सौदागर - भाग ५

....माझ्या अंगावर पाण्याचे थेंब पडायला लागले... पाऊस!! त्या पावसाने चिकटलेलं सगळं लिक्विड धुऊन काढलं. मी मोकळा झालो. क्षणार्धात मी फुटपाथवरून उडी मारली. भरवेगात मोटारसायकल आणि ट्रक यांची टक्कर झाली. बाईकचा चक्काचूर झाला. बाईकवाला ठार झाला. ट्रकचंही बरंच नुकसान झालं. ट्रक ड्रायव्हर गंभीर जखमी झाला. ’दोनों को अपने किए की’ सज़ा मिल चुकी थी.

आत्तापर्यंत ज्या ढगांना मी शिव्या घालतो होतो, त्या ढगांनीच मला वाचवलं होतं. यावरून मला एक लक्षात आलं. काहीही असो, नशीब आपल्या बाजूने आहे. काही क्षणांपूर्वीची मरगळ लगेच दूर झाली. लढायची नवीन उर्मी मनात जागृत झाली आणि... आयडिया! मला एक अप्रतिम युक्ती सुचली.

बॉसचे सर्व पैसे काढून घेतले आणि वापरले तर...

बॉसचा अकाउंट नंबरही लकीली मला माहीत होता. मी ताबडतोब बॉसच्या बॅंकेत गेलो. बॉसचा अकाउंट नंबर देऊन, त्याची सही करून सर्व पैसे काढून घेतले. त्याची सही करणं मुळीच अवघड नव्हतं. मी फोर्जरीत नक्कीच मास्टर होतो. सर्व व्यवस्थित पार पडलं. बॅंकेत असताना सतत, काहीतरी होईल अशी प्रचंड धाकधूक मनात होती. पण काहीच झालं नाही.

’शत्रू शोध घ्यायला लागला की नेहमी शत्रूच्या घराच्या मागे लपावं. तिथेच शोधायला विसरतो तो.’ हेच खरं.

आता भरपूर पैसे होते. पण जास्त वेळ मुंबईत थांबणं धोक्याचं होतं. म्हणून आधी मुंबईबाहेर जावं आणि मग परदेशात, असा विचार केला. नाहीतरी एकदा बारा वाजले, की मी मुक्त होणार होतो. मग नंतर सावकाश परदेशात जाता येईल.

तिची मला तशी काळजी नव्हती. एकदा मी सुरक्षित ठिकाणी पोहोचलो की तिला बोलवून घेणार होतो. म्हणूनच परदेशात जायची सगळी व्यवस्था करण्यापेक्षा आणि त्यात उगाच वेळ घालवण्यापेक्षा मी ट्रेननेच जायचं ठरवलं.

मी ट्रेनचं रिझर्वेशन केलं. ट्रेन कुठे जाणार होती कुणास ठाऊक. मी फक्त ट्रेनची वेळ पाहिली... रात्री बरोबर बारा वाजता ट्रेन सुटणार होती.... म्हणजे अजून दीड तास.

जास्त वेळ न घालवता मी स्टेशनवर जायला निघालो. एकदा ट्रेनमधे बसलो की संपलं. बॉसची माणसं मला तिथे गाठू शकणार नव्हती. पण...

मी माझ्या कारपार्ककडे गेलो. पण सत्यानाश. कार चोरीला गेली होती. मी इकडे तिकडे बघायला लागलो आणि मला एक ब्रेसलेट दिसलं. त्यावर एकच अक्षर होतं - S !!

XXची त्या बॉसच्या. मला भयंकर संताप आला. कारण ती कार ’सौदागर’ची नव्हती. माझी स्वत:ची होती. तरी ती बॉसने ताब्यात घ्यावी? मी रागाच्या भरात बॉसच्या आख्ख्या खानदानाला शिव्यांनी चेचून काढलं. पण आता त्याचा काय उपयोग? शेवटी नाईलाजाने टॅक्सी केली. टॅक्सी ड्रायव्हर चांगला होता. त्याने टॅक्सी भरधाव सोडली.

“चल बाबा, हाणतोस तर हाण. लवकर तरी पोहोचव.” मी मनात म्हटलं.

