एअरपोर्ट - भाग ४

गुत्ता तिथेच उभा होता. तो बोबड्या आवाजात समजुतीचं काही बोलत मध्ये पडायला गेला. त्यालाही दलबीरनं ढकलून दिलं. तो खाली टारमॅकवर आपटला. त्याच्या टकलाच्या जागी चांगलंच रक्त आलं. मग मी त्याला धरून एका टेक्नीशियन पोराबरोबर टूलरूममध्ये पाठवलं. हातातल्या वॉकीटॉकीवरून ऑफिसात कळवलं आणि फर्स्ट एड बॉक्स आणायला एका लोडरला पिटाळलं.

मग दलबीर त्या गृहस्थांवर टिपेच्या आवाजात ओरडला. “हरामखोर! हाऊ डेअर यू ब्लॉक माय वे..? व्हू ब्लडी गेव्ह यू लायसेन्स टू फ्लाय..?? आय विल सी हाऊ यू गो फर्स्ट.."

आणि मग त्यानं जे केलं त्यानं मी भोंचक्का झालो. त्यानं जवळ उभ्या असलेल्या आमच्या टूल ट्रॉलीतून एक मोठा स्क्रू ड्रायव्हर काढला आणि छोट्या सी वनफाईव्हटूच्या टायरमध्ये भोसकला. टायर फडाड करून फुटला.

मग काय..एअरफोर्सचे मोठे ऑफिसर्स आले. आमची फ्लाईट पुढे चार तास डीले झाली. दोघांनी एकमेकांविरोधात फिर्यादी घातल्या.

त्या गृहस्थांनी " प्राणघातक हल्ल्या "चा आरोप दलबीरवर केला.

एअर फोर्स मध्ये दलबीर विषयी आदर आणि दबदबा असल्यानं त्या लेव्हलवर ते प्रकरण कोणी वाढवलं नाही. पण एअरपोर्ट वर घडलेला असा कुठलाही प्रकार डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हील एव्हिएशनला सिरीयसली घ्यावाच लागतो आणि त्याच्या चौकशीचा ठराविक प्रोटोकॉल असतो.

त्यानंतर मग दिल्लीहून सरकारी चौकशीचा तमाशा सुरु झाला. माझीही ऑपरेशन्स ऑफिसर म्हणून चौकशी झाली. मलाही क्लिअरन्सेसच्या घोळाबद्दल पुन्हा पुन्हा खोदून खोदून विचारण्यात आलं. दलबीरची मेडिकल आणि इतर डॉक्युमेंटपण खूप उकरायला लावली. कंपनीला प्रकरण वाढू द्यायचं नव्हतं.

मला माझी कंपनी आणि सरकारी चौकशी कमिटी या दोघांकडून खूप प्रेशर होतं. पण एकूण ते प्रकरण दाबलं गेलं आणि दलबीर फ्लाईंग करतच राहिला.

त्या वेळी खूप मनस्ताप झाला. दिपू त्या फ्लाईट मध्ये होस्टेस होती. तिचीही विटनेस म्हणून चौकशी झालीच. तिनं मला या सर्व चौकशीत खूप आधार दिला. आम्ही खूप खूप म्हणजे आणखीच जवळ आलो.

आणि एकातून सुटतोय तेवढ्यात नंतर ते विमानाच्या नोजव्हीलचं प्रकरण झालं..

मी माझं हे काम मनापासून करतो. बेसवर गुत्ता सारखा इंजिनीअर असूनही मी स्वत: विमानाच्या इंजिन चेकच्या वेळी हजर असतो. बाहेरून तरी प्रत्येक पार्ट घासून पुसून लख्ख केलाय की नाही ते पाहतो.

त्या दिवशीही मी सगळं नीट बघितलं होतं. फ्लाईट एकदम वेळेवर गोव्याला गेली. दलबीर इन कमांड होता. दीप्ती होस्टेस.

