सौदागर - भाग ४

दहाव्या मिनिटाला मी बॅंकेत पोहोचलो. मला आता माझ्या अकाउंटमधले सर्व पैसे काढून हवे होते. मी अकाउंट नंबर सांगितला.

“सॉरी सर, पण या अकाउंटमधे पैसे नाहीत. बॅलन्स निल आहे..” मॅनेजर म्हणाला.

“काय? कसा? माझ्याशिवाय त्याला हात कोण लावणार?”

“आत्ता पंधरा मिनिटांपूर्वीच एक माणूस येऊन गेला. त्याने अकाउंट नंबरही बरोबर सांगितला आणि स्पेसिमन सिग्नेचरही त्याने बरोबर दिली होती. मला आता शंका येतेय की तो खरा की तुम्ही?” मॅनेजर म्हणाला.

आता बोला!!

मी हतबुद्ध झालो. बॉसच्या माणसांनी हे काम व्यवस्थित, कुणाला शंका न येऊ देता पार पाडलं म्हणून नव्हे. जी संघटना अंडरवर्ल्डमधे बादशहा म्हणून ओळखली जाते, त्या संघटनेला हे मामूली काम काहीच नाही. दुसर्यांच्या सहीची बिनचूक नक्कल करणे, हा त्यांच्या डाव्या हातचा मळ होता. तसं कशाला? मीच त्यातल्या बर्यााच जणांना ही कला शिकवली आहे. पण मी खरा हतबुद्ध झालो ते निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे. आता काय करायचं, पैसे कुठून मिळवायचे, निघून तरी कसं जायचं...?? मी बावरून गेलो आणि...

क्षणात सैरावैरा धावत सुटलो. बॅंकेतली लोकं मला वेडा समजून चमत्कारिक नजरेने पहात आपापसांत कुजबुजत होती. त्यांना काय कळणार? ते म्हणतील, “काय मूर्ख आहे, एका माणसाने मदतीसाठी फक्त पेन पुढे केलं, तर त्यात घाबरण्यासारखं काय आहे?”

तुम्हीही हेच म्हणत असाल, नाही का?

नाही, बरोबर आहे. तुम्हाला नाहीच कळणार. पण माझ्या सराईत नजरेने पेनावरचं ’S’ हे अक्षर टिपलं होतं. ते आमचं ’पेन रिव्हॉल्वर होतं.’ मी पळायला एक सेकंद जरी उशीर केला असता, तरी त्या माणसाने ते माझ्या छातीत रिकामं केलं असतं.

याचा अर्थ ’सौदागर’च्या हालचाली सुरू झाल्या होत्या. पण खरं तर त्याने मला ओळखायला नको होतं. कारण मी तर माझ्या दंडावरची खूण झाकली होती. म्हणजे याचा अर्थ, बॉसने आतापर्यंत माझा फोटो त्याच्या सर्व माणसांकडे पोहोचवला होता. म्हणजे आता प्रॉब्लेम असा होता, की बॉसची माणसे मला ओळखू शकत होती पण मी त्यांना नाही.

वा! काय जिंदगी आहे!

निर्माण झालेली परिस्थिती फारच असहाय्य होती. बॉसची माणसे एक सेकंदही वेळ फुकट घालवत नव्हती. त्यांचे मला ठार मारण्याचे प्रयत्न अत्यंत वेगात चालू होते आणि मला तर काहीच सुचत नव्हतं.

आकाश काळ्या ढगांनी गच्च भरलं होतं. आधीच रात्र, त्यात ढगांची दाटी, मन उदास व्हायला लागलं. ढगांची अक्षरश: चीड येते होती. मी फुटपाथवरून एकटाच सुन्नपणे चालत होतो. तेवढ्यात मोटारसायकलवरून एक माणूस भरधाव आला. त्याच्या मोटारसायकलचा बहुतेक कंट्रोल गेला असावा. कारण तो अक्षरश: फुटपाथवर बाईक चढवून माझ्या रोखाने आला. मला समजून चुकलं की तो बॉसचा माणूस आहे आणि मी पळू लागलो. पण तो बॉसचा माणूस नसावा. त्याने अक्षरश: माझ्यापासून दोन इंचावर ब्रेक्स लावले. त्या धक्यामुळे त्याच्या बाईकला लावलेली पिशवी मात्र खाली पडली.

