गोंडस म्हातारे

गोंडस म्हातारे …. गोंडस ?? चुकून नाही, समजून उमजून वापरलंय हे विशेषण. व्याकरणाशी माझ फारसं सख्य नाही. शालेय जीवनात माझ्या उत्तरपत्रिकेतला व्याकरण विभाग तपासतांना माझ्या गुरुजनांना फुल्ली-गोळा (X,O) खेळण्याचा मनसोक्त आनंद जरी मी दिला असला, तरी इथे वापरलेल्या ’गोंडस’ या विशेषणाबाबत कुठल्याही व्याकरण तज्ञाशी वितंडवाद घालायची माझी तयारी आहे.

काही अपवाद वगळता, सर्वसाधारणपणे म्हातारा म्हटला की, तिरसट, खडूस, विक्षिप्त, किरकिर्‍या, खवचट, चक्रम, हेकट अशा विशेषणांनी अलंकृत केला जाणं, हा सामान्यतः येणारा अनुभव. “म्हातारपण हे दुसरं बालपण”, या उक्तीचा फायदा घेत वरील बिरुदावलीतील काही पदव्यांचे मानकरी होण्यात धन्यता मानणारेही अनेक आढळतात.

पण या सर्वसामान्य कल्पनांना छेद देणारेही काही असतात. असेच दोन म्हातारे; ’आबा टिपरे’ आणि ’दीनानाथ शास्त्री’. झी मराठी चॅनेल वरील ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ आणि ’असंभव’ या खूप गाजलेल्या मालिकांतील महत्वाच्या व्यक्तिरेखा. खर तर गोंडस म्हणण्यासारख काय आहे त्यांच्यात ? चेहरा-मोहरा, शरीर ? ….अजिबात नाही.

७०-७५ च्या घरातल्या आबांच्या तोंडाचं थोडं वाकड झालेल बोळकं, कधी काळी आलेल्या पक्षाघाताच्या खुणा मिरवणारं; तर ८० च्या दरम्यान वयोमान असलेल्या पार्किन्सन्स विकाराने ग्रस्त दीनानाथ आजोबांची सतत ‘नन्नाचा पाढा’ म्हणणारी मान. चालतांना वय झाल्याचं जाणवतंय, डोळ्यांना जाड भिंगाचे चष्मे, शरीरं थकल्येत, अशा अवस्थेतील हे म्हातारे अनेकांना खूप खूप आवडले ते त्यांच्या स्वभावामुळे, जीवन जगण्याच्या पद्धतीमुळे. ऑरकुट कम्युनिटीजवर त्यांच्याबद्दल प्रतिक्रिया देताना तरूण मुलं तर त्यांना चक्क Cute, Sweet, Rocking अशी विशेषणं बहाल करायची. “देखणे ते चेहरे, जे प्रांजळाचे आरसे” अस एक श्रेष्ठ कवीवर्य म्हणून गेलेत. आबा टिपरे आणि दीनानाथ आजोबांनी कवीवर्यांचे हे शब्द तंतोतंत सार्थ केले, म्हणूनच त्यांना मी गोंडस म्हटलंय.

दोघा म्हातार्‍यांचे स्वभाव भिन्न. आबांचा गमतीशीर आणि क्वचित प्रसंगी चिटवळपणा करण्याचा स्वभाव ,तर आजोबांची लाघवी, क्वचित नर्म विनोद आणि संस्कृतप्रचुर शब्दांचा वापर करत बोलण्याची शैली. आयुष्याच्या अर्ध्या वाटेत सहचारिणी साथ सोडून गेल्याच दु:ख असलं तरी ते उराशी कवटाळून न बसता पुढच्या पिढीचं जीवन कसं सुखकर होईल हा दृष्टीकोन, जीवनावर नितांत श्रद्धा, जुनं जपतांना नव्यातील चांगल्या गोष्टींचा सहज अंगीकार करण्याची वृत्ती, “आमच्या वेळी असं नव्हतं हो!” असली पालूपदं न वापरता नव्या पिढीला चांगल्या-वाईटाबद्दल मार्गदर्शन करण्याची हातोटी अशा गुणांमुळे; मुलं आणि नातवंडं यांच्यामधील Generation gap या म्हातार्‍यांनी भरून काढली आणि म्हणूनच दोघेही त्यांच्या परिवारातील आदराचं स्थान बनले, इतकंच नव्हे तर आधारवडासम भासले.

