संपादकीय

'मोगरा फुलला’च्या सर्व मित्रमैत्रीणींना, हितचितकांना, सहभागी लेखक-कवी-कलाकारांना आणि समस्त वाचकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! ही दीपावली व येणारे वर्ष आपल्याला आनंदाचे, सुखा-समाधानाचे व भरभराटीचे जावो ही सदिच्छा!
आपलं तांत्रिक ज्ञान व लेखणी वापरून, इंटरनेटवर लेखकू स्वत:ला आत्मविश्वासाने ’लेखक’ म्हणवू शकला आहे, तो या ब्लॉगिंगमुळे आणि ब्लॉगची सुविधा मोफत उपलब्ध करून देणार्या ब्लॉग होस्टींग कंपन्यांमुळे. ब्लॉगसारखं व्यासपीठ उपलब्ध करून देणार्या सर्व ब्लॉग होस्टींग कंपन्यांचे समस्त ब्लॉगर्स-लेखकांतर्फे मन:पूर्वक आभार! ब्लॉगसारख्या सुविधेमुळेच मोगरा फुललालादेखील गेली दीड वर्षे विविध प्रकारचं साहित्य व या वर्षी एक ई-दिवाळी अंक प्रकाशित करण्याची संधी मिळाली.
मोगरा फुललातर्फे प्रकाशित झालेला हा पहिलाच दिवाळी अंक. पण साहित्य निवडताना चोखंदळपणे निवडलं. बरेच ब्लॉगर्स दर्जेदार लेखन करतात, परंतू निरनिराळ्या कारणास्तव त्यांच्या लेखनाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. अशा ब्लॉगर्सचे पूर्वप्रकाशित लेखनही मोगरा फुललाने ई-दीपावली अंकात समाविष्ट केले आहे. काही हौशी लेखक उत्तम लिहीतात परंतु त्यांना ब्लॉगिंगचे ज्ञान नाही, अशा लेखकांचं साहित्यही या अंकात वाचण्यासाठी उपलब्ध करून दिलं आहे. जे चांगलं आहे ते सर्वांसमोर आलं पाहिजे, हा यामागचा प्रांजळ हेतू आहे. कदाचित अप्रकाशित साहित्याचा अट्टहास न धरल्यामुळे असेल पण साहित्यरूपी प्रतिसाद उदंड मिळाला. काही साहित्य साभार परतही पाठवावे लागले आहे. त्यामागे ’दर्जा’ हे एकमेव कारण नसून, समीक्षेसाठी वेळेचा अभाव, फॉन्ट अनुरूप नसल्याने पुनर्लेखन करावे लागणे, मुदतीनंतर साहित्य प्राप्त होणे इ. कारणेदेखील आहेत. या उदंड साहित्यामधून वेचक व वेधक असे साहित्य निवडले आहे खास आपल्यासाठी!
साहित्य आल्यानंतर ते संपूर्ण वाचून, प्रत्येक वाक्याचा व ओळीचा अर्थ समजून घेणं आणि शुद्धलेखनाकडे लक्ष देणं, हे प्रचंड क्लिष्ट काम आहे. संपादन सहाय्य मंडळाने हे काम अतिशय जबाबदारीने पार पाडलं, याचा मोगरा फुललाला निश्चितच अभिमान आहे आणि राहील. उल्हास भिडे व भाग्यश्री सरदेसाई यांनी गद्य लेखन, तर क्रांति साडेकर यांनी पद्य लेखनाची समीक्षा करताना आपला त्या त्या क्षेत्रातील अनुभव पणाला लावला असंच म्हणावं लागेल.
भाग्यश्रीताई सध्या भारतात नाशिक येथे वास्तव्य करून आहेत. त्यांना वीज-भारनियमनाची असुविधा दिवसातील दहा ते बारा तास सोसावी लागते. असे असूनही नेहमी हसतमुखाने त्यांनी आपल्या दीपावली अंकासाठी संपादन सहाय्य दिलं.
क्रांतिताई आपल्यासारख्याच एक ब्लॉगर. मात्र त्यांची पद्य लेखनाची समज जबरदस्त आहे. स्वत:ची नोकरी आणि घर सांभाळून, त्यांनी समीक्षेसाठी आलेल्या प्रत्येक कवितेमधील आशय समजून घेतला. क्वचित अर्थबोध न झाल्यास सविस्तर चर्चा केली, यातच त्यांची साहित्याविषयची तळमळ दिसून येते.