मी आणि गुत्ता दुपारी आडवे झालो. पण गुत्ता काही झोपेना. तो एकदम अस्वस्थ दिसत होता.

मी म्हटलं, " सर, परेशान लग रहे है आज?"

गुत्ता म्हणाला, " देअर इज लॉट ऑफ प्रेशर टू कीप द मशीन एअरबोर्न. कंपनी एकदम लॉस में है आजकल. "

हे तर मलाही माहीत होतं. कंपनीला ब-याच सेक्टर्सवर मार खावा लागत होता. बुकिंग घसरलं होतं. विमान पार्क करण्याचा खर्च ही सुटत नव्हता. आणि फक्त माझ्या बेसचे सेक्टर तुडुंब भरून चालले होते.

सेनगुप्ता पुढं म्हणाला, " कंपनी बोल रही है की जहाज पंदरह मिनट से ज्यादा जमीन पर नही रखो. अब इस प्रेशर में प्रीफ्लाईट चेक्स भी पूरे नाही हो पाते.. सर्व्हिसिंग और स्पेअर पार्ट चेंज की तो बात ही छोड दो. "

मी गप्प बसलो.

गुत्ता मग स्वत:हूनच म्हणाला, " आज फ्लाईट गयी तो है लेकीन नोजव्हील थोडा हल्का जॅम है. वैसेही ले गया दलबीर."

मी गंभीर झालो. ती माझी फ्लाईट होती. माझी दिपू होती त्या फ्लाईट्वर.

कालच मी तिच्याशी सरळ लग्नाचंच बोललो होतो. दोघांनाही सगळं माहीत असूनही ती लाजली तर होतीच.

आधी आम्ही डिनरसाठी एकत्र "कपिला"मध्ये गेलो. दीप्ती हल्ली एकदम खूप प्यायला लागली आहे. तिनं तीन लार्ज भरून जीन घेतली. मी नेहमीचीच आर.सी.

जेवणानंतर तिला घेऊन मी सरळ कंपनी गेस्ट हाउसमध्ये गेलो. सरळ बेडरूम मध्ये गेलो आणि टी.व्ही. लावला. हळू हळू ती माझ्याजवळ सरकून बसली. मग म्हटलं आता कशाला उगीच मन आवरत बसायचं..आम्ही एकमेकांचे होणारच आहोत ना?

--
नचिकेत गद्रे
ngadre@hotmail.com

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.

मोगरा फुलला दीपावली अंकाबद्दलचा आपला अभिप्रायही अवश्य नोंदवा.

काही सूचना किंवा सल्ले द्यायचे असतील तर इथे क्लिक करा.

वरील साहित्यावरही आपली प्रतिक्रिया अवश्य द्या.

धन्यवाद.


Creative Commons License
मोगरा फुलला ई-दीपावली अंकामधील कोणत्याही प्रकारचे साहित्य हे Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 3.0 Unported License च्या अंतर्गत सुरक्षित आहे. अंकातील साहित्याच्या पुन:प्रकाशनाचे व्यापक अधिकार हे अंकातील साहित्य कोणत्या प्रकारचे आहे, यावर अवलंबून आहेत.


© 2011 Mogaraa Fulalaa. मोगरा फुलला ई-दीपावली अंक हा ’मोगरा फुलला’चाच एक भाग आहे. मोगरा फुलला ई-दीपावली अंकात प्रकाशित झालेल्या साहित्याचे सर्व हक्क हे त्या साहित्याच्या मूळ निर्मात्यांकडेच सुरक्षित आहेत. मोगरा फुलला दीपावली अंकाच्या प्रकाशित होणा-या आवृत्तीमधील कुठल्याही साहित्याच्या पुन:प्रकाशनासाठी संबंधित साहित्याच्या मूळ निर्मात्यांशी संपर्क साधावा अथवा मोगरा फुलला ई-दीपावली अंकाच्या संपादकांशी mogaraafulalaa@gmail.com या आयडीवर संपर्क साधावा.