“सॉरी, सॉरी. व्हेरी, व्हेरी सॉरी. बाईकचा कंट्रोल गेला अचानक!” तो म्हणाला.

“नेव्हर माईंड! पण तुमच्या पिशवीत काय आहे?”

“अंडी.” तो रडवेला चेहेरा करत म्हणाला. “आज आमच्या हॉटेलमधे पार्टी आहे म्हणून केकसाठी मालकांनी अंडी आणायला मला पाठवलं होतं. सगळी अंडी फुटली. आता मालकांना काय सांगू? माझी नोकरी टिकली म्हणजे मिळवलं.”

“गुड लक!” मी म्हणालो.

तो रडवेल्या चेहेर्‍याने निघून गेला. मला खरंच वाईट वाटलं. दुसर्याल मिनिटाला पुन्हा दूरवरून बाईकचा आवाज.

“पुन्हा पिटाळलं की काय, हॉटेलवाल्याने अंडी आणायला?” मी स्वत:शीच हसलो.

त्याचवेळेला दुसर्याक बाजूने ट्रकचा आवाज... अरे बापरे! आत्ता परिस्थिती लक्षात आली. ही दोघं बॉसची माणसं आहेत. मी पळण्याचा प्रयत्न केला पण...

...एक पाऊलही पुढे सरकू शकलो नाही. मी जागच्या जागी घट्ट चिकटलो होतो. माझ्या पायाखाली पिवळया रंगाचा रस होता. आतापर्यंत मी त्याला फुटलेल्या अंड्यांचा बलक समजत होतो. पण ते वेगळंच लिक्विड होतं. ती फुटलेली अंडी सुद्धा अंडी नव्हतीच म्हणजे... आणि तो हॉटेलचा वेटरही ’सौदागर’ होता. आता बाईक आणि ट्रक यांच्या मधे आपलं सॅन्डविच निश्चित. मला खात्री पटली तेवढ्यात....

--
कुलस्य जोशी
kulasya@gmail.com

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.

मोगरा फुलला दीपावली अंकाबद्दलचा आपला अभिप्रायही अवश्य नोंदवा.

काही सूचना किंवा सल्ले द्यायचे असतील तर इथे क्लिक करा.

वरील साहित्यावरही आपली प्रतिक्रिया अवश्य द्या.

धन्यवाद.


Creative Commons License
मोगरा फुलला ई-दीपावली अंकामधील कोणत्याही प्रकारचे साहित्य हे Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 3.0 Unported License च्या अंतर्गत सुरक्षित आहे. अंकातील साहित्याच्या पुन:प्रकाशनाचे व्यापक अधिकार हे अंकातील साहित्य कोणत्या प्रकारचे आहे, यावर अवलंबून आहेत.


© 2011 Mogaraa Fulalaa. मोगरा फुलला ई-दीपावली अंक हा ’मोगरा फुलला’चाच एक भाग आहे. मोगरा फुलला ई-दीपावली अंकात प्रकाशित झालेल्या साहित्याचे सर्व हक्क हे त्या साहित्याच्या मूळ निर्मात्यांकडेच सुरक्षित आहेत. मोगरा फुलला दीपावली अंकाच्या प्रकाशित होणा-या आवृत्तीमधील कुठल्याही साहित्याच्या पुन:प्रकाशनासाठी संबंधित साहित्याच्या मूळ निर्मात्यांशी संपर्क साधावा अथवा मोगरा फुलला ई-दीपावली अंकाच्या संपादकांशी mogaraafulalaa@gmail.com या आयडीवर संपर्क साधावा.