पनीर बिर्याणी

वाढणी: ४ ते ६ जणांसाठी
वेळ: साधारण दिड ते दोन ताससाहित्य:
२ कप बासमती तांदूळ
३-४ वेलची, ३-४ तमालपत्र, ३-४ लवंगा, १ लहान दालचिनीची काडी
चवीपुरते मिठ

::::पनीर मॅरीनेशन::::
२५० ग्राम पनीर
१/२ कप दही
१ टिस्पून आलेलसूण पेस्ट
१/४ टिस्पून मिठ

::::ग्रेव्ही::::
१ कप कांदा, उभा पातळ चिरून
५ टोमॅटो
२ टिस्पून आलेलसूण पेस्ट
२ टिस्पून तूप
खडा गरम मसाला - २ वेलची, ३-४ लवंगा, ३-४ मिरीदाणे, २-३ तमालपत्र
१ टिस्पून धणेपूड
१ टिस्पून जिरेपूड
१ टिस्पून गरम मसाला
१/२ टिस्पून लाल तिखट
१ कप मिल्क पावडर (किंवा १/२ कप क्रिम) (टीप ५)
चवीपुरते मिठ
साधारण पाऊण ते एक कप भाज्यांचे तुकडे :- मटार + गाजर लहान तुकडे + फरसबी तुकडे

::::इतर साहित्य::::
४ टेस्पून तूप + अजून तूप ऐच्छिक
१ कप कांद्याचे पातळ उभे काप
८ ते १० काजूबी
८ ते १० बेदाणे
१/४ कप पुदीना, बारीक चिरून
१/४ कप कोथिंबीर, बारीक चिरून
२ टिस्पून दूध + ३ ते ४ केशराच्या काड्या (टीप ६)

कृती:
::::पनीर::::
दही फेटून घ्यावे. त्यात आलेलसूण पेस्ट आणि मिठ घालून मिक्स करावे. पनीरचे तुकडे या मिश्रणात १/२ तास घोळवून ठेवावे.

::::भात::::
१) तांदूळ स्वच्छ धुवून १/२ तास निथळत ठेवावेत. पातेल्यात ६ कप पाणी गरम करण्यास ठेवावे. त्यात वेलची, लवंगा, दालचिनी, तमालपत्र आणि मिठ घालून पाण्याला उकळी येऊ द्यावी. पाणी उकळले कि त्यात धुतलेले तांदूळ घालावे. भात साधारण ६० ते ७० % शिजला कि चाळणीमध्ये ओतावा आणि अधिकचे पाणी काढून टाकावे. तयार भात परातीत मोकळा करून गार होण्यास ठेवावा.

::::ग्रेव्ही::::
१) पाणी उकळवावे. त्यात टोमॅटो घालून २ मिनीटांनी गार पाण्यात सोडावे. सालं सुटली कि काढून टाकावी. आतील गराच्या मध्यम फोडी कराव्यात.
२) कढईत २ टिस्पून तूप गरम करून त्यात खडा गरम मसाला काही सेकंद परतावा. आलेलसूण पेस्ट परतावी. कांदा घालून तो गुलाबी रंग येईस्तोवर परतावा. नंतर चिरलेल्या टोमॅटोच्या फोडी घालून त्या नरम होईस्तोवर परतावे. लाल तिखट घालावे.
३) हे मिश्रण थोडे गार होवू द्यावे. मिक्सरमध्ये पाणी न घालता प्युरी करावी.
४) कढईत साधारण २ टेस्पून तूप गरम करावे. यामध्ये काजूबी आणि बेदाणे परतून बाजूला काढून ठेवावे. याच तुपात हि प्युरी परत कढईत घ्यावी. मध्यम आचेवर गरम करण्यास ठेवावी. त्यात धणेजिरेपूड, गरम मसाला घालावा. मिल्क पावडर घालावी. भाज्या घालाव्यात. निट ढवळून हे मिश्रण घट्टसर करावे. चवीपुरते मिठ घालावे. हि ग्रेव्ही एकदम पातळ किंवा एकदम घट्टही नसावी (टीप १). ग्रेव्ही दाटसर होत आली कि पनीरचे मॅरीनेट केलेले तुकडे घालून थोडा वेळ उकळी काढावी.

::::तळलेला कांदा::::
तुपात किंवा तेलात कांद्याचे पातळ काप (१ कप) खरपूस तळून काढावेत. हा तळलेला कांदा सजावटीसाठी वापरावा.

