक अधिकार हे अंकातील साहित्य कोणत्या प्रकारचे आहे, यावर अवलंबून आहेत.


© 2011 Mogaraa Fulalaa. मोगरा फुलला ई-दीपावली अंक हा ’मोगरा फुलला’चाच एक भाग आहे. मोगरा फुलला ई-दीपावली अंकात प्रकाशित झालेल्या साहित्याचे सर्व हक्क हे त्या साहित्याच्या मूळ निर्मात्यांकडेच सुरक्षित आहेत. मोगरा फुलला दीपावली अंकाच्या प्रकाशित होणा-या आवृत्तीमधील कुठल्याही साहित्याच्या पुन:प्रकाशनासाठी संबंधित साहित्याच्या मूळ निर्मात्यांशी संपर्क साधावा अथवा मोगरा फुलला ई-दीपावली अंकाच्या संपादकांशी mogaraafulalaa@gmail.com या आयडीवर संपर्क साधावा.