दीप काव्योत्सव

गगन उजळिले नक्षत्रांनी
उजळे धरती आज दिव्यांनी
करूया पूजा आज दिव्यांची
तम सारणाऱ्या या तेजाची
येईल लक्ष्मी शुभ पावलांनी
उजळे धरती आज दिव्यांनी

भारतीय संस्कृतीत दिव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक धर्मानुसार त्यांची तत्त्वप्रणाली, आचार विचारांची बैठक, रीती परंपरा, यात वैविध्य आहे हे निश्चित, परंतु सर्व धर्मात आढळणारा समान गुणधर्माचा एकत्र धागा सापडतो ते म्हणजे कोणत्याही कार्याची सुरुवात दीप प्रज्वलनाने केली जाते. मग तो तेल वात घालून तयार केलेला दीपक असो अथवा मेणापासून तयार केलेली मेणबत्ती असो. अंधाराचा नाश व्हावा अन घरादाराचा, अंगणाचा, विश्वाचा कोपरा अन कोपरा उजळून निघावा असे पृथ्वी तलावरच्या माणूस म्हणून जन्म घेणाऱ्या प्रत्येक प्राण्याला वाटत असते हे निश्चित.

लिखित वाङ्मयाच्या उदयापासून विचार केल्यास वेदांमध्ये सुद्धा दिव्याची प्रार्थना अशी केलेली आहे:
भो:, दीप ब्रह्मस्वरूप ज्योतिषां प्रमुख्यंग
पुत्रार्थानि प्रयच्छमे!
यावत पूजा समाप्ति
तावत त्वं सुस्थिरो भव!!

हे दिव्या, तू ब्रह्मस्वरूपाचा अंश आहेस. तू आम्हाला पुत्र , धन संपत्ती दे. जो पर्य़ंत माझी पूजा संपत नाही तो पर्यंत तू सुस्थिर रहा. इथे पुत्रप्राप्ती या मध्ये मुलगा मुलगी असा भेदभाव अपेक्षित नाही. म्हणजेच काय आयुष्यात अपेक्षित असलेला प्रत्येक आनंद तू आम्हाला दे.ज्ञानेश्वरीत देखील ज्ञानेश्वर महाराज योग्याची लक्षणं सांगतांना म्हणतात,

मी अविवेकाची काजळी, फेडुनी विवेकदीप उजळी
ते योगिया पाही दिवाळी! निरंतर!!

विवेकाचा गुण अंगी बाणवून घेण्यासाठी योग्याने नेहेमी अविवेकाची काजळी स्वच्छ केली पाहिजे, तरच तो निरंतर विचारांची दिवाळी साजरी करू शकेल. इतकी सुंदर उपमा व काव्य फक्त ज्ञानेश्वरी मधेच सापडू शकते.

दीपे दीपू लावीला, तैसा पारसंगु जाहला!

ये हृदयीचे ते हृदयी असे म्हणताना दिव्यांचे उदाहरण सहजतेने सांगत अद्वैत भक्तीचे वैशिष्ट्य सहजपणे अधोरेखित करीत जातात. संत नामदेव तर विठ्ठलाचे दर्शन म्हणजे आम्हा भक्तांना जणू काय दिवाळीच असे अभंगातून सांगतात.

कोटी दिवाळी दसरे, हेचि आम्हा पुरे,
घरोघरी देखिला, विठ्ठल!

असे दिव्याचे अन मनुष्याचे जवळचे नाते अधिकच दृढ अधिकच घट्ट करणारे. हा दिवा मनुष्याच्या आयुष्यातील सुख-दुःख, राग, लोभ, प्रीती, स्वातंत्र्य अशा असंख्य भावनांशी निगडित असतो आणि मग तो प्रत्येक काव्यातून तो आपल्याशी संवाद साधत असतो. दिवा म्हणजे अंधार नष्ट करणाऱ्या तेजाचे प्रतीक. मग हा अंधार सूर्याच्या मावळण्या मुळे होणारा किंवा अज्ञानामुळे होणारा- म्हणून दीप हे ज्ञानाचे सुद्धा प्रतीक ठरते.

अंधार दाटला घोर जरी
हा दीप तमावर मात करी
पुसुनी आसवे हसूनी जरा बघ
अनंत ताऱ्यांचे वर झगमग
ये परत, परत ये तुझ्या घरी
हा दीप तमावर मात करी!

पिसाट वारे, वन वादळले
सूड घ्यावया जळ आदळले
धृव तारा आहे अढळ तरी,
हा दीप तमावर मात करी!

घावावाचून नसे देवपण
जळल्यावाचून प्रकाश कोठून?
का सांग निराशा तुझ्या घरी
हा दीप तमावर मात करी!

मंगेश पाडगांवकरांच्या या कवितेतून जीवनात कोठली निराशा ही अंधाराचीच प्रतीक होय, आणि दिवा हा त्यावरचा हुकुमी उपाय आहे. धृवा सारखे अढळ राहून आयुष्य दिव्यासारखे घालवले तर निराशेचा अंधःकार निश्चितच नाहीसा होईल असा मूलमंत्र जपला आहे.

