आठवणी दाटतात...

काही दिवसांपूर्वी कुठल्यातरी चॅनेलवर जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम पाहता पाहता नकळतच मन जुन्या काळात गेलं. त्या काळातल्या (आणि त्यानंतरच्याही) सिनेमांत अनेक गोष्टी अगदी त्याच त्याच असायच्या. शहरातल्या बागेत प्रेमगीत गाताना अचानक हिरो-हिरॉइन एखाद्या हिल-स्टेशन वर दाखल व्हायचे. का ? कसे ? असले प्रश्न विचारायचे नाहीत. (डोकं गहाण आणि डोळे व कान उघडे ठेवायचे म्हणजे असली तर्कटं रसभंग करत नाहीत.) एका कडव्यात आजूबाजूला दाट धुकं, तर पुढच्याच कडव्यात छानसं कोवळं ऊन. दोघेही रंगात आलेले, नायकाचा चेहरा नायिकेच्या चेहर्‍याच्या अगदी जवळ येतो ..... आता काहीतरी होईल म्हणून अगदी उत्कंठतेने प्रेक्षक वाट पहात असतानाच….. अचानक दोघेही दाट धुक्याच्या पडद्याआड (जळलं लक्षण त्या सेन्सॉर बोर्डाचं) आणि पडद्यावर दोन जवळ येणारी फुलं नाहीतर आकाशात उडणारे पक्षी दिसायचे.

अनेक चित्रपटांमध्ये अशा प्रकारची दृश्यं पाहिल्याच आठवलं की नाही? आणखीही कित्येक गोष्टी एकाच साच्यातून निघालेल्या....

*** नायिकेची प्रेमळ छेडछाड करत, गाणं गात गात, नायक, तिच्या समोरच्या झाडा/खांबा मागे लपतो.... नायिका तिथे पोहोचते तर नायक अचानक तिच्या मागे उभा राहिलेला दिसतो.

.....निव्वळ अतर्क्य, तरीही नियमित दिसणारा प्रसंग. असो. (प्रेमात, युद्धात आणि सिनेमात सर्व क्षम्य असतं हेच खरं !)

*** नटून थटून आलेल्या नायिकेला, नायक जेव्हा न्याहाळून बघतो तेव्हा तिच्या पायापासून डोक्यापर्यंत कॅमेरा मारला जाणं कधीही चुकलं नाही. (नायिकेला कसं पहाव याचा दृष्टीकोन प्रेक्षकाला प्रदान करण्याचा प्रयत्न ???)

*** नायकाला आवडणारा ’माँ के हाथका गाजर का हलवा’ आणि ’मूली का पराठा’ तर चावून चावून चोथा झाले तरीही चघळले जायचे. (काश! उस वक्त TV होता, और ये माँएँ नई नई रेसिपियाँ सीख पाती!!!)

*** हिरोचा बाप मेल्यावर हिंदी सिनेमातल्या सर्व ‘माँ’ कपडे शिवून चरितार्थ चालवायच्या.

*** गरीब असले तरी यांची घरं मात्र ऐसपैस. (शिलाई मशीन आणि मोठं घर, सेवाभावी संस्था sponsor करत असाव्यात.)

*** हातात मिठाईचा खोका घेऊन, लगबगीने घरात प्रवेश करत “माँ..ऽऽऽ… आजसे तुम यह काम नहीं करोगी”, असं म्हणत तिला शिलाई मशीनवरून उठवून, हात धरून, तिला गरगर फिरवून "मुझे नौकरी मिल गई माँ..ऽऽऽ", हे आजवर किती हिरोंनी अगदी याच पद्धतीने फिल्मी ‘माँ’ला सांगितलं असेल, याची गणती करणं कठीण आहे. (पटकथाकार आणि संवाद लेखक हा प्रसंग बहुदा Copy-Paste करत असावेत.)

*** घरात कोणाचा मृत्यू झाला की त्या प्रसंगी आणि अंत्ययात्रेला सर्व माणसं परिटघडीच्या पांढर्‍या शुभ्र कपड्यांत दिसायची, अजूनही दिसतात. (इतक्या दु:खद प्रसंगात देखील काय Dress Sense ना!!!)

*** खलनायकाची तथाकथित प्रेयसी आणि तिने अचानक केलेला गौप्यस्फोट... "मैं तुम्हारे बच्चे की माँ बननेवाली हूँ." मग खलनायक म्हणणार ... "क्या बक रही हो?" मग त्यावरून त्या दोघांमध्ये निर्माण होणारी तेढ आणि मग बदला घेण्यासाठी त्या बाईने नायक/नायिकेला मदत करणे आणि शेवटच्या मारामारीत तिचे मरणे .... अगदी न चुकता घडणार्‍या गोष्टी. (हिरोच्या ’बाँहोंमें आखरी साँस’ घेऊन तिला पापमुक्ती मिळणे हे तिचं प्राक्तन असावं!!!)