टॅक्सी तुफान वेगात धावत होती. मी टॅक्सी ड्रायव्हरशी जुजबी गप्पा मारत होतो आणि अचानक त्याने टॅक्सीचा दरवाजा उघडला आणि क्षणार्धात बाहेर उडी टाकली. त्याआधी त्याने माझ्याकडे एक चिठ्ठी फेकली. मी सुन्न स्टन्ड. बधिर. हे काय, चाललंय काय? मी काही न समजून इकडे तिकडे पहात राहिलो. पण लगेच भानावर आलो. ताबडतोब चिठ्ठी उघडली. त्यात एवढंच लिहिलं होतं.

“ब्रेकमधे बॉम्ब अॅणडजस्ट केला आहे. ब्रेक दाबताच ब्लास्ट होईल. सेव्ह युवर सेल्फ – सौदागर.”

XXXXX! मी एक जबरदस्त शिवी हासडली. तुम्हीही तेच केलं असतं ना??

“अरे, टॅक्सी ८०-९० च्या स्पीडने चालली आहे. रहदारीचा रास्ता आहे आणि सेव्ह युवरसेल्फ. कसं? ते पण सांगा ना ...................... XXX!”

टॅक्सी ८०-९० च्या स्पीडमधे, थांबली तर स्फोट. निमिषार्धात माझ्या मनात हे विचार येऊन गेले. आता पर्यंत रास्ता रिकामा होता आणि सिग्नलही नव्हते त्यामुळे टॅक्सीवाल्याला ब्रेक मारायची गरजच पडली नव्हती पण आता काय करणार? मी विचार करत होतो. कारण अचानक समोरनं बेस्ट बस आली. तीही वेगात. क्षणार्धात मी ड्रायव्हिंग सीटवर उडी मारली आणि जीवाच्या आकांताने टॅक्सी वळवली. अक्षरश: काही सेकंदाच्या अंतराने धडक चुकली होती.

आधी मी माझा श्वास नॉर्मलवर आणला आणि एक निर्णय घेतला. काय व्हायचंय ते होवो. टॅक्सी शक्य तितक्या हळू चालवायची.... शक्यतो डाव्या बाजूने.... सिग्नल्सना थांबायचं नाही. वास्तविक यात मी काय ठरवलं? या परिस्थितीत सिग्नल्सना थांबवणं शक्य तरी होतं का?

तर ठरल्याप्रमाणे रस्त्याच्या डाव्या बाजूने मी गाडी चालवली. तीही अत्यंत कमी वेगाने. समोरची गाडी सिग्नलला थांबली तर लेन बदलून टॅक्सी मोकळ्या लेनला नेत होतो. सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने सिग्नल्स कमी आणि पोलिस तर अजिबातच नव्हते. शेवटी स्टेशनला पोहोचलो.

--
कुलस्य जोशी
kulasya@gmail.com

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.

मोगरा फुलला दीपावली अंकाबद्दलचा आपला अभिप्रायही अवश्य नोंदवा.

काही सूचना किंवा सल्ले द्यायचे असतील तर इथे क्लिक करा.

वरील साहित्यावरही आपली प्रतिक्रिया अवश्य द्या.

धन्यवाद.


Creative Commons License
मोगरा फुलला ई-दीपावली अंकामधील कोणत्याही प्रकारचे साहित्य हे Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 3.0 Unported License च्या अंतर्गत सुरक्षित आहे. अंकातील साहित्याच्या पुन:प्रकाशनाचे व्यापक अधिकार हे अंकातील साहित्य कोणत्या प्रकारचे आहे, यावर अवलंबून आहेत.


© 2011 Mogaraa Fulalaa. मोगरा फुलला ई-दीपावली अंक हा ’मोगरा फुलला’चाच एक भाग आहे. मोगरा फुलला ई-दीपावली अंकात प्रकाशित झालेल्या साहित्याचे सर्व हक्क हे त्या साहित्याच्या मूळ निर्मात्यांकडेच सुरक्षित आहेत. मोगरा फुलला दीपावली अंकाच्या प्रकाशित होणा-या आवृत्तीमधील कुठल्याही साहित्याच्या पुन:प्रकाशनासाठी संबंधित साहित्याच्या मूळ निर्मात्यांशी संपर्क साधावा अथवा मोगरा फुलला ई-दीपावली अंकाच्या संपादकांशी mogaraafulalaa@gmail.com या आयडीवर संपर्क साधावा.