शिक्षणाची किंमत

"ए, कँटिनमधून चहा आणा रे कोणी तरी!" दिप्या बेंबीच्या देठापासून कोकलत आपला विशाल देह चिमुकल्या कट्ट्यावर कसाबसा तोलत बसला होता. गेल्या पाच मिनिटातील त्याची ही आठवी आरोळी होती. आणि इतक्या वर्षांनीही दिप्या दि ग्रेट शिपिंग कॉर्पोरेशन डिरेक्टरकडे कोणीही ढुंकून लक्ष देत नव्हते! एवढ्या वर्षांनी कॉलेजचे जुने मित्र-मैत्रिणी भेटले की हे चालायचेच.... आणि आज तर आम्ही सगळेजण मुद्दामहून आपले कॉलेज चौदा वर्षांनीही तसेच दिसते का, ते खास पाहायला आलो होतो! समोर कॉलेजची नवी इमारत मोठ्या दिमाखात उभी होती. तिच्या जागी असणार्‍या आधीच्या जुन्या खुणा पार बुजून गेलेल्या. बघावे तिथे बांधकाम, पायवाटा भासावेत इतपत चिंचोळे रस्ते आणि गर्द हिरव्या झावळ्यांच्या शोभेच्या झाडांनी व्यापलेला परिसर. कधी काळी धूळ, माती आणि विटांचा ढिगारा उरापोटावर बाळगणारे पार्किंग गायब झाले होते. नव्या पाट्या, नवे बांधकाम आणि शिकणारी नवी पिढी....

"माहितेय का? आजकाल तीन लाख मोजावे लागतात आपल्या कॉलेजातून आपल्यासारखी डिग्री घ्यायला...." सुशा पचकला.

"क्कॉय?" काहीजणांच्या चेहऱ्यावर धक्कामिश्रित आश्चर्य होते. पण तीन-चार जण "त्यात काय?!! सगळ्याच शिक्षणाचा खर्च वाढलाय!" अशा आविर्भावात खांदे उडवत होते.

"आपल्या वेळेला वर्षाला आपण दोन हजार भरायचो. पाच वर्षांमध्ये जास्तीत जास्त दहा-बारा हजार भरले. आणि आता तेवढा खर्च फक्त दोन महिन्यांच्या शिक्षणाला येतो.... माय गॉड! टू मच...." एवढा वेळ गप्प बसलेला परेरा उद्गारला. मग कोणीतरी आपल्या लेकाच्या ट्यूशन फीचा विषय काढला.... गप्पांची गाडी मुलांच्या शाळांचा खर्च, क्लास फी इत्यादीवर वळली.

सर्वच जण उत्तम कमावणारे, संपन्न घरातील असल्यामुळे त्यांच्या चर्चा सर्वसामान्य शाळा, साधारण विद्यार्थ्यासंदर्भात नव्हत्याच मुळी.... आपल्या मुलाच्या शाळेत कोणत्या अत्याधुनिक सोयी आहेत, वर्गात किती मुले आहेत, कोणत्या बोर्डाचे शिक्षण आहे, शाळेचा कॅफेटेरिया किती मस्त आहे वगैरे विषयांभोवती त्यांच्या गप्पा घोळत होत्या. मला मात्र राहून राहून परवाच भेट झालेल्या एका दूरच्या आप्तांनी सांगितलेली आठवण अस्वस्थ करत होती.

