एअरपोर्ट - भाग ३

मी हडबडून कुठून कुठून कुंथून कुंथून दोन मुली आणल्या. दीप्ती एका बर्गरवाल्या हॉटेलमध्ये काउन्टर गर्ल होती आणि रिटा एका एअरहोस्टेस ट्रेनिंग स्कूलची ड्रॉपआउट. त्यांना झटपट दोन आठवड्याचं ट्रेनिंग देऊन कामाला लावून टाकलं. तिसरी निकिता म्हणजे गोरी ब्लू आईड ब्यूटी.. सोळा सतराची असेल. ती एका लष्करी अधिका-याची मुलगी होती. ती कोणातरी पायलटच्या ओळखीनं आली.

निकिताला तर मी कधीच लीव्ह देत नाही. एक तर तिला आपल्या बापाच्या पोझिशनचा माज आहे. आणि रजा मागताना ती शर्टाची वरची दोन बटणं उघडी ठेवून रजा मागते. तिचं प्रत्येक बाबतीत क्लीव्हेज वापरणं मला आजीबात आवडत नाही. सरळ मागेल तर मी देईनसुद्धा.

दीप्ती पहिल्या दिवशी आली तेव्हा खूप बावरलेली होती. एकदम मध्यम वर्गीय मराठी मुलगी. थरथर कापतच होती बोलताना. नंतर मात्र सरावली. रिटा मेनन काळीच होती पण देखणी एकदम. ती ही खूप साधी सुधी होती.

मग त्या तिघी कामात सरावल्या. आम्ही त्यानंतर मैत्री केली.

कंपनी ड्रायव्हर शिवाजी..शिवा..त्याची गाडी त्याच्यासकट आम्ही कॉन्ट्रॅक्टवर घेतली आहे. शिवा चांगला आहे खूप. पिकअपचे घोळ करतो. ब-याचदा दलबीरला किंवा निकिताला विसरून येतो. मग मी दलबीरचा आणि शिवा माझा ओरडा खातो. पण मनानं खूप चांगला. आम्ही त्याच्या गाडीत स्वत:च्या खर्चानं पेट्रोल टाकून त्याला कधीकधी पिकनिकला नेतो. आम्ही म्हणजे मी रिटा आणि दीप्ती. निकिताला आम्ही घेत नाही.

जवळच्याच किल्ल्यावर शिवाच्या गाडीतून जाऊन एका रविवारी आम्ही मजा केली. पाऊस होता. धुकंही जाम. सर्वांनी व्होडका घेतली होती. वाटेतच. मी सिगारेट ओढत नाही. शिवा पण. पण दोन्ही मुली एकामागून एक सिगारेटी ओढत होत्या. मला रिटाला सांगावंसं वाटलं नाही. ती खूप पूर्वीपासूनच स्मोक करते. पण दीप्ती हल्लीच निकिता आणि रिटाच्या नादानं किंवा दबावाखाली ओढायला लागली होती. म्हणून दीप्तीला मी म्हटलं की मला तू सिगारेट ओढलेली आवडत नाहीये.
फक्त तिच्याच बाबतीत मी असं म्हटलं म्हणून तिला छान वाटलं असावं. तिनं मग मला प्रॉमिस केलं की नाही ओढणार म्हणून.

मग त्या प्रॉमिसच्या निमित्तानं धरलेला हात हातात तसाच ठेवून आम्ही धुक्यात लांब फेरी मारून आलो.

त्यानंतर आम्ही जवळ येतच गेलो. आता तर मी तिला दिपूच म्हणतो.

मध्ये एक इन्सिडन्स झाला...

गावातच राहणारे एक हॉबी पायलट गृहस्थ आपल्या बायकोला घेऊन जॉयराईड कम भटकंती म्हणून त्यांचं छोटं दोन सीटर विमान घेऊन नाशिक जवळच्या त्यांच्या गावी निघाले होते. त्यांनी त्यांच्या शेतातच त्यांच्या छोट्या सी वनफाईव्हटू विमानासाठी छोटी एअरस्ट्रिप बनवली होती. हेवा करण्यासारखीच लाईफस्टाईल होती त्यांची.