या व्यक्तिरेखांचं शब्दचित्रण करणार्‍या लेखकांना, तसंच मालिकेमध्ये त्या साकारणार्‍या, अगदी जिवंत करणार्‍या श्री. दिलीप प्रभावळकर आणि श्री. आनंद अभ्यंकर यांना सलाम ! व्यक्तीरेखा काल्पनिक असल्या तरी कधीही कृत्रिम वाटल्या नाहीत. उलट ही माणसं खरंच अस्तित्वात आहेत असंच जाणवायचं. म्हणूनच ते अनेकांच्या मनात घर करून गेले.

माझ्या सुदैवाने एकदा ’असंभव’ च्या सेटवर जाण्याची संधी मिळाली. तिथे आनंदजी आजोबांच्या वेशभूषेत होते. त्यांना भेटल्यावर सवयीनुसार मी वाकून नमस्कार करणार होतो. पण त्याच वेळी भानावर आलो की ते दीनानाथ शास्त्री आजोबा नसून (माझ्या जवळपासच्या वयाचे) आनंदजी अभ्यंकर आहेत.

दोन्ही व्यक्तीरेखांकडून सर्वांना खूप काही शिकण्यासारखं आहे. विशेषत: त्यांच्या वयाच्या जवळपासची वयं आहेत त्यांना आणि माझ्यासारख्या नव-वृद्धांना देखील. आयुष्याचा पैलतीर केव्हातरी गाठावा लागणार याची त्यांच्यासारखी मानसिक तयारी ठेवून, येणार्‍या प्रत्येक क्षणाला सकारात्मक वृत्तीने सामोरं जाणं, "या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे" या वृत्तीने जगणं, परिवारातील सदस्यांच्या सुखात आपलं सुख शोधणं, त्यांच्या भावना मतं यांचा आदर करून, त्यांचा मार्गदर्शक बनणं, या आबा आणि आजोबांच्या गुणांचा आदर्श ठेवून त्यांचे थोडे तरी गुण अंगीकारायचा प्रयत्न केला; तर होऊ घातलेले म्हातारे त्यांच्या कुटुंबीयांना देखील Cute, Rocking आणि गोंडस देखील वाटू शकतील.

--
उल्हास भिडे
ulhasbhide@yahoo.co.in

2 comments:

Nisha २२ नोव्हेंबर, २०१० रोजी १०:५८ PM  

वृध्द फ्लेक्सिबल असतील तरच घरातील लोकांना गोंडस वाटतात. एखादे तत्वनिष्ठ आणि शिस्तप्रिय आजोबा मुलांनाच नव्हे तर मुलांच्या आई-बाबालाही त्रासदायक वाटतात . त्यामुळे वृध्दांनाही आज तारेवरची कसरत करावी लागते. लेख छान आहे. अभिनंदन. अधिक लेखनासाठी शुभेच्छा!

ulhasbhide २३ नोव्हेंबर, २०१० रोजी ९:४६ AM  

निशाजी,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
तुमचं म्हणणं, शेवटच्या परिच्छेदात मांडलेल्या विचारांशी समानता
दर्शविणारं आहे. वृद्धांनी आपल्या वर्तनात आवश्यक तो बदल घडवणं
आणि त्याकरिता वरील २ म्हतार्‍यांचा आदर्श ठेवणं गरजेचं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.

मोगरा फुलला दीपावली अंकाबद्दलचा आपला अभिप्रायही अवश्य नोंदवा.

काही सूचना किंवा सल्ले द्यायचे असतील तर इथे क्लिक करा.

वरील साहित्यावरही आपली प्रतिक्रिया अवश्य द्या.

धन्यवाद.


Creative Commons License
मोगरा फुलला ई-दीपावली अंकामधील कोणत्याही प्रकारचे साहित्य हे Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 3.0 Unported License च्या अंतर्गत सुरक्षित आहे. अंकातील साहित्याच्या पुन:प्रकाशनाचे व्यापक अधिकार हे अंकातील साहित्य कोणत्या प्रकारचे आहे, यावर अवलंबून आहेत.


© 2011 Mogaraa Fulalaa. मोगरा फुलला ई-दीपावली अंक हा ’मोगरा फुलला’चाच एक भाग आहे. मोगरा फुलला ई-दीपावली अंकात प्रकाशित झालेल्या साहित्याचे सर्व हक्क हे त्या साहित्याच्या मूळ निर्मात्यांकडेच सुरक्षित आहेत. मोगरा फुलला दीपावली अंकाच्या प्रकाशित होणा-या आवृत्तीमधील कुठल्याही साहित्याच्या पुन:प्रकाशनासाठी संबंधित साहित्याच्या मूळ निर्मात्यांशी संपर्क साधावा अथवा मोगरा फुलला ई-दीपावली अंकाच्या संपादकांशी mogaraafulalaa@gmail.com या आयडीवर संपर्क साधावा.