शेंगोळे

थंडीची चाहूल लागली की शेंगोळ्यांची हमखास आठवण येऊ लागते. नुसत्या आठवणीनेही तोंडाला पाणी सुटते. करायलाही अतिशय सोपे व पटकन होणारे. थोडे तिखटच करायचे व वरून साजूक तूप घालून गरम गरम मटकवायचे. अहाहा!!!
वाढणी: तीन माणसांना एका वेळेस पुरावेत.

साहित्य:
तीन वाट्या कुळथाचे पीठ
पाव वाटी गव्हाचे पीठ
पाव वाटी दाण्याचे कूट
पंधरा ते वीस पाकळ्या लसूण वाटून
तिखट दोन चमचे (सोसत असेल तर थोडे अजून घालावे
हळद व हिंग अर्धा चमचा
चार वाट्या पाणी
नेहमीची फोडणी
चार चमचे तेल
स्वादानुसार मीठ
दोन चमचे तूप (ऐच्छिक)
दोन चमचे कोथिंबीर

कृती:
परातीत कुळीथ व गव्हाचे पीठ, वाटलेला लसूण, एक चमचा तेल, हळद, हिंग, तिखट व स्वादानुसार मीठ व अगदी थोडेसेच पाणी घालून घट्ट मळून घ्यावे. नंतर हाताला तेल लावून मळलेल्या गोळ्यातून छोटासा गोळा घेऊन साधारण बोटाएवढ्या लांबीचे शेंगोळे वळावेत.

एक खोलगट पातेले किंवा कढई मध्यम आचेवर ठेवून तापली की तेल घालावे. तेल व्यवस्थित तापल्यावर नेहमीची मोहरी, हिंग, हळद व चमचाभर तिखट घालून फोडणी करावी. तित दोन चमचे कुळथाचे पीठ घालून तीन चार मिनिटे भाजावे. थोडा खमंग वास सुटला की दाण्याचे कूट घालून परतावे. दोन-तीन मिनिटाने त्यावर पाणी ओतावे व पाण्याच्या अंदाजाने मीठ घालून एक उकळी आणावी. उकळी फुटू लागली की वळून ठेवलेले शेंगोळे हलक्या हाताने पाण्यात सोडावेत. साधारण दहा ते बारा मिनिटात जठराग्नी खवळवणारा वास घरभर दरवळू लागेल. शेंगोळ्याचा छोटासा तुकडा खाऊन पाहावा. सहजी तुकडा तुटायला हवा. थोडेसे कच्चट वाटल्यास अजून पाच मिनिटे शिजू द्यावे. त्याचवेळी दोन चमचे तूप घालून ढवळून झाकण ठेवावे. आचेवरून काढून कोथिंबीर घालून गरम गरम वाढावे.

टीपा:
१. कुळथाचे पीठ विकत आणल्यास बरेचदा कचकच येतेच. अशा पिठाचे बनवलेले शेंगोळे खाववत नाहीत. रसभंग होतो. म्हणून शक्यतो पीठ दळून आणावे.
२. तिखटाचे प्रमाण जरासे जास्तच छान लागते. शेंगोळ्यात मीठ घातलेले आहे हे विसरू नये व त्या अंदाजाने पाण्यात मीठ घालावे.
३. तूप जरूर घालावे. स्वाद व वास अप्रतिम.
४. शेंगोळे ओलसरच असावेत. थोडासा रस्सा असतो तसे. मात्र शेंगोळ्यात आमटीसारखे पाणी नसावे.

--
भाग्यश्री सरदेसाई
shree_279@yahoo.com

इतर पाककृती:

3 comments:

अपर्णा ४ नोव्हेंबर, २०१० रोजी ९:२३ AM  

हा प्रकार (जो मी कधी खाल्ला नाहीये...) माझ्या नवरयाचा आवडता आहे...नेहमी आठवण काढत असतो...कधी येतेस प्रात्यक्षिक दाखवायला ....:)

भानस ५ नोव्हेंबर, २०१० रोजी २:२६ AM  

येतेच गं लवकर. वेध लागलेत आता. हसरा व रडका दोन्हीही स्माईली(:D ) आहेत इथे.

टिप्पणी पोस्ट करा

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.

मोगरा फुलला दीपावली अंकाबद्दलचा आपला अभिप्रायही अवश्य नोंदवा.

काही सूचना किंवा सल्ले द्यायचे असतील तर इथे क्लिक करा.

वरील साहित्यावरही आपली प्रतिक्रिया अवश्य द्या.

धन्यवाद.


Creative Commons License
मोगरा फुलला ई-दीपावली अंकामधील कोणत्याही प्रकारचे साहित्य हे Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 3.0 Unported License च्या अंतर्गत सुरक्षित आहे. अंकातील साहित्याच्या पुन:प्रकाशनाचे व्यापक अधिकार हे अंकातील साहित्य कोणत्या प्रकारचे आहे, यावर अवलंबून आहेत.


© 2011 Mogaraa Fulalaa. मोगरा फुलला ई-दीपावली अंक हा ’मोगरा फुलला’चाच एक भाग आहे. मोगरा फुलला ई-दीपावली अंकात प्रकाशित झालेल्या साहित्याचे सर्व हक्क हे त्या साहित्याच्या मूळ निर्मात्यांकडेच सुरक्षित आहेत. मोगरा फुलला दीपावली अंकाच्या प्रकाशित होणा-या आवृत्तीमधील कुठल्याही साहित्याच्या पुन:प्रकाशनासाठी संबंधित साहित्याच्या मूळ निर्मात्यांशी संपर्क साधावा अथवा मोगरा फुलला ई-दीपावली अंकाच्या संपादकांशी mogaraafulalaa@gmail.com या आयडीवर संपर्क साधावा.