आहे घाटाच्या पाऱ्या
पुढे प्रवाह पाण्याचा
झुळूझुळू संथ वारा
काळ्याशार रेशमाचा
तळ्पायरीशी उभी
दीपमाळ तेवणारी
व्रत सांगतेचे दीप
उतरते धारेवरी
दीप स्वप्नांचे, आशांचे
दीप स्नेह जिव्हाळ्याचे
दीप छंदाचे ,नादांचे
दीप स्मृती विस्मृतींचे

दीपदान या कवीतेमधे इंदीरा संत नदीच्या संथ प्रवाहात व्रत सांगता करण्यासाठी सोडण्यात येणाऱ्या दिव्यांचे वर्णन करतात.माणूस सुध्दा आयुष्यात असंख्य प्रकारचे दीप उजळत असतो. आशा , आकांक्षा,स्नेह , जिव्हाळा या सोबताच कडू गोड आठवणींचे सुध्दा! हे असे नात्यांचे ऋणानुबंधांचे दिवे लावताना कधी स्त्रीमनाची दमछाक होते, अन हीच दमछाक तिच्या कवितेत खोलवर उमटत जाते.

उजळीत दिवे दिवे
इथवर आले
जुळवता दुवे दुवे
पाशबध्द झाले
उजळले दिवे तरी
काळॊखाचा धाक
जुळवल्या दिव्यांचीही
खोटी आणभाक

उजळीत दिवे दिवे - या कवितेत शांता शेळक्यांच्या ह्या ओळी दिव्यांचा संबंध थेट नात्यांशी जुळवतात. नाते कितीही आपलेपणाचे असले , घट्ट विणीचे असले तरी कुठे ना कुठे ते तुटण्याची भीती मनात खुट्ट करत असते.
कधी कधी दिवा हा आपल्या माणसाची हळवी आठवण जपणारा ठरतो. कंदील या कवितेतून पाडगांवकरांनी अशीच आईच्या मऊ लुगड्यासकट आठवण जपलेली आहे.

दिवे लागण होण्या आधी
आई कंदील काढायची.
कंदिलाची काच वेगळी करायची
हळूवार पणे आई,
कंदिलाची काजळी धरलेली काच पुसुन स्वच्छ केलेल्या
कंदीलाला उजळून टाकणारा प्रकाश पसरवायची.
जणू काही तो प्रकाश आईच्या मऊ लुगड्यासारखा
रात्रीच्या किर्र काळॊखाला
गिळून टाकणारा मंद व ह्ळूवार असायचा.

अशीच एक हळवी कविता दिवाळीच्या दिवसांची वाचनात आली.हया कवितेत अनंत कणेकरांनी दिवाळीच्या दिवशी नात्यातला आपलेपणा कसा जपला जातो याचे अन मग या दिवशी एखादा पोरका असला की, त्याचे दुःख कवीच्या ह्र्दयी जाऊन भिडते.

दीपांनी दिपल्या दिशा, सण असे आज दिवाळी
हर्षाने दुनिया प्रकाशित दिसे आतूनी बाहेरुनी
अंगा चर्चुनि अत्तरे भरजरी वस्त्रांस लेवूनीया
चंद्रज्योती , फटाकडे उडवती आबाल सारेजण
पुष्पे खोचूनीया केशापाशी करुनी श्रुंगारही मंगल
भामा सुंदर या अशा प्रियजना स्नाना मुदे घालीती
सृष्टी उल्हासिता ब्घुनी सगळी आनंदा मानस
तो हौदावरी केजि मज दिसे स्नानाकरी एकला

आणि मग काणेकरांनी ह्या एकट्या माणसाचे दुःख अतिशय ह्र्द्य शब्दात मांडले आहे. दिवा, त्याच्याशीच संलग्न दिवाळी हा आनंदाचा हर्षाचा, जल्लोषाचा सण यात आप्तजन सोबत नसतील तर त्याचे किती दुःख शल्य मनाला भिडत असतं याची कल्पना न केलेली बरी.

नात्यांच्या हळव्या दिव्यांबरोबरच आणखीही दिवे आयुष्याला उजळत जातात.

हिरव्यागार वेलीवर
पिवळ्या धमक फुलाचा दिवा लागला
माझं अंगण प्रकाशाने भरून गेलं
पहाटेचा प्रकाश म्हणजे
कोणीतरी आपल्या हातात घेतलेला
कोवळा कोवळा दिवाच असतो

निसर्गाचे हे दीप सुध्दा माणसांचे आयुष्य निसर्गाप्रमाणेच समृद्ध करीत फुलवीत जातात हे निश्चित!

पुढ्च्या कवितेत कविवर्य बा. भ. बोरकरांनी स्वातंत्र्याची दिवाळी साजरी करतांना फाळणीचे दुर्भाग्य वाट्याला आल्याची खंत आहे.