आता अतिशय समृद्ध, सुखसंपन्न आयुष्य जगत असणाऱ्या ह्या गृहस्थांचे बालपण व तारुण्य एका लहानशा खेडेगावात गेले. अंगभूत हुशारी व जिद्द यांच्या जोरावर त्यांनी शाळेत कायम उत्कृष्ट गुण मिळवले. ज्ञानलालसा तर होतीच पण त्या खेड्यात शाळा कॉलेजाची, वाचनालयाची सोय नव्हती. रोज तालुक्याच्या गावी शाळेत जायचे म्हणजे तासा-दोन तासांची पायपीट. तरीही मोठ्या नेटाने शालांत परीक्षा ते उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली. आता त्यांना शहरात जाऊन पुढचे शिक्षण घेणे शक्य होणार होते. पण राहायचे कोठे? खायचे काय? रस्त्यावर तर राहणे शक्य नव्हते. डोक्यावर छत आणि किमान एका वेळचे अन्न एवढी जरी सोय झाली तरी त्यांच्या शिक्षणाचा पुढचा मार्ग खुला होणार होता. शेवटी एका नातेवाईकांच्या छोट्याशा घरात रात्रीच्या जेवणाची व अंथरुणाची सोय तरी झाली. दिवसभर ते घराबाहेर राहून कॉलेज करायचे, वाचनालयात किंवा अभ्यासिकेत उशीरापर्यंत बसून पुढील नोट्स काढायच्या आणि रात्री मुक्काम गाठायचा असे ते आयुष्य. कष्ट तर पाचवीलाच पुजलेले. पुढे एका जुनाट वाड्याच्या कोपऱ्यातील अंधार्‍या खोलीत एका शिक्षकांनी त्यांची राहायची फुकट सोय करून दिली. त्या बदल्यात मालकांच्या मुलाची शिकवणी घ्यायची. ते कामही त्यांनी आनंदाने केले. सकाळी मालकांच्या मुलीला शिकवले की फी म्हणून प्यायला धारोष्ण दूध मिळायचे. तेवढाच दिवसभरासाठी पोटाला आधार. त्या वाड्यात वीज नव्हती, मग रस्त्यावरच्या दिव्याच्या उजेडात अभ्यास करायचा; असे करत करत त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. कायम आपली उत्कृष्ट श्रेणी राखली. पुढे परदेशात जाऊन उत्तम नाव केले. खोर्‍याने पैसा कमावला. पण कोठेतरी बालपणीच्या शिक्षणाची ती कसरत, ती आबाळ, करावी लागलेली पायपीट त्यांना त्या समृद्ध आयुष्यातही अस्वस्थ करत होती.

कालांतराने त्यांनी आपल्या गावाच्या रहिवाशांशी आपल्या गावी शाळा सुरू करण्याबद्दल बोलायला सुरुवात केली. गावात तोपर्यंत तसा विचार कोणीच केलेला नव्हता. हा मुलगा म्हणजे खरे तर गावातील पहिलाच, जो उच्च शिक्षणासाठी परदेशात गेला आणि तिथे स्थायिक झाला. बाकीच्या ग्रामस्थांचे शिक्षण म्हणजे ते जेमतेम दहावी किंवा बारावी पास झाले तरी डोक्यावरून पाणी ! बहुतेकांनी सातवी - आठवीतच शिक्षणाला रामराम ठोकून पोटापाण्याची वाट धरलेली. अशा वातावरणात शाळा काढायचा उत्साह तसा यथा तथाच होता. परंतु हार न मानता त्या गृहस्थांनी आपले प्रयत्न नेटाने चालू ठेवले. शेवटी गावातील एकाने पुढाकार घेऊन मालकीच्या जमिनीत दोन खोल्या बांधून दिल्या आणि शाळेची सुरुवात झाली.

आज त्या सद्गृहस्थांच्या भक्कम आर्थिक आधारामुळे त्या ठिकाणी शाळेची इमारत उभी आहे. मुलांना दुसर्‍या गावी न जाता आपल्याच गावात शिकायला मिळत आहे. गरीब, कष्टकरी, मजूर कुटुंबांमधील मुलेही तिथे येऊन ज्ञान संपादन करत आहेत. एखादा माणूस असता तर एवढे करून झाल्यावर शांत बसला असता! पण ह्या गृहस्थांचे तसे नाही.... आपल्याला जे हाल सोसायला लागले, जे कष्ट सहन करायला लागले तसे पुढच्या पिढीला करायला लागू नयेत म्हणून ते आजही त्या शाळेच्या प्रगतीसाठी झटत आहेत. वेगवेगळ्या प्रकारे त्या शाळेतील मुलांचा उत्कर्ष कसा होईल ह्यासाठी कार्यरत आहेत. तसेच इतर काही शाळांच्या मुलांसाठीही त्यांचे प्रयत्न चालूच असतात.

एका सुजाण माणसाने आपल्याला मिळालेल्या शिक्षणाची किंमत जाणली. वाचवलेल्या प्रत्येक रुपयातून एक भव्य स्वप्न बघितले. आपल्या पुढच्या पिढीचा भविष्यकाल उज्ज्वल व्हावा, त्यांना आपल्यासारख्या अडी-अडचणी, वाईट परिस्थितींचा सामना करावा लागू नये ह्यासाठी आपल्या कष्टाच्या, घामाच्या पैशाला त्यांनी माणसांमध्ये, ज्ञानात गुंतविले. आज त्या गुंतवणुकीची गोड फळे अनेक गरीब कुटुंबांमधील विद्यार्थी चाखत आहेत.

इकडे आमच्या ग्रुपच्या गप्पा रंगात आल्या होत्या.

"आपण सगळेजण कसले सॉल्लिड क्लासेस बुडवायचो, नाही? लेक्चर बुडवून कँटिनमध्ये चकाट्या पिटायच्या मस्त...." ग्रुपमध्ये कोणीतरी जुन्या दिवसांच्या आठवणींना उजाळा देत होते.