::::बिर्याणी:::: (टीप २, ३, ४)
एकदा भात आणि ग्रेव्ही तयार झाली कि भाताचे ४ आणि ग्रेव्हीचे ३ असे समसमान भाग करून घ्यावे. एका खोलगट नॉनस्टिक पॅनमध्ये पहिले तूप सोडावे आणि पसरवून घ्यावे. प्रथम भाताचा एक भाग घेऊन समान पसरावा. त्यावर ग्रेव्हीचा १ भाग समान पसरवून घ्यावा. थोडा चिरलेला पुदीना आणि कोथिंबीर घालावी. ३-४ काजू, बेदाणे घालावे. अशाप्रकारे सर्व थर पूर्ण करावे. भाताचा शेवटचा थर दिला कि त्यावर तळलेला कांदा, उरलेले काजू बेदाणे आणि दूधात कालवलेले केशर असे पसरावे. वरती घट्ट झाकण ठेवावे, वाफ बाहेर जाता कामा नये. एकदम मंद आचेवर १५ ते २० मिनीटे वाफ काढावी. गरम गरम बिर्याणी रायत्याबरोबर सर्व्ह करावी.

टीपा:
१) ग्रेव्ही पातळ नसावी. पातळ ग्रेव्हीमुळे बिर्याणी बनवताना भाताची शिते मोडतात आणि भात मोकळा न होता ओलसट आणि गच्च होतो. बिर्याणीचे थर करताना पसरता येईल इतपत दाट ठेवावी.
२) जर ओव्हनमध्ये बिर्याणीला वाफ काढायची असेल ओव्हन २५० डीग्री F वर प्रिहीट करावा. नंतर बेकिंग पॅनमध्ये वरीलप्रमाणेच थर करावे. वरती ओव्हनसेफ झाकण ठेवावे किंवा अल्युमिनीयम फॉईलने घट्ट सिल करावे आणि १५-२० मिनीटे वाफ काढावी.
३) जर नॉनस्टिक पॅन नसेल तर जाड बुडाच्या पातेल्यात तूप घालून वरीलप्रमाणेच थर करावे. आणि डायरेक्ट गॅसवर न ठेवता खाली एक तवा ठेवावा त्यावर भांडे ठेवावे म्हणजे भात करपणार नाही.
४) प्रत्येक थरामध्ये पातळ केलेले तूप गरजेनुसार घालावे. यामुळे बिर्याणीला खुपच छान चव येते.
५) शक्यतो मिल्क पावडर वापरावी म्हणजे ग्रेव्हीला दाटपणा लगेच येतो. तसेच क्रिम वापरणार असाल तर क्रिम घातल्यावर ते ग्रेव्हीमध्ये निट मिक्स होईस्तोवर ढवळा म्हणजे ते ग्रेव्हीत फुटणार नाही.
६) जर केशर नसेल तर चिमूटभर खायचा केशरी रंग २ टिस्पून दूधात घालून तो वापरावा.

--
वैदेही भावे
chakalionline@gmail.com

इतर पाककृती:

2 comments:

Suhas Diwakar Zele ३ नोव्हेंबर, २०१० रोजी ६:२९ PM  

वाह खमंग एकदम..मी नक्की ट्राय करणार...थॅंक्स :)

टिप्पणी पोस्ट करा

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.

मोगरा फुलला दीपावली अंकाबद्दलचा आपला अभिप्रायही अवश्य नोंदवा.

काही सूचना किंवा सल्ले द्यायचे असतील तर इथे क्लिक करा.

वरील साहित्यावरही आपली प्रतिक्रिया अवश्य द्या.

धन्यवाद.


Creative Commons License
मोगरा फुलला ई-दीपावली अंकामधील कोणत्याही प्रकारचे साहित्य हे Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 3.0 Unported License च्या अंतर्गत सुरक्षित आहे. अंकातील साहित्याच्या पुन:प्रकाशनाचे व्यापक अधिकार हे अंकातील साहित्य कोणत्या प्रकारचे आहे, यावर अवलंबून आहेत.


© 2011 Mogaraa Fulalaa. मोगरा फुलला ई-दीपावली अंक हा ’मोगरा फुलला’चाच एक भाग आहे. मोगरा फुलला ई-दीपावली अंकात प्रकाशित झालेल्या साहित्याचे सर्व हक्क हे त्या साहित्याच्या मूळ निर्मात्यांकडेच सुरक्षित आहेत. मोगरा फुलला दीपावली अंकाच्या प्रकाशित होणा-या आवृत्तीमधील कुठल्याही साहित्याच्या पुन:प्रकाशनासाठी संबंधित साहित्याच्या मूळ निर्मात्यांशी संपर्क साधावा अथवा मोगरा फुलला ई-दीपावली अंकाच्या संपादकांशी mogaraafulalaa@gmail.com या आयडीवर संपर्क साधावा.