त्यांचं छोटं विमान आमच्या मोठ्या विमानाच्या वाटेच्यामध्ये उभं होतं आणि त्यामुळे आमच्या विमानात बोर्डिंग होऊनही ते रनवेवर नेता येत नव्हतं. दलबीरनं कॉकपिटच्या काचेतून खूण करून मला आत बोलावलं. मी पाय-या चढून विमानात गेलो आणि कॉकपिट मध्ये डोकावलो. दलबीरचा चेहरा इतका फ्युरीयस झाला होता की बघून माझं पाणी झालं. त्यानं मला सांगितलं की ते मच्छर विमान वाटेतून काढायला सांग आणि नाही ऐकलं तर तू धक्का मारून ते बाजूला ढकलून दे.

मी अर्थात असं करणार नव्हतो. मी फक्त त्या गृहस्थांना सांगितलं की " प्लीज जरा लवकर काढा तुमचं वाटेतून. आमच्या फ्लाईट्चा खोळंबा होतोय."

ते गृहस्थ हट्टी निघाले. ते ऐकेनात. असेही त्यांना क्लीअरन्स नव्हताच. आम्हालाच तो आधी मिळाला होता. पण त्यांनी वाटेत घुसवलेलं विमान काढेपर्यंत आम्ही निघू शकत नव्हतो.

तेवढ्यात हा तिढाझाम सोडवण्यासाठी एअर ट्राफिक कंट्रोलरनं स्वत: डिसिजन घेतला आणि त्या गृहस्थांना आधी "क्लीअर्ड फॉर टेक ऑफ" सांगितलं. आमचा क्लीअरन्स रद्द केला.

आणि एकदम अचानक दलबीर आमच्या बीचक्राफ्टमधून उड्या मारत उतरला आणि अर्वाच्य शिव्या ओरडत त्या छोट्या विमानाकडे धावला. त्यानं त्या विमानाच्या कॉकपिट मधून पायलट गृहस्थांना लिटरली बाहेर खेचलं आणि जमिनीवर पाडलं. मला कळेना की हा काय वेडा झालाय का? की वात झालाय? पिऊन आलाय की काय?

कारण आम्ही प्रत्यक्ष प्री-फ्लाईट मेडिकल टेस्ट कधीच करत नाही. आम्ही सर्व फ्लाईट्साठी नुसते फॉर्म भरून ठेवतो. अल्कोहोल ओडर - निगेटिव्ह. बी.पी. - नॉर्मल. वगैरे असा. मग एक म्हातारे डॉक्टर संध्याकाळी कधीतरी येऊन एकदम दिवसभराच्या मेडिकल टेस्टचे फॉर्म "ओके" म्हणून साईन करून जातात.

--
नचिकेत गद्रे
ngadre@hotmail.com

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.

मोगरा फुलला दीपावली अंकाबद्दलचा आपला अभिप्रायही अवश्य नोंदवा.

काही सूचना किंवा सल्ले द्यायचे असतील तर इथे क्लिक करा.

वरील साहित्यावरही आपली प्रतिक्रिया अवश्य द्या.

धन्यवाद.


Creative Commons License
मोगरा फुलला ई-दीपावली अंकामधील कोणत्याही प्रकारचे साहित्य हे Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 3.0 Unported License च्या अंतर्गत सुरक्षित आहे. अंकातील साहित्याच्या पुन:प्रकाशनाचे व्यापक अधिकार हे अंकातील साहित्य कोणत्या प्रकारचे आहे, यावर अवलंबून आहेत.


© 2011 Mogaraa Fulalaa. मोगरा फुलला ई-दीपावली अंक हा ’मोगरा फुलला’चाच एक भाग आहे. मोगरा फुलला ई-दीपावली अंकात प्रकाशित झालेल्या साहित्याचे सर्व हक्क हे त्या साहित्याच्या मूळ निर्मात्यांकडेच सुरक्षित आहेत. मोगरा फुलला दीपावली अंकाच्या प्रकाशित होणा-या आवृत्तीमधील कुठल्याही साहित्याच्या पुन:प्रकाशनासाठी संबंधित साहित्याच्या मूळ निर्मात्यांशी संपर्क साधावा अथवा मोगरा फुलला ई-दीपावली अंकाच्या संपादकांशी mogaraafulalaa@gmail.com या आयडीवर संपर्क साधावा.