मला क्षणभर स्वतःची शरम वाटली. आपल्या आईवडीलांनी कष्टाने मिळवलेल्या पैशाने आपल्या शाळा-कॉलेजांचे खर्च भागले. ते करत असताना त्यांनीही कोठेतरी झळा सोसल्या, कोठेतरी काटकसर केली, स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष केले. आपल्याला कधीही कोणत्या शैक्षणिक खर्चासाठी "नाही" म्हटले नाही. उलट आपण होऊन वह्या-पुस्तके-शैक्षणिक साहित्याचा वर्षाव केला आपल्यावर! आणि हे सर्व स्वखुशीने, आनंदाने केले त्यांनी! आपल्या मुलांनी उत्तम शिकावे, भरपूर ज्ञान मिळवावे, आयुष्यात यशस्वी व्हावे एवढीच अपेक्षा होती त्यांची. पण आपण फक्त परीक्षेपुरता अभ्यास करत राहिलो. ज्ञान संपादन वगैरे बरीच लांबची गोष्ट.... आपल्याला त्या ज्ञानाची किंमतच कधी कळली नाही....अगोदरच्या पिढ्यांनी शिक्षण मिळवण्यासाठी जे हाल सोसले, जे परिश्रम घेतले त्यापैकी आपण काडीनेही सहन केले नाहीत. आज त्यांच्या त्या कष्टांमुळे आपण सुंदर दिवस बघत आहोत. नाहीतर बसलो असतो असेच कोठेतरी अंधारात चाचपडत.... त्यांच्या त्या श्रमांचे ऋण आहे आपल्यावर.... जे फेडायचा आपण यथाशक्ति प्रयत्न करायलाच हवा.... एकवेळ स्वतःसाठी नाही तर त्या उगवत्या तार्‍यांसाठी. मनात असे अनेक विचार झोके घेत होते.

"गेल्या वर्षी माझ्या मुलीचा वाढदिवस मी एका अनाथाश्रमात साजरा केला. खूप छान वाटलं गं... आणि तेव्हापासून ठरवलं, की आपण दर वर्षी किमान दोन गरजू मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यायची! तू पण करून बघ.... खूप छान वाटतं गं.... " माझी एक मैत्रीण दुसरीला सांगत होती. माझेही कान त्या संभाषणाच्या दिशेने टवकारले गेले. ती सांगत होती, सुरुवातीची काही वर्षे तिच्या मुलीसाठी तिने वाढदिवसाच्या मोठमोठ्या पार्ट्या दिल्या. पण हळूहळू लक्षात येऊ लागले की हे लोण संपणारे नाही. हौसेला मोल नसते. आणि कितीही करायला गेले तरी ते अपुरेच वाटते. त्यात समाधान नाही. आणि त्या पार्ट्यांतही एक प्रकारचा रटाळपणा येऊ लागला होता. नवीन काही करावे ह्या विचारात असतानाच तिचा एका अनाथाश्रमाशी संबंधित व्यक्तीशी परिचय झाला. त्यांच्या सांगण्यावरून ती एकदा त्या आश्रमाला भेट देऊन आली आणि तेथील मुलांच्या निरागस डोळ्यांमध्ये तिचे हृदय हरवून बसली. पुढे आपल्या लेकीलाही तिथे घेऊन गेल्यावर तिच्या लेकीनेच आपला वाढदिवस तिथे साजरा करायची इच्छा बोलून दाखवली. आणि एका वेगळ्या पर्वाला सुरुवात झाली....

कट्ट्यावर शेजारी बसलेल्या आणि हे संभाषण लक्ष देऊन ऐकत असलेल्या एका मित्राने कुतूहलाने ह्या मैत्रिणीकडे इतर तपशिलाची चौकशी करायला सुरुवात केली. बघता बघता सगळेच ऐकू लागले. त्या मैत्रिणीच्या अनुभवाला ऐकल्यावर बाकीच्या लोकांनीही असेच उपक्रम करण्याची इच्छा असल्याचे आवर्जून सांगितले. प्रत्येकालाच आत कोठेतरी ते जाणवत होते. वेगवेगळ्या गावांमध्ये, राज्यांमध्ये विखुरलेल्या व आपापल्या उद्योग-व्यवसायांमध्ये यशाच्या नव्या पायऱ्या चढणाऱ्या आमच्या सहाध्यायींच्या डोक्यात आता आपल्या गावी जाऊन कोणा गरजू विद्यार्थ्याचा शिक्षणाचा खर्च करायची योजना सुरू झाली होती.