*** विनोदी अभिनेता, तलावात किंवा स्विमिंग पूलमध्ये पडून २ मिनिटात जरी वर आला तरी तेवढ्या वेळात त्याला सर्दी होऊन तो "आँ .....क् छीऽऽ" करत शिंकायला लागणं हा अलिखित नियम, पाळायला कुणीही चुकलं नाही. (इथे, तो अभिनेता ’१ मिनिट में सर्दी से छुटकारा’ वाली गोळी खाऊन खडखडीत बरा होतो. अशी जाहिरात दाखवून पूर्ण सीन त्या कंपनीकडून sponsor करून घेता येणं शक्य झालं असतं असं अनेकदा मनात यायचं.)

*** प्रेमाच्या त्रिकोणातला ‘तिसरा कोन’, मारधाडीच्या सिनेमातला नायकाचा मित्र, खलनायकाचा क्रूर मुलगा; असली पात्रं चित्रपटाअखेरीस मरण्यासाठीच लेखकाने जन्माला घातलेली असायची. खलनायकाचा मुलगा खलनायकाच्याच हातून चुकून मारला जाणे हे तर न चुकता घडायलाच हवं. (न चुकता चुका करण्यात यांचा हातखंडा की सिनेमा हिट करण्याचा हमखास फॉर्म्युला???)

*** दरीत गाडी कोसळून पडली तरी नायक जिवंत राहणे, तो जंगली लोकांना सापडणे, कबिल्याच्या मुखियाच्या मुलीने त्याच्यावर एकतर्फी प्रेम करणे, अखेरीस तिचे नायकाला वाचवताना बलिदान.... हा ठरलेला घटनाक्रम. (ही मुलगी बहुदा शापित यक्षीण असावी असा दाट संशय आहे.)

*** शेवटच्या मारामारी मध्ये विनोदी कलाकाराची आचरट मारामारी आणि त्याला नायिकेची/सहनायिकेची साथ. (अशी दृश्यं, Fight composer ला गुंडाळून ठेवून विनोदी अभिनेताच improvise करत असावा!!!)

*** JK, SK, KK, DK अशी खलनायकांची नावं देखील ठरलेली. त्यांच्या अड्ड्यावर असलेले रिकामे खोके आणि रिकामीच पिंप. काय मजा यायची ना, मारामारीच्या वेळी ते खोके पडायचे आणि पिंप गडगडत जायची ते बघायला. (अंधश्रद्धाळू निर्माता, सिनेमा हिट व्हावा म्हणून ज्योतिषाच्या सल्ल्याने असली नांवे ठेवत असेल का???)

*** रेल्वे रुळांच्या सांध्यात कुणाचातरी (खास करून नायिकेचा) पाय अडकून बसलाय, दूरून वेगाने येणारी रेल्वे गाडी... एका क्षणी अगदी जवळ आल्यासारखी तर दुसर्‍याच क्षणी अजून दूर भासणारी... अगदी शेवटच्या क्षणी नायकाचं तिथे धावत येणं, काहीतरी युक्ती लढवून त्या व्यक्तीला वाचवून तिच्यासकट गडगडत पलीकडच्या बाजूला लोळत जाणं...

सर्वात महत्त्वाचं म्हणजे, त्या रेल्वेच्या गाडीच्या मोटरमन ने वेग कमी केला, गाडी अलीकडे किंवा पलीकडे थांबली असं कधीच घडायचं नाही. (अगदी नाकासमोर चालणारी माणसं होती हो, त्या काळी!)

*** हिरोच्या एकाच गोळीने खलनायकाचे ‘कुत्ते-चमचे’ गारद होत असत. पण हिरो, खलनायक, महत्त्वाची पात्रं यांची गोळ्या पचवायची क्षमता अनाकलनीय! ५- ७ गोळ्या लागूनसुद्धा शेवटचा निरोप समारंभ आटोपून किंवा एखादं गुपित न चुकता सांगूनच ते मरणार. (काय दुर्दम्य इच्छाशक्ती... जणू बाजीप्रभूचे वंशज!)

*** अतीगंभीर प्रसंगात देवाजवळ साकडं घालताना (खास करून माँ) "भगवान, मैंने आजतक तुमसे कुछ भी नहीं माँगा", या वाक्याने डायलॉगची सुरवात व्हायची. (मग इतकी वर्षं मंदिरात जाऊन ही बाई करायची तरी काय?... हे न सुटलेलं कोडं.)

*** कुणाला तरी मारण्यासाठी किंवा आत्महत्या करण्यासाठी सर्व सिनेमांमधले सर्वजण एकाच ठिकाणून पिस्तूल हस्तगत करत.... त्यांच्याच बंगल्यामधला लांबरुंद जिना चढल्यावर एका खोलीत काळ्या रंगाने पॉलिश केलेल्या कपाटाचा सहज उघडता येणारा, कुलूप नसलेला एक ड्रॉवर आणि त्यात ठेवलेलं ते एकुलतं एक पिस्तूल.... आजतागायत यात काहीही फरक पडलेला नाही. (पिस्तूल ठेवायची कित्तीऽ सुरक्षित जागा.... व्हॉट अ‍ॅन आयडिया सरजी!!!)