उप-संपादक उल्हास भिडे यांनी अंकाचे दृश्यस्वरूप व वाचनसुलभता याकडे काटेकोरपणे लक्ष दिले. केवळ दूरध्वनीवरच नव्हे, तर प्रत्यक्ष भेटूनही त्यांनी या दोन विषयांवर सविस्तर चर्चा केली. गद्य साहित्याच्या संपादनातही त्यांनी हातभार लावला, तसेच खास वाचकांसाठी काही मनोरंजक कोड्यांची निर्मिती व संकलनही त्यांनी केले. खास मुखपृष्ठासाठी रचलेल्या चारोळीमधून तर त्यांनी जणू मोगरा फुललाचेच मनोगत व्यक्त केले आहे असे वाटते. खरं तर मोगरा फुललाचा दिवाळी अंकही प्रकशित व्हावा, ही कल्पना त्यांचीच! मात्र अतिशय नम्रपणे त्यांनी संपादकत्वाची जबाबदारी नाकारली.
फिरदोस कराई यांनीच यापूर्वी मोगरा फुललाचे हेडर व ओळखचिन्ह तयार केले होते. विनंतीनुसार त्याच मूळ हेडरमधे व ओळखचिन्हामधे दिवाळी अंकाच्या गरजेनुसार त्यांनी आकर्षक बदल करून दिले व आपली सर्जनशीलता सिद्ध केली, तसेच दिवाळी अंकासाठी समर्पक असे मुखपृष्ठही तयार करून दिले.
अंकामधे तांत्रिक बदल करण्यासाठी इंटरनेटवर खास ब्लॉगर्ससाठी तांत्रिक माहिती पुरवणार्या ब्लॉगर्सची अप्रत्यक्ष मदतही खूप मोलाची ठरली आहे. याशिवाय क्विलपॅडसारख्या संकेतस्थळामुळे मराठीतून प्रतिक्रिया टंकलिखित करता येण्याचा पर्याय थेट ब्लॉगवरच उपलब्ध करून देता आला. अवर ब्लॉग टेम्पलेट यांच्या आकर्षक टेम्पलेटमुळे या ई-दीपावली अंकामधे काही खास बदल करणं शक्य झालं. मोगरा फुललाच्या काही उत्साही वाचक आणि हितचिंतकांनी वारंवार फोन व ईमेल करून अंकासाठी मदत करण्याचं आश्वासन दिलं आणि तशी मदत केलीही.
या टीमवर्कचं चीज झालं आहे ते आपल्या साहित्यामुळे. अंकासाठी साहित्य पाठविताना लेखक-ब्लॉगर मंडळींनी अक्षरश: कसलीही कसर बाकी ठेवली नाही. अंकाची फारशी जाहीरात न करताही अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त असा प्रतिसाद लाभला. केवळ प्रस्थापित ब्लॉगर्सच नव्हेत, तर नवोदित ब्लॉगर्स व अब्लॉगर - म्हणजे ज्यांनी अजून स्वत:चा ब्लॉग सुरू करण्याचा दृष्टीनेही पाऊल उचललेलं नाही व ज्यांना स्वत:चा ब्लॉग सुरूही करायचा नाही, अशा लेखकांनीदेखील आपले साहित्य प्रसिद्ध करण्यासाठी मोगरा फुलला ई-दीपावली अंकाची निवड केली, या सगळ्यातच मोगरा फुललावरील लेखक-वाचकांचा विश्वास व प्रेम दिसून आलं.
आवडलेल्या साहित्यावर आपली प्रतिक्रिया अवश्य द्या. अंकातील सहभागींना मानधन मिळणार नसले, तरी आपल्या प्रतिक्रियाच त्यांच्यासाठी प्रेरणारूपी मानधन असेल. मोगरा फुललाच्या पहिल्यावहिल्या ई-दीपावली अंकाबद्दलचा आपला अभिप्रायदेखील जरूर नोंदवा.
गेल्या दीड वर्षांत मनातलं कागदावर उमटवण्याच्या प्रयत्नांना ब्लॉगिंगची जोड मिळाली. आपल्या सर्वांचे आशीर्वाद, व शुभेच्छा लाभल्या आणि इथवर येऊन पोहोचले. मागे वळून पहाताना लक्षात आलं की मोगरा खरंच खूप बहरलाय. हे तुमचंच प्रेम आणि विश्वास आहे. या लेखाला आपण मनोगत, ऋणनिर्देश किंवा संपादकीय असं काहीही समजा. संपादकीय लिहावं इतकी मोठी मी अजून झालेली नाही. ’मोगरा फुलला’ वरचा आपला लोभ, आस्था, आपला सहभाग आणि आपणां सर्वांकडून लाभलेलं सहकार्य यामुळेच ’मोगरा फुलला’ चा हा पहिला दिवाळी अंक आकारास आला आहे. हा लोभ उत्तरोत्तर वृद्धींगत व्हावा ही इच्छा. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा आणि तुम्हा-आम्हा, आपल्या सर्वांच्या या मोगरा फुलला ई-दीपावली अंकालाही एक वाचक म्हणून शुभेच्छा!
धन्यवाद.
कांचन कराई
admin@mogaraafulalaa.com
संपादक
मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०१०