कॉलेजात लेक्चर्सना अभावानेच आपली हजेरी लावणारे, उंडारण्यात पटाईत असणारे एकेकाळचे उनाड पण आता जबाबदार असणारे विद्यार्थी ज्ञानाचा हा प्रवाह खेळता ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यास प्रेरित झाले होते. लवकरच निरोप घ्यायची वेळ झाली. एकमेकांचे फोन नंबर्स, ईमेल्स इत्यादी टिपून सगळेजण परत निघाले. निघताना माझ्या मनात विचार होते, आम्हाला कॉलेजात असताना आमच्या शिक्षणाची किंमत कळली नसेल कदाचित. पण आता ती नक्कीच जाणवू लागली आहे. हरकत नाही! झालाय थोडा उशीर... पण अजून करण्यासारखे खूप काही आहे. ही तर सुरुवात आहे.... आपल्याला मिळालेली शिक्षणाची संधी आपण जितक्या जणांना उपलब्ध करून देऊ शकू तितका ज्ञानाचा हा प्रवाह अनेक अंधाऱ्या खोपट्यांमध्ये, चंद्रमौळी झोपड्यांमध्ये पोहोचेल आणि त्या घरातील मुलाबाळांचे आयुष्य बदलू शकेल. आपल्यापासून इतरजण स्फूर्ती घेतील आणि ही मालिका चालू ठेवण्यात त्यांचे योगदान देतील. मिळालेल्या ज्ञानाची किंमत तशी कधीच मोजता येणार नाही.... पण कोणाच्या तरी शिक्षणाची किंमत मोजून त्या ज्ञानाचे नक्कीच उतराई होता येईल.

--
इरावती अरूंधती कुलकर्णी
iravatik@gmail.com

4 comments:

कृष्यणकुमार प्रधान १ नोव्हेंबर, २०१० रोजी ६:०७ AM  

वर दिलेला माझा अभिप्राय लेखिकेस उद्देशून आहे

मंदार जोशी २ नोव्हेंबर, २०१० रोजी ६:१७ PM  

हृदयस्पर्शी लेख.

अरुंधती, नेहमीप्रमाणेच छान.

iravatee अरुंधती kulkarni २ नोव्हेंबर, २०१० रोजी ८:१७ PM  

मंदार, बाबा, प्रतिसादाबद्दल आभारी आहे! :-)

सस्नेह
अरुंधती

Nisha ५ डिसेंबर, २०१० रोजी ४:१६ PM  

माफ करा. उशिरा प्रतिक्रिया देतेय. ज्ञानगंगा अशीच वाहत राहायला हवी. मला आठवतय,यूनिवर्सिटीत होते तेव्हा एकाने मला फ्यूचर शॉक नावाच पुस्तक दिल होत. वाचून झाल की दुसर्‍याला दे म्हणाला होता. तेव्हाच ज्ञानगंगा वाहत ठेवण्याची उर्मि निर्माण झाली होती. ती मधून मधून उफाळून येते. आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. छान जमला आहे लेख. अभिनंदन आणि शुभेच्छा.

टिप्पणी पोस्ट करा

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.

मोगरा फुलला दीपावली अंकाबद्दलचा आपला अभिप्रायही अवश्य नोंदवा.

काही सूचना किंवा सल्ले द्यायचे असतील तर इथे क्लिक करा.

वरील साहित्यावरही आपली प्रतिक्रिया अवश्य द्या.

धन्यवाद.


Creative Commons License
मोगरा फुलला ई-दीपावली अंकामधील कोणत्याही प्रकारचे साहित्य हे Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 3.0 Unported License च्या अंतर्गत सुरक्षित आहे. अंकातील साहित्याच्या पुन:प्रकाशनाचे व्यापक अधिकार हे अंकातील साहित्य कोणत्या प्रकारचे आहे, यावर अवलंबून आहेत.


© 2011 Mogaraa Fulalaa. मोगरा फुलला ई-दीपावली अंक हा ’मोगरा फुलला’चाच एक भाग आहे. मोगरा फुलला ई-दीपावली अंकात प्रकाशित झालेल्या साहित्याचे सर्व हक्क हे त्या साहित्याच्या मूळ निर्मात्यांकडेच सुरक्षित आहेत. मोगरा फुलला दीपावली अंकाच्या प्रकाशित होणा-या आवृत्तीमधील कुठल्याही साहित्याच्या पुन:प्रकाशनासाठी संबंधित साहित्याच्या मूळ निर्मात्यांशी संपर्क साधावा अथवा मोगरा फुलला ई-दीपावली अंकाच्या संपादकांशी mogaraafulalaa@gmail.com या आयडीवर संपर्क साधावा.