घात अपुल्य शिरी, घालुनी घाव अपुल्या उरी
स्वातंत्र्याची अशी दिवाळी कशी करू साजरी??
दुभंग झाली वास्तुदेवता
दुभंग झाला माया ममता
भाष्यांच्या घावातूनी निघती नव्या विषांच्या झरी.
अशोक येथे अकबर तेथे, येतिल काही स्मरुनी नाते
चंद्र सुदर्शन मिळवित मिळवित सबाह्य अभ्यंतरी

स्वातंत्र्याच्या दिवाळीत हा दिवा भावा-भावांना वेगळा करून गेला. चक्र आणि चंद्रमा यांची तुटातुट झाल्याचे दुःख कवीनी नेमक्या शब्दात वर्णन केलेले आहे. आता या नवरसांपैकी प्रीतीचा रससुध्दा दिव्याशी आपले नाते कसे सांगतो ते बघा.

तुझाच हा खयाल का, धुक्यातला दिवा
तमात मार्ग सापडे... मला पुन्हा नवा

आता ही प्रित एका अर्थाने जोडीदाराची केलेली आलोचना आहे, की इथेही भक्तीचेच गीत गायलेले आहे?

पाण्यातल्या दिव्याला आयुष्य हे नाव आहे
हा जीव जाळण्याला आयुष्य हे नाव आहे.
बोलायचे नाही...भेटायचे नाही
नुसतेच भाळण्याला आयुष्य नाव आहे

आयुष्य म्हणजे नुसता पाण्यावरचा दिवा असं सहजपणे सदानंद डबीर आपल्या खयाल या संग्रहातून सांगताना दिसतात. शेवटी दीप हे तम सारणाऱ्या अंधाराचा नाश करणाऱ्या प्रकाशाचे प्रतीक आहे. हे तर सत्यच परंतू हा दीप सहजा सहजी हाती येणार नाही. त्यासाठी धरावी लागणारी सत्याची, न्यायाची, शक्तीची कास ही महत्वाची आहे. ही शक्ती कोणती असावी? तर दीन्दुबळ्यांचे रक्षण करण्याची शक्ती, अन्यायापुढे न झुकण्याची शक्ती, प्रेममुल्य जाणून घेऊन माणूसकीच्या धर्माला जागण्याची शक्ती,जर प्रत्येक मानवाच्या ठायी असली तरच समतेचे दीप जगी लावू शकू अन् तीच खरी भक्ती ठरेल.

शक्ती दे, शक्ती दे, शक्ती दे
सत्याची, न्यायाची भक्ती दे
शक्ती हवी दुबळ्यांचे अश्रू पुसाया
शक्ति हवी तिमिरातून तेज दिसाया
खोट्याच्या वाटेवर पाय न टाकू
अन्यायापुढती आम्ही कधिही ना वाकू
लाज श्रमाची आम्हा कधीही नसू दे
माणूसकी हाच धर्म एक असू दे
अंधारी आत्मदीप तेवत ठेवू
समतेचा ध्वज आम्ही मिरवत नेऊ

समता, बंधुता, न्याय ह्या समतेच्या ध्वजाच्या ज्योती ज्यावेळी खऱ्या अर्थाने कार्यरत होतील, त्याच वेळी भारत सर्वार्थाने बलशाली, शक्तिशाली साम्राज्य म्हणून मिरवेल हे निश्चित. आजच्या राजकीय धुमाळीच्या पार्श्वभुमीवर शेवटचा एक शेर म्हणावासा वाटतो..

मी न केली भाषणे....न दुषणे कोणा दिली
वाढला अंधार तेव्हा, एक पणती लाविली..

आता ही पणती कुठली, ते प्रत्येकाने आपापल्या विचार सामर्थ्याच्या जोरावर ठरवावी.

--
सुपर्णा कुलकर्णी
kbmahendra@gmail.com

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.

मोगरा फुलला दीपावली अंकाबद्दलचा आपला अभिप्रायही अवश्य नोंदवा.

काही सूचना किंवा सल्ले द्यायचे असतील तर इथे क्लिक करा.

वरील साहित्यावरही आपली प्रतिक्रिया अवश्य द्या.

धन्यवाद.


Creative Commons License
मोगरा फुलला ई-दीपावली अंकामधील कोणत्याही प्रकारचे साहित्य हे Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 3.0 Unported License च्या अंतर्गत सुरक्षित आहे. अंकातील साहित्याच्या पुन:प्रकाशनाचे व्यापक अधिकार हे अंकातील साहित्य कोणत्या प्रकारचे आहे, यावर अवलंबून आहेत.


© 2011 Mogaraa Fulalaa. मोगरा फुलला ई-दीपावली अंक हा ’मोगरा फुलला’चाच एक भाग आहे. मोगरा फुलला ई-दीपावली अंकात प्रकाशित झालेल्या साहित्याचे सर्व हक्क हे त्या साहित्याच्या मूळ निर्मात्यांकडेच सुरक्षित आहेत. मोगरा फुलला दीपावली अंकाच्या प्रकाशित होणा-या आवृत्तीमधील कुठल्याही साहित्याच्या पुन:प्रकाशनासाठी संबंधित साहित्याच्या मूळ निर्मात्यांशी संपर्क साधावा अथवा मोगरा फुलला ई-दीपावली अंकाच्या संपादकांशी mogaraafulalaa@gmail.com या आयडीवर संपर्क साधावा.