*** शेवटच्या मारामारी अगोदर खलनायकाची मोठी पार्टी सुरू असणे, त्यात वेष बदलून आलेले नायक, नायिका, त्यांचे सहकारी.... मग त्या सर्वांचे नाच-गाणे आणि दोन कडव्यांमधील म्युझिक पीस मध्ये हिरोचा मित्र, अती वेगात गाडी चालवत/घोडा दौडवत येत असताना दिसणं आणि अगदी मोक्याच्या क्षणी तो पोचणं... हे टायमिंग राखण्यात तेव्हापासून आजपर्यंत कोणीही चुकलेलं नाही. (इथे देखील एखाद्या कार किंवा मोटरबाईक कंपनीकडून सीन sponsor करून घेतला असता तर?? जाऊ दे .... त्या काळी Corporate Culture इतकं बोकाळलेलं नव्हतं.)

*** भुताच्या सिनेमात घाबरलेला माणूस दूर पळत असला, तरी ते भूत मात्र अगदी धीम्या गतीने त्याच्याकडे सरकताना दिसायचं. तरीदेखील गंमत म्हणजे तो माणूस भुताच्या आवाक्यात असायचा. हे कसं काय शक्य व्हायचं ते केवळ भूत आणि दिग्दर्शकच जाणे. (आधीच भूत.... त्यातही फिल्मी साज ल्यालेलं!!!)

*** जीव देणार्‍याला शेवटच्या क्षणी कोणीतरी वाचविणे, सीरियस पेशंटला ऑपरेशन थिएटर मध्ये नेताना ट्रॉली ढकलणारे नातेवाईक, वाढदिवसाच्या पार्टीमधले मक्ख चेहर्‍याचे एक्स्ट्रा आर्टिस्ट्स, पियानोच्या त्रिकोणातून नायकाच्या चेहर्‍याकडे zoom होत जाणारा कॅमेरा...वगैरे वगैरे वगैरे. हे सर्व त्या काळातच असायचं असं नाही. आजही कमी-अधिक फरकाने या गोष्टींची पुनरुक्ती होताना दिसते. हिंदी सिनेमात आणि हिंदी TV मालिकांमध्येही. इतकंच काय, तर मराठी सिनेमात देखील! सर्व आठवायचं म्हटलं तर अडीच-तीन तासांचा सिनेमाच तयार होईल.

तरी देखील या सिनेमांच्या संदर्भात, अशाच न चुकता घडणार्‍या एका गोष्टीचा उल्लेख मात्र आवर्जून करायलाच हवा...

ती गोष्ट म्हणजे...

.................................................

या सार्‍या नित्यनेमाने घडणार्‍या गोष्टींवर टीका करून देखील तितक्याच नेमाने हे सर्व सिनेमे अगदी आवडीने पाहणारा, नव्या packing मधला जुना मसाला चवीनं चाखणारा, तुमच्या-माझ्या सारखा प्रेक्षकवर्ग!


--
उल्हास भिडे
ulhasbhide@yahoo.co.in

3 comments:

pranay ४ नोव्हेंबर, २०१० रोजी ३:२३ PM  

एकदम खरे आपण तेच स्टोरी वाले चित्रपट बघून सुद्धा पैसे खर्चून परत तसेच चित्रपट बघत असतो

टिप्पणी पोस्ट करा

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.

मोगरा फुलला दीपावली अंकाबद्दलचा आपला अभिप्रायही अवश्य नोंदवा.

काही सूचना किंवा सल्ले द्यायचे असतील तर इथे क्लिक करा.

वरील साहित्यावरही आपली प्रतिक्रिया अवश्य द्या.

धन्यवाद.


Creative Commons License
मोगरा फुलला ई-दीपावली अंकामधील कोणत्याही प्रकारचे साहित्य हे Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 3.0 Unported License च्या अंतर्गत सुरक्षित आहे. अंकातील साहित्याच्या पुन:प्रकाशनाचे व्यापक अधिकार हे अंकातील साहित्य कोणत्या प्रकारचे आहे, यावर अवलंबून आहेत.


© 2011 Mogaraa Fulalaa. मोगरा फुलला ई-दीपावली अंक हा ’मोगरा फुलला’चाच एक भाग आहे. मोगरा फुलला ई-दीपावली अंकात प्रकाशित झालेल्या साहित्याचे सर्व हक्क हे त्या साहित्याच्या मूळ निर्मात्यांकडेच सुरक्षित आहेत. मोगरा फुलला दीपावली अंकाच्या प्रकाशित होणा-या आवृत्तीमधील कुठल्याही साहित्याच्या पुन:प्रकाशनासाठी संबंधित साहित्याच्या मूळ निर्मात्यांशी संपर्क साधावा अथवा मोगरा फुलला ई-दीपावली अंकाच्या संपादकांशी mogaraafulalaa@gmail.com या आयडीवर संपर्